Print
Hits: 9503

जीवनशैलीत बदल करताना पाळायची पथ्ये
व्यायाम: स्नायू शिथिलीकरणाचे काही व्यायाम हृदय-आसन, श्वसनाचे व्यायाम, मानसिक ताणाची सुयोग्य हाताळणी, ध्यान, कल्पनाचित्र. योग्य-अयोग्य गोष्टी दाखवणारी चित्र, तक्ते इ.

आहार: आहाराबाबत डॉ. डीन ऑर्निश यांनी सांगितलेली पथ्यं. भारतीय संदर्भात लक्षात घेण्याच्या विषेश बाबी: स्निग्धांशाविरहित आहार, आहाराबाबत काही सूचना, उंची, वजन याचं प्रमाण रोजच्या आहारातून मिळणारे उष्मांक व स्निग्धांश याचा हिशेब, स्निग्धांशविरहित पाकक्रिया भारतीय पदार्थांमधील पोषक घटकांच प्रमाण दाखवणारे तक्ते.

आपल्या हृदयाला हितकर असा बदल आपल्या जीवनशैलीत करणं आणि त्यानुरूप दिनक्रम आखणे ही गोष्ट आपल्या स्वतःच्या घरी राहूनही करता येण्याजोगी आहे. हृदयविकार निवारणाचा हा कार्यक्रम अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नसल्यामुळे तो ज्याचा त्याला पार पाडता येईल.

असं करताना काही पथ्यं मात्र पाळायला हवीत.

  1. आपल्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीलच जीवनशैली बदलाच्या कार्यक्रमाची सुरूवात करावी आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यात वेळोवेळी बदल करावेत.
  2. हृदयविकाराखेरीज इतर काही दुखणी असल्यास आणि त्याबाबत आहार-विहाराचं काही पथ्यं असल्यास पाळावं. त्याबाबतही तज्ञ वैद्यकीय सल्ला घेत राहावा.
  3. डॉक्टरांनी सुचवलेल्या तपासण्या वेळच्यावेळी करून घ्याव्या.
  4. कार्यक्रमाप्रमाणे दिनक्रम सुरू केल्यानंतर स्वतःच्या प्रकृतीत काही फरक पडत असल्याचं आढळल्यास लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या आवश्यक अशा सावधगिरीप्रमाणे आणखीही काही गोष्टी हृदयरूग्णांनी करणं जरूरीच आहे असं वाटतं. हृदयविकार निवारण कार्यक्रमाचा तो भाग नसला तरी या गोष्टी तत्वाच्या असल्यामुळे इथे त्यांचा उल्लेख करत आहे.

हृदयविकार असणाऱ्या रूग्णाला छातीत, पाठीत, खांद्यात, मानेत अशा वेदना होऊ लागल्या (ज्या अँजायनाच्या हृदयझटक्याच्या असू शकतात) तर अशा वेळी घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना काही गोळ्या दिलेल्या असतात. (सॉरबिट्रेट किंवा तत्सम) या गोळ्या अशा रूग्णांनी सतत स्वतःबरोबर बाळगाव्या असं त्यांना सांगितलेलं असतं. जर काही त्रास होऊ लागला तर त्यातली अर्धी ते एक गोळी ताबडतोब जिभेखाली ठेवायची असते. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे बहूतेक रूग्ण या गोळ्या आपल्या खिशात, पाकिटात अशा ठिकाणी ठेवतात.

पण पुष्कळदा या गोळ्या आपण कुठे ठेवल्या आहेत ते आपल्या जवळच्या किंवा नेहमी बरोबर असलेल्या व्यक्तीला मात्र त्यांनी सांगितलेले नसतं. त्यामुळे त्रास होऊ लागला किंवा हृदयविकाराचा झटका आला तर बरोबर असलेल्या किंवा घरात असलेल्या व्यक्ती डॉक्टरांशी संपर्क साधण्याची, रूग्णाला हॉस्पीटलमध्ये नेण्याची धावपळ करू लागतात आणि तातडीनं जे औषध द्यायला हवं ते मात्र दिलं जात नाही. हे औषध द्यायला हवं हे पुष्कळांना माहीत नसतं. तर ते कुठे ठेवलेलं आहे हे कित्येकांना माहीत नसतं. हृदयविकाराचा झटका आलेला रुग्ण काही वेळा पूर्ण बेशुध्द होतो तर काही वेळा बेशुध्द नसला तरी त्याचा एकदम शक्तीपात झाल्यामुळे तो बोलण्याच्या किंवा विचार करण्याच्या परिस्थितीत नसतो. त्यामुळे बरोबर किंवा जवळपास असलेल्यांनी त्याला ही तातडीची मदत करणं आवश्यक असतं. याचप्रमाणे या तातडिक गोळ्या एकाच ठिकाणी न ठेवता ठराविक ठिकाणी, त्या ठेवलेल्या असाव्या. आणि आपल्या घरातल्या सर्वांना, सहकाऱ्यांना, पुष्कळदा बरोबर असणाऱ्या मित्रांना या गोळ्यांचं महत्व आणि ठेवण्याचं ठिकाण सांगितलेलं असावं.