Print
Hits: 5444

एच.आय.व्ही ची बाधा झालेल्या रुग्णामध्ये शरिराची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली असते. त्यामुळे क्षयाच्या जंतुंचे फावते. अशा रुग्णामधील क्षयरोगाचे जंतू नेहमीच्या औषधोपचारांना दाद देत नाहीत. तेव्हा त्याला मल्टी ड्रग रेझिस्टन्स म्हणजेच एम.डी.आर. टी.बी. असे म्हणतात. अर्थात क्षयरोगावरील सुरवातीचा उपचार नीट दिला वा घेतला न जाणे, औषधे वेळेवर व पूर्ण कालावधीसाठी न घेणे, शरिराची रोगप्रतिकारक्षमता इतर कारणांमुळे कमी होणे अशा कारणांमुळेसुद्धा एम.डी.आर.टी.बी. उद्भवतो. क्षयरोगाच्या उपचारांसाठी जी औषधे वापरली जातात, त्याचे दोन मुख्य प्रकार केले जातात. फर्स्ट लाईन ड्रग्ज आणि सेकंड लाईन ड्रग्ज. नवीन किंवा नेहमीच्या क्षय रुग्णांसाठी फर्स्ट लाईन ड्रग्ज वापरतात, तर एम.डी.आर.टी.बी. रुग्णांसाठी सेकंड लाईन ड्रग्ज वापरतात. ही औषधे खूप महाग असतात. सर्वसामान्यांना परवडणारी तर अजिबात नसतात.

आज लोकांच्या अज्ञानामुळे, औषधोपचाराकडे केलेल्या दुर्लक्षामुळे, अनियमिततेमुळे, तसेच योग्यवेळी औषध न घेतल्यामुळे अशी रुग्णांची संख्या वाढतच आहे. मल्टी ड्रग रेझिस्टन्स (एम.डी.आर.) टी.बी.चा एक रुग्ण दर वर्षी १५ निरोगी व्यक्तींना टी.बी. ची लागण देत असतो. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

क्षयरुग्ण, एच.आय.व्ही. किंवा एडस बाधित रुग्णांमधे जर एम.डी.आर.टी.बी. उद्भवला तर टी.बीचा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे: एक्स.डी.आर.टी.बी. म्हणजेच एक्सटेन्सिव्हली ड्रग रेझिस्टन्स ट्युबरक्युलॉसिस! एक्स.डी.आर.टी.बी.चे रुग्ण तर कोणत्याच औषधांना दाद देत नाहीत. या रुग्णांवर उपचार करणे आज काल कठीण गोष्ट बनली आहे. अशा त-हेने एके काळी पूर्ण बरा होणारा टीबी, एच.आय.व्ही./एड्स ने मानवाच्या शरिरात प्रवेश केल्यापासून गंभीर आजार बनत चालला आहे.