Print
Hits: 7545

आम्हा मित्रांमध्ये पूर्वी कायम एक विनोद केला जात असे. एखाद्या पार्टी मध्ये एखाद्या मित्राला मधूनच आठवण व्हायची आणि तो म्हणायचा, ‘अरे माझा उपवास आहे’ मग आम्ही त्याची समजूत घालायची ‘ काळजी करू नकोस! कोंबडी उपवासाची आहे. तिला साबुदाण्यावर वाढवलीय’ । एकविसाव्या शतकात खरोखरीच उपवासाचा मांसाहार मिळण्याची शक्यता आहे.

याचं कारण पक्षी वा प्राण्याचं मांस हे एखाद्या सागरी वनस्पती पासून कृत्रिमरीत्या बनवलं गेलेलं असेल, असं या क्षेत्रातले तज्ञ म्हणतात.

जगाच्या वाढत्या लोक संख्येला प्रथिनं पुरवणं वाटतं तितकं सोपं नाही असं या आहार तज्ञाचं म्हणणं आहे. एकविसाव्या शतकातील अन्न कसं असेल याची चुणूक आता प्रगत पाश्‍चात्य देशांमधून दिसायला लागली आहेच. अमेरिकेत पूरक आहाराचा व्यवहार इतका झपाट्यानं वाढतोय की काही काळात तो संगणक क्षेत्राशी आर्थिक उलाढालीत स्पर्धा करू लागेल, असं म्हटलं जात. पाश्‍चात्य देशात मिळणारं बहुतेक अन्न हे दीर्घ काळ टिकावू आणि शारीरिक पोषण करणारी रासायनिक पुरक तत्वे भरून निर्माण केलेलं असतं. या अन्नाचं आवरण हाही आधुनिक संशोधनाचा विजय मानण्यात येतो. दरम्यानच्या काळात कृत्रिम मांस आणि पोल्ट्री यांचा स्वाद वाढविण्याचा हा प्रयत्‍न चालू आहेतच. या शिवाय हवा बंद अन्नात जंतू वाढू नयेत आणि आधीचे जंतू मरावेत म्हणून किरणोत्सर्जनासह अनेक उपाय करण्यात येतात.

१९१५ च्या आसपास डाएटरी सप्लीमेंट्‌स आणि स्पोर्टस्‌ सप्लिमेंटचा जमाना ‘अन्न बाजारात’ उदयास आला. वेटलिफ्टर पासून धावपटूं पर्यत विविध प्रकारच्या क्रिडापटूंना लागणारं अन्न कसं असावं आणि त्या अन्नामुळं त्याच्या क्रिडा प्रकारात कशी मदत करता येईल या बाबतचं १९८० सालानंतर सुरू झालेलं संशोधन प्रशासकीय मान्यतेसह या काळात फळास आलं यामुळे इ.स. १९९८ मध्ये पूरक अन्नावर किंवा अन्नाला पूरक पौष्टिक पदार्थावर अमेरीकन माणसानं जवळ जवळ १४ अब्ज डॉलर खर्च केले. न्यूट्रिशन बिझनेस जर्नलनंच ही आकडेवारी प्रसिध्द केली आहे. यातले ८० कोटी डॉलर फक्त खेळाडूंसाठीच्या खास अन्न पूरक व्यवस्थेवर खर्च करण्यात आले होते.

बर्‍याच तज्ञांच्या मते अन्नाची उष्मांक थिअरी आता जुनाट ठरली असून नव्या संशोधनाचा फायदा मानवजातीस मिळायला हवा. रोज आपण जे अन्न खातो त्यातला भात, गहू, बटाटा यातून आपल्याला फार कमी प्रमाणात जीवनसत्वे, खनिज द्रव्य आणि पोषक घटक मिळतात. यामुळे बाजारात अनेक जीवनसत्व आणि खनिजद्रव्य संयुक्तपणे पुरवणार्‍या गोळ्या १९७५ नंतर येऊ लागल्या. आपल्याकडेही ‘मी रोज न्याहारीला तांबं खातो. अशा जाहिराती होत होत्या. खरं तर जनसामान्यांना गोळी घेणं आवडत नाही. बरेच लोक ते आजारीपणाचं लक्षण मानतात.

अमेरिकेत फार वेगळी स्थिती नाही. अमेरीकेत ज्या व्यक्तींना रोज औषधं घेणं आवश्यक आहे, अशा व्यक्तींबाबत एक सर्वेक्षण करण्यात आलं. तेव्हा ज्यांना उच्च रक्त दाबासाठी औषध आवश्यक आहे, अशा व्यक्तींपैकी फक्त २५% व्यक्तीच व्यवस्थित रोजच्य रोज औषधं घेतात, असं दिसून आलं, अशा परिस्थितीत पूरक पोषक घटकांच्या म्हणजे न्यूट्रीशनल सप्लीमेंटच्या गोळ्या किती कमी प्रमाणात घेतल्या जात असतील याची कल्पना केलेली बरी. या सर्वेक्षणानंतर अमेरीकन अन्न आणि औषधी कंपन्यांनी एकत्र येऊन अन्नातच पूरक पोषण घटक घुसवून ते गिर्‍याईकास द्यायची युक्ती काढली.

अशा प्रकारच्या अन्नासाठी डॉक्टरांच्या चिठ्‌ठीची गरज भासणार नाही. याचं कारण वनस्पतींची पैदास करतानाच जनन अभियांत्रिकीच्या सहाय्यानं त्यात आरोग्यकारक गुणधर्म भरता येतील. लस टोचतांना किंवा पाजतांना मुळ फळांच्या रसातच लसीचे गुणधर्म असलेली फळं निर्माण करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. त्यांना यशही आलं आहे.

लोमाडिंया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन मध्ये कॉलरा प्रतिबंधक बटाटे तयार करण्यात आलेले आहेत. या बटाट्याची भाजी किंवा हा बटाटायुक्त पदार्थ खाल्ले की त्यातील लसीमुळे ती भाजी खाणार्‍या व्यक्तींच्या शरीरात कॉलर्‍याच्या रोगजंतूंशी यशस्वी लढा देण्यासारख्या प्रतिपिंडाची निर्मिती होते. अशाच तर्‍हेनं ‘फ्लू’ विरूध्दच्या लसीयुक्त अन्नपदार्थांच्या निर्मितीचे प्रयत्‍नही सुरू आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीस हे “अँटी फ्लू’ अन्न खायला सुरूवात केली की फ्लूमुळं अंथरूण धरणे आपोआप टळेल. मात्र हे अन्न बाजारात आल्यानंतर फ्लूच्या कारणानं वैद्यकीय रजेचा अर्ज देणं अवघड होईल कारण कंपनीच्या क्षुधाशांती विश्रांती गृहात फक्त हेच अन्न उपलब्ध असेल.

लवकरच म्हणजे इ.स. २००५ पर्यंत मानवी चाचण्या पूर्ण होवून असे विविध अन्नपदार्थ बाजारात आलेले आपल्याला पाहावयास मिळतील. असं मिनेसोटा विद्यापीठातील फूड सायन्स अँड इंजिनीअरींग या विभागाचे प्रमुख थिओडोर पी. लाबूझा यांचं म्हणणं आहे. खाद्यान्त विज्ञान व अभियांत्रीकी ही पुढच्या शतकात हमखास यशस्वी म्हणून पुढच्या शतकात अशा अन्नामुळं जनसामान्यांना डॉक्टरकडं जाण्याचं कारण उरणार नाही. सुरूवातीस ग्राहकाच्या मनात काहीसा गोंधळ निर्माण होईल हे खरं पण हळूहळू ग्राहक औषधांऐवजी अशा अन्नाला सरावतील आणि नंतर चटावतील.

अशा तर्‍हेनं रोग प्रतिकारक अन्न शरीरात गेलं तरी आपले स्नायू सुस्थित राहावेत म्हणून प्रथिनांची गरज असते, कार्बोदकासह इतरही अनेक घटकांचीही सुडौल बांध्यासाठी आवश्यकता असते. त्यामुळं कडधान्ये, मांस, अंडी, मासे, कोंबड्या हे पाश्‍चात्य देशात आणि यांना पर्यायी अन्न पदार्थ शाकाहारी लोकांसाठी आवश्यक असतील हे खरं पण त्यांच्या प्रतीतही बराच फरक दिसून येईल. पूरक क्रीडा अन्नामध्ये प्रथिनांची भुकटी आता मोठ्या प्रमाणावर खपू लागली आहे. व्हे पावडर ही सध्या सर्वाधिक खपणारी प्रथिन भुकटी आहे. दूध नासवून ती तयार करण्यात येते. मुख्य म्हणजे चीज आणि दही करून जो दुधाचा भाग उरतो त्यापासून ती मिळत असल्यानं त्या भुकटीच्या निर्मितीस फारसा खर्च येत नाही.

अमेरीकेत योगर्ट आणि चीज दोन्ही मोठ्या प्रमाणावर खपतात. यात चरबी आणि केसीन चा वापर होतो. त्यानंतर पूर्वी उरलेलं पाणी व साका फेकून देण्यात येत असे. कुणातरी संशोधकानं या पाण्यात स्निग्धांश आणि लॅक्टोज व दुधातले स्निग्ध पदार्थ यांची अशा व्यक्तींना ऍलर्जी असते. मात्र हे पदार्थ काढलेल्या प्रथिनांमुळे त्यांना फयदा होतो. बरेच धावपटू, वजन उचले आणि शारीरिक सौष्ठव प्रेमी व्हे प्रोटीने आयसोलेट म्हणजे ही दुधातली वेगळी केलेली प्रथिनं खातात याचं कारण ही प्रथिनं शरीरात शोषली जातात. त्यांचा फारच थोडा भाग त्याज्य म्हणून बाहेर टाकला जातो.

आपल्याकडे दुग्धोत्पादकांनी हा उद्योग करून बघायला हरकत नाही. जर अंड्यामधल्या पांढर्‍या भागाचं प्रथिन मूल्य १०० मानलं तर या दुग्धजन्य प्रथिनाचं प्रथिनयुक्त पदार्थापेक्षा हे जास्त असून गोमांसाचं प्रथिन मूल्य ८० तर कोंबडीच्या मांसाचं ६० ते ६५ असतं. मुख्य म्हणजे हे प्रथिन शरीरात ९० ते ९५ % प्रमाणात शोषलं आणि स्वीकारलं जातं. एकविसाव्या शतकामध्ये हे प्रथिन अन्नासंबंधीच्या बाजारात आणि व्यवहारात मानाचं स्थान पटकावून बसेल असा या व्यवसायातील लोकांचा अंदाज आहे.

आपण केवळ प्रथिन भुकटी खावून जगतो ही कल्पना बर्‍याच व्यक्तींना मानवणारी नसते. माणूस अन्न खातो ते केवळ उदर भरण नसतं. त्यात मानसिक समाधानाचाही भाग असतोच. बर्‍याच अन्न संशोधकांच्या मते पृथ्वीवर वाढणार्‍या लोकसंख्येला प्रथिनं कशी पुरवायची हा प्रश्न सोडवायचा असेल तर भविष्यकाळात अन्नात माशांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा लागेल.

न्यूयॉर्कमधल्या क्युलिनरी इन्स्टिट्युट ऑफ अमेरीका या संस्थेतील आयरीन चार्मस हिला मात्र हे मान्य नाही. तिच्या मते एकविसाव्या शतकात प्रथिन पुरवठ्याच्या अग्रभागी सॉयफूड म्हणजे ‘सोयाबीन’ पासून बनवलेले अन्न असेल. आयरीन चार्मस म्हणते सोयाबीन पासून कुठल्याही प्रकारचा आणि चवीचा पदार्थ बनवता येतो. एकविसाव्या शतकात सोयाबीन हाच प्रथिन पुरवठ्याचा प्रमुख आधारस्तंभ असेल.

भारतात सोयाफूड अजून म्हणावं तसं आणि तितकं मिळत नाही. पूर्वी नागपूरमध्ये सोयामिल्कचे बूथ होते पण सरकारी धोरणामुळं ते बंद पडले. पुण्यात काही ठिकाणी सोयाफूड मिळतं पण त्याच्या काहीशा उग्रवासामुळं ते नाकबंद करून औषध म्हणून खावं असच असतं. सोयापीठ कणकेत मिसळून केलेल्या पोळ्या मात्र चविष्ठ असतात. मात्र त्या खायलाही सवय करावी लागते. डॅना जॅकोबी नावाच्या लेखिकेनं ‘द नॅचरल किचन सॉय’ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे (प्रायमा पब्लिशिंग, नुयॉर्क १९९६) ते जिज्ञासूनी सॉयफूडच्या माहीतीसाठी अवश्य बघावं.

अमेरीकेत कुठल्याही अन्न पदार्थात जर सव्वासहा ग्रॅम सोयाबीनचं पीठ असेल तर ते अन्न हृदयविकारात खायला योग्य असं ठरविण्यात यावं, अशा प्रकारची एक चळवळ आहे. १९९९ डिसेंबरपर्यंत त्या मागणीस शासकीय मान्यता मिळावी, अशी अपेक्षा आहे. सॉय योगर्ट (दही) सॉय मीट, सॉय ब्रेड या चविष्ट पदार्थाच्या निर्मितीचे प्रयत्‍न प्रायोगिकरीत्या यशस्वी झाले आहेत. सॉयपासून ऍनिमल प्रोटीन बनवता येईल अशी स्वप्न पाहणारे अन्य शास्त्रज्ञही आहेतच. एम. आरन बेंजामिन्स हे सेल्डन न्यूयॉर्क इथं अन्न विषयक संशोधन करतात. त्यांच्या संशोधनाचा विषय नासा (नॅशनल इरॉनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन) या संस्थेसाठी अवकाश विरांना योग्य असं अन्न तयार करणे हा आहे. मानवी त्याज्य अपशिष्टांवर खाण्यायोग्य आळिंब वाढवता येतील कां? या विषयी बेंजामिन्स संशोधन करीत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सर्वच आकाशवीर शाकाहारी नसतात. (आळिंब ही वनस्पती आहे. त्यामुळं आळिंबांना (मश्रूम) मांसाहार मानणं चूक आहे.

आपल्याकडं काही मोठ्या हॉटेलांच्या मेनूत मांसाहार या सदरात आळिंब ढकलून त्यांचा दर वाढवला जातो. अवकाशात मांसाहार करायचा तर अवकाश यानात शेळ्या तरी पाळायला हव्यात किंवा कोंबड्यांचे पिंजरे तरी न्यायला हवेत. हे अर्थातच शक्य नसल्यामुळं त्यांनी अवकाशात टेस्ट टुब मांस बनवता येईल का ? या विषयी विचार करायला सुरूवात केली. शिवाय या प्रकारचं मांस निर्जंतुक असेल ते वेगळंच. अशा प्रकारच्या मांसापासून स्वयंपाक कसा करायचा? औषध व लसींनी भरलेलं अन्न कसं खायचं ? हे शिकवणारे वर्ग दूरचित्रवाणीवर तसेच सुपर मार्केट मध्ये घेणं सुरूवातीस भाग पडेल. ‘कुकींग इन इलेक्ट्रॉनिक एज’ ‘रेसिपीज फॉर टेस्ट ट्यूब चिकन’, हौ टू इट न्यूट्रिक्यूटिकल्स अशी पुस्तकही बहूदा बाजारात उपलब्ध होतील. अशा तर्‍हेचं अन्न घरपोच करण्यासाठी दांडी संकेत (बारकोड)असलेली शीतपेटी तयार करण्यात आली आहे, या फ्रीज मधून पदार्थ बाहेर काढला की लगेच संगणकात तशी नोंद होईल त्यामुळे गिर्‍हाईकाला झालेली रक्‍कम सांगणं आणि किती आणि कोणता माल शिल्लक आहे, हे संगणकाचं काम असेल.

पुढच्या शतकात या पदार्थांवरची आवरणं ही बदलतील. ही आवरणं श्वसन करणारी असतील. प्रत्येक फळ किंवा भाजी यांचा ताजेपणा टिकवून धरण्यासाठी आतल्या हवेतील ऑक्सिजन व कार्बनडाय-ऑक्साईड यांचे प्रमाण या पिशव्या योग्य तेवढंच ठेवतील. मांस, अंडी, यांच शुधीकरण किरणोत्सर्जनाद्वारे केलं जाईल. या शिवाय अतिदाबाच्या साहाय्यानं अन्न टिकवून धरण्याचं तंत्र विकसित करण्याचे प्रयत्‍नही चालू आहेतच, हे प्रयोग यशस्वी झाले तर पुढच्या शतकामध्ये शीतपेटीतलं अन्नही ताजंच मिळेल शिवाय वेगळं कृत्रिम ताज अन्नही हवं तेव्हा उपलब्ध होईल.