Print
Hits: 9742

पचनक्रियेस आपण कशी मदत करु शकतो?
पचनक्रिया ही रासायनिक क्रिया आहे. आपण खातो त्या अन्नाचा त्यासाठी जास्तीत जास्त संबंध पाचक रसाशी आला पाहिजे. आपण घेतो त्यातील दोन तृतियांश पेक्षा जास्त अन्नाचा भाग हा घन स्वरूपात असतो. त्याचे भरपूर चर्वण झाले पाहिजे. माणसांच्या दातांची रचना निसर्गाने त्या दृष्टीनेच केली आहे. दात हे फक्त तोंडात आहेत जठरात नाहीत याची जाणीव असावी.

चर्वण करत असताना लाळ निर्माण होते व आपण खातो ते अन्न त्या लाळेत विरघळल्याने जी जीभ व टाळूच्या भागात असलेल्या चव ग्रंथी आपण कोणत्या प्रकारचे अन्न घेत आहोत (उदा. शर्करा, प्रथिने, स्निग्ध वगैरे) याची संवेदना मेंदूकडे पोहोचविली जाते. मेंदूकडून संबंधित ग्रंथिंना (यकृत, पित्ताशय, स्वादूपिंड वगैरे) वरील अन्न पचविण्यास आवश्यक असणारे पाचकरस निर्माण करण्याची जणू अज्ञाच मिळते. त्यामुळे गिळलेले अन्न जठर, लहान आतडे या भागात जेव्हा जाते त्यावेळी तेथे अगोदरच पाचकरस त्याचे स्वागत करण्यास तयार असतो. म्हणूनच आहार अत्यंत सावकाश व भरपूर चर्वण करून खाल्ला पाहिजे.

घास बत्तिस वेळा चावून खावा, असे म्हणतात त्यामागे त्यामागे हाच उद्देश आहे. घास भरपूर चावून खाल्ल्यास घन अन्नाची पूड होते. त्यामुळे त्याचा पृष्ठभाग वाढतो व पाचक रसाशी अधिक संबंध येतो. यासाठी महात्मा गांधी म्हणतात, घन पदार्थ पिता येईल इतके त्याचे चर्वण करा व पातळ पदार्थाची चव समजेपर्यंत ते तोंडात असू द्या! हाच त्याचा मतितार्थ!