Print
Hits: 13025

या दिवसात लघू आणि गरम म्हणजेच उष्ण गुणाचा आहार घ्यावा. आपल्या आहारातील विविध अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आपण जे धान्य वापरतो ते जुने असावे. एक वर्षापेक्षा अधिक जुने मात्र शक्यतो असू नये. नवीन धान्य वापरायचे असेल तर ते धान्य भाजून घेतल्यास अधिक चांगले ! त्यामुळे अशा भर्जित धान्यवत अग्नीचे संस्कार होऊन ते शरीरातील अग्नीकडून पचविण्यास हलके - लघु बनते.

ज्वारीची भाकरी, कमी तेलाच्या पोळ्या, गरम दुध, शक्यतो मूगाचे वरण, भात अशी आहाराची मांडणी असावी. दही घेण्याऐवजी त्यामध्ये थोडे पाणी घालून, घुसळून ताक करून घ्यावे. दही ताजे असावे. आंबट, शिळे असू नये. आहाराचे प्रमाणही पावळ्याच्या सुरूवातीस अधिक असू नये. जसजसा अग्नी प्रदिप्त होईल म्हणजेच भूक वाढेल तशी आहाराची मात्रा वाढवावी. पचण्यास जड, शिळा, थंड असा आहार टाळावा.

आपण जे आहारामध्ये विविध अन्नपदार्थ खातो, ते जेथे तयार होतात त्या स्वयंपाकगृहात आता थोडेस डोकावूया. जेव्हा जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा तेव्हा तद्‌अनुषंगाने सृष्टी आणि मानवी शरीर यामध्ये होणार्‍या बदलाकडेही गृहिणींनी आवर्जून लक्ष द्यावे. या ऋतूमध्ये स्वयंपाकामध्ये मुरे, जिरे, हिंग, सुंथ, लिंबू, लसूण कांदा, आले कडिलिंब यांचा नेहमीपेक्षा थोडा अधिकच वापर करावा. कारण हे सर्व पदार्थ उष्ण असून; पचण्यास हलके असे आहेत. ते आहाराच्या पचण्यास खूपच मदत -साहाय्यकारी ठरतात. स्वयंपाकामध्ये तेल, तूपाचा लोण्याचा वापर जरूर असावा, पण मर्यादित स्वरूपातच असणे चांगले! फळभाज्या व पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. भेंडी, पडवळ, वांगी, कारले, दोडका, मुळा, पालक, तोंडली आदि भाज्या वापराव्यात.

पाऊस........ व्याधी? औषधे साधी!
एवढी सगळी काळजी घेऊनही काही व्याधी किंवा व्याधींची लक्षणे उद्‌भविल्यास औषधांचा वेळीच , योग्य मात्रेत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करावा. पोट गच्च झाल्यासारखे, गॅस धरल्याप्रमाणे करपट ढेकरा येणे अशी लक्षणे असताना आले - सुंठीचा वापर करावा, काढ करून घ्यावा. ताप आल्यावर, सुदर्शन घनवटी, सुदर्शन चूर्ण, महासुदर्शन काढा किंवा साधा अगदी तुळशीचा रस घ्यावा

भूक वाढण्यासाठी अग्नितुंडी वटी, चित्राकादी वटी, आरोग्यवर्धिनी रस, पाचन सुधारून पोटाच्या तक्रारी दूर व्हाव्यात यासाठी या औषधांबरोबर वा स्वतंत्रपणे लवणभास्कर चूर्ण, हिंगवाष्टक चूर्ण, पंचकोटनसव इ. त्रिकूट, शंखवटी, ओवाचूर्ण, सूंठ, गूळ चूर्ण घ्यावे. पोटात कळ येणे, द्रवमल प्रवृत्ती होणे यासाठी शंखवटी, संजीवनी वटी, मोचरस, कर्पूरवटी इ. चा उपयोग करावा.
पावसाळ्यात ही काळजी घ्या....