लहान मुलांचे आजार अचानकपणे उद्भवतात इतकंच नाही तर ते चटकन् गंभीर रूप धारण करू शकतात. कोणत्याही जंतूंनी होणाऱ्या आजाराची, लहान मुलं आणि म्हातारी माणसं अशी दोन सहज सापडणारी भक्ष्यं असतात, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते.
लहान मुलाचं काम आधीच जास्त असतं, पण आजारी मुलाचं तर कितीतरी पटींनी अवघड! अशावेळी आईची मानसिक स्थिती जर बिघडलेली असेल तर तोच प्रसंग फार तीव्रतेनें जाणवतो. म्हणून मन समतोल ठेवण अन् धीर धरणं फार महत्वाचं.
दुसरं म्हणजे आपली आईच घाबरलीय, रडतेय असं दृष्य आजारी मुलानं पाहिलं तर त्याचाही उरला सुरला धीर खचतो अन् तो आणखीनच असहाय्य होतो. त्याचा त्याच्या लवकर बरं होण्यावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून स्वत: खचून न जाता मुलालाही सतत धीर देण्याचाच प्रयत्न करावा. आपले दैनंदिन कार्यक्रम अचानक बदलावे लागतात. काही महत्वाची कामं रद्द करावी लागतात. त्यातून काही लगेचच मार्ग न निघण्यानं निराश व्हायला होणं हे सह्जिक आहे. आजारी मुलाबरोबर आईनं नुसतं ‘असणं’ औषधांच्या जोडीला फार आवश्यक आहे. त्यामुळं मुलाला खूप सुरक्षित वाटतं.
कधी कधी लहान मुलं मांडीत घेऊन बसायला लावतात. त्याचंही मानसशास्त्र हेच असल्यानं ते अवश्य करावं. त्याचा त्रास मुळीच वाटून घेऊ नये. त्याला अशीच सवय लागेल असं वाटणं चुकीचं आहे. मूल बरं वाटल्यावर मांडीत बसून नक्कीच रहाणार नाही याची खात्री बाळगावी.
आजार आणि प्रतिकार शक्ती
सगळेच आजार लसी देऊ टाळता येत नाहीत. काही गंभीर आजारांवर लसी मिळतात. त्याच मोजक्या लसी आपल्या मुलांना दिलेल्या असतात. हळू हळू आणखी काही आजारांवरही लसी तयार करण्याचं काम चालू आहे आणि काही काळानंतर त्या मिळूही लागतील. पण या शिवायही काही आजार होऊ शकतात आणि त्यावर प्रतिबंधक असे उपाय नसतात. त्यामुळं आपण इतक्या लसी दिल्या तरी मूल आजारी कसं पडतं, अशी शंका घेणं बरोबर नाही. दुसरं म्हणजे सगळेच आजार गंभीर नसतात. आणि अशा छोटया मोठया आजारांमुळं त्यांची प्रतिकारशक्ती आणि सहनशक्ती वाढीला लागते. अशा सर्व आजारामध्ये मुलाच्या तब्येतीवर आणि आजाराविरूध्द प्रतिकार करण्याची त्याची कुवत यावर नजर ठेवत त्याला आराम कसा वाटेल याकडं लक्ष पुरवलं म्हणजे झालं.
काही आजारात मुलाला जंतूंविरूध्द लढाई द्यायची असते. त्यासाठी लागणारी शरीराची यंत्रणा, शक्तिमान अन् तयारीत असावी लागते. यासाठी प्रामुख्यानं पाण्याची अन् साखरेची जरूरी असते. साखर व पाणी कमी पडू लागलं. की सर्वच अवयव व संस्था यांचा प्रतिकार कमी पडून जंतूंना वरचढ होण्याची संधी मिळते. म्हणून आजारी मुलाला भरपूर पाणी व ग्लुकोज (साखर) देत रहावं. आजारात भूक व पचनशक्ती मंदावल्यामुळं मूल कमी खातं. पण द्रव पदार्थ तरी भरपूर लघवी होईल इतके द्रवपदार्थ तोंडानं सतत द्यायला हवेत. उलटया होत असतील तर मात्र डॉक्टरांना लगेचच सांगायला हवं.
आजारी मुलाची काळजी
- Details
- Hits: 11301
4
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
