Print
Hits: 8940

खरं तर कोणाच्या घरांत डोकावून विचारलं नसताना सल्ले देऊ नयेत. पण जवळ जवळ सगळ्याच घरातून ही सूचना आली की, अहो हे सगळं तुम्ही सांगताय ना, ते तुम्ही आतच्या आजी आजोबांना सांगा ना! त्यांना पटू दे, तरच काही उपयोग होईल.

काही मुलांच्या कानात जास्त पापुद्र सुटून त्याचा मळ तयार होतो. जोवर धुळीशी संबंध येत नाही तोवर हा मळ पांढरट असतो. त्यावर तेल घातल्यानं त्याच्या वडया व्हायला मदत होते. त्या काढण्यासाठी बाजारातल्या तयार ‘बड्‌स’ वापरल्या तर त्या चांगल्याच आत जाऊन मळाची घट्‌ट पुटं तयार होतात. म्हणून त्या न वापरता आंघोळीनंतर छोटयाशा कापसाच्या गोळ्यानं बाहेर दिसणारा, ओलसर झालेला मळ पुसून घ्यावा.

लहान मुलांची नखं फार भराभर वाढतात. ती वेळीच कापावीत. आठवडयातून दोन वेळा सुध्दा हे काम करावं लागतं. नखं छोटया कात्रीनं शेंवटचं पेर हातात धरून सहज कापता येतात. ती नेलकटरनं कापू नयेत किंवा ओढून तोडू नयेत. त्याच्या अंगाच्या विशिष्ट वासानं आई अन्‌ आईच्या अंगाच्या वासानं बाळ एकमेकांना ओळखतात आणि त्यांना छान वाटतं त्यांची हळूहळू जोडी जमते अन्‌ दूध येणं आणि पिणं या दोन्ही गोष्टी सहज जमतात. आणि चालू रहातात. अतिशय कमी वजनाच्या मुलांना विशिष्ट वजन झाल्याखेरीज आंघोळ घालत नाहीत. कारण आंघोळीमुळं मूल दमतं. त्यात बाळाची खूप शक्ती खर्च होऊन वजनवाढ कमी होते.

आपल्या मुलांना जुने कपडे किंवा वापरलेल्या कापडाचे कपडे किंवा वापरलेल्या कापडाचे कपडे करून आपल्याकडे वापराची पध्दत आहे. त्यात खूप फायदे आहेत. पहिलं म्हणजे कापड वापरातलं असलं म्हणजे पाणी आणि घाम शोषून घेण्यासाटी योग्य होतं. दुसरं, मूल झपाटयानं वाढत असतं, त्यामुळं नवीन महागाईचे लवकर बाद होतात त्यात पैसे वाया जातात. अजूनही प्रथा चालूच ठेवावी असंच वाटतं . फक्त कपडे स्वच्छ मात्र असायला हवेत.

अगदी छोटया २ महिन्यापर्यंतच्या बाळाला खेळणी म्हणजे काय, हे समजतही नाही आणि त्याची फार जरूरही नसते. १ महिन्यानंतर बाळाची नजर स्थिरावू लागते आणि मग काहीतरी भडक रंगाचं त्याच्या समोर टांगलं तर ते त्याच्या कडे पाहू लागतं. लाल रंगाच्या गोष्टीवर नजर चांगली स्थिरावते. त्यानंतर बाळाच्या हालचालींना चालना मिळेल, अशा तऱ्हेच्या वस्तू खेळणी म्हणून दिल्या तरी चालतात. रंगीबेरंगी ठोकळें गोळे रिंगा यात बाळ चांगलं रमतं या वस्तू इजा होणार नाही अशा तऱ्हेच्या असायला हव्यात. तोंडात घातले तर रंग निघू नयेत अशी असावीत. यांचा आकार मुलाच्या तोंडात जाणार नाही पण मुलाच्या हातात मावेल इतका असावा. शिवाय ती हलकी असावीत. स्वच्छ करता येतील अशी हवीत आपल्या सभोवतीची धूळ लक्षात घेता कापूस भरून केलेली खेळणी चांगली असली तरी योग्य ठरत नाहीत.

बाळ ४ महिन्याचं झालं की पालथं पडून हातांनी जमीन सारवायला लागतं. जमीनीवरच्या वस्तू हातात घेऊन त्या तोंडात घालायला लागतं आणि मग आपण करत असलेल्या सर्व स्वच्छतेवर पाणी पडतं. आता हे सगळं बाळ करतंच रहाणार असतं. मग आता आपण स्वच्छता करून काय उपयोग, असा विचार करून आपण करत असलेली सर्व स्वच्छता संपुष्टात आणू नये. इतकं तरी आपल्या हातात आहे ते तरी पाळू या, बाकीचं त्याच्या कडून पाळलं जात नाही त्यावरही लक्ष ठेवू या, अशी विचारसरणी ठेवून वागावं म्हणजे बाळाला आता होणाऱ्या जुलाबांवर थोडंफार नियंत्रण ठेवता येईल.