Print
Hits: 79006

उलटया, जुलाब, ‘दुखी’ सर्दी, खोकला, दमा, ऍलर्जी हे आजार मुलांना फार वेळा हैराण करतात. अगदी किरकोळ तक्रारी वाटल्या तरी त्यामुळं त्यावेळी बाळाला अन्‌ पालकांनाही होणारा त्रास खूपच असतो. हे आजार कधीना कधी तरी आपल्या बाळाला होणारच आहेत.

ते झाले तर लगेच आराम पडण्यासाठी काय करायला हवं, डॉक्टरांना लगेच दाखवणं केव्हा जरूरी आहे हे समजावून देण्यासाठी हा लेख आहे.

जुलाब:
जुलाब होण्याची कारणं आणि त्यावरचे उपाय वयानुसार वेगवेगळे असतात.

१ महिन्याहून लहान मुलांच्या जुलाबांबद्दल पूर्वी आलंच आहे. त्याशिवाय काही महत्वाच्या गोष्टी अशा की पहिल्या ४-५ दिवसातच मुलाला हिरवट, पातळ जुलाब होऊ लागतात. मूल नुकतंच अंगावर पिऊ लागलेलं असतं. इतर सगळं काही ठीक चाललेलं असतं पण या जुलाबांमुळं पालक घाबरतात. दर दूध पिण्यानंतर लगेचच काही मिनिटात अशी शी होत असली तर काळजी वाटते. हे जुलाब ४-५ दिवसात आपोआप थांबतात. अशा जुलाबांमध्ये मुलाचं पिणं चांगलं चाललेलं आहे ना व त्याचं वजन कमी होत नाही ना इकडं लक्ष द्यावं ते व्यवस्थित असलं म्हणजे काहेच काळजीचं कारण नाही. औषधं देण्याचही जरूरी नाही.

मात्र मूल नीट पीत नसेल, किरकिर करत असेल, ताप येत असेल, पोट फुगत असेल तर मात्र थोडी काळजी करण्यासारखंच असतं. मग शी तपासून त्यावर जरूर ते उपाय डॉक्टरांच्या सुचनेनुसार करावे लागतात. इतक्या लहान मुलाला ताप येणं हेच मुळी गंभीर आजाराचं लक्षण असतं. या नंतरच्या काळात (तीन ते सहा महिने) नवनवीन खाद्यपदार्थमुळं वेगवेगळ्या रंगरूपाची शी होत रहाते. त्यासाठी थोड्या निरीक्षणाची आणि अभ्यासाची जरूरी असते. काय खाऊ घातल्यामुळं कशी शी झाली याकडं नुसतं लक्ष ठेवावं पातळसर शी होणं हे दरवेळी पोट बिघडल्याचं लक्षण नसतं. याची मनात नोंद ठेवत गेलं की बर्‍याच काळज्या मिटत जातात.

६ महिन्यानंतरच्या जुलांबांबद्दल (दातांची काळजी या भागात) पूर्वी आलंच आहे. जेव्हा मुलाला वरचेवर जुलाब होतात तेव्हा ते कायमचे बंद करण्यासाठी उपायांची मागणी केली जाते. हे जुलाब वरचेवर होण्याचं कारणही तसंच असतं. मूल वरचेवर अस्वच्छ पदार्थ तोंडात घालून गिळत असतं. त्यापासून पुन्हा पुन्हा नव्यानं पोट बिघडत असतं. आत्ता नुकताच जुलाबावून बरा झाल्यावर पुन्हा कसे जुलाब झाले, अशा प्रश्नाचं त्यामुळं आपोआप उत्तरही मिळतं. जसजशी मुलाची प्रतिकारशक्ती वाढेल तसतसे असे पदार्थ पोटात गेले तरी त्यापासून जुलाब होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. मग ते जवळ जवळ कायमचे थांबतात. याला काही महिन्यांचा काळ जावा लागतो.

कधी कधी सर्दी खोकला सारख्या आजारातही मुलांच्या कोठयावर परिणाम झाल्यानं तात्पुरतं पोट बिघडतं, भूकही मंदावतं. मूळ आजार बरा झाला की हे सुधारतं. तोपर्यंत मुलाला सहज पचेल असा हलका आहार पुरवला की या जुलांबासाठी वेगळं काही करायची जरूरी नसते. तसंच काही इतर औषधांमुळंही जुलाब होऊ शकतात. उदा. ऍंटीबायॉटीक्स किंवा लोह असलेली टॉनिक्स. यामुळं होणारे जुलाब त्या औषधांच्या उपायांच्या फायद्यासाठी थोडा काळ सहनच करावेत.

जंतुजन्य जुलाब (इनफेक्शन):
या प्रकाराच्या जुलाब उलटयांच्या आजारात मुलाच्या तब्येतीवर आणि लक्षणांच्या तीव्रतेवर जुलाबांचे उपचार ठरतात. या आजारात मुलाला नुसते जुलाब होत असले तर तोंडानं मीठ, साखर, लिंबू, पाणी मिश्रण, भाताचे पेज, असे द्रव पदार्थ देत राहिलं तर डीहायड्रेशन (शुष्कता) होण्याचा धोका कमी होतो. नुसत्या पाण्यापेक्षा मीठ साखर लिंबू पाणी रसाची सरबतं, नारळ पाणी असे काही तरी द्रवपदार्थ पोटात जाणं आवश्यक असतं. अगदी उलटयां होत असल्या तरी! कारण, प्रत्येक उलटीवाटे प्यालेल्या द्रवाचा अर्धाअधिक भाग जरी पडून गेला तरी थोढा थोडा का होईना पोटात शिल्लक रहातो आणि त्याचा उपयोग नक्कीच होतो. असं थोडं थोडं एकत्र होऊन मिळाल्यामुळं डीहायड्रेशनचा धोका टळतो.

बाळाचे नेहमीचे आहार:
मुलाला उलटया होत राहिल्या तर, तोंडानं पाणी पाजण्याचा उपाय करणं शक्य होत नाही. म्हणून उलटया थांंबवण्यासाठी औषधांचा वापर करावा लागतो. उलटीची औषधंही पोटात टिकली नाहीत किंवा औषधं दिल्यानंतरही उलटया होतच राहिल्या आणि जुलाब फार मोठे होऊन पाणी पुष्कळ प्रमाणात बाहेर टाकलं जात राहिलं तर डीहायड्रेशन होतं आणि मग तोंडानं द्रव पदार्थ देऊन बरं वाटण्याची शक्यता कमी होते. अशा वेळी मुलाला शिरेतून सलाईन लावूनच बरं करावं लागतं. हे काम वेळीच केलं नाही आणि उलटया जुलाब मोठया प्रमाणात होत राहिले तर जिवाला धोका निर्माण होतो.

मुलाला खूप मोठे जुलाब, उलटया होत रहाणं, त्यानं तोंडानं काही घ्यायला नकार देणं, लघवीचं प्रमाण कमी होण, टाळू खोल जाणं, डोळे खोल जाणं, जीभ कोरडी पडणं, किरकीर वाढणं आणि मलूल होणं या गोष्टी धोक्याच इशाराच देतात. अशा वेळी विशेष उपचारांची उदा. सलाईन, इंजेक्शन, औषधं यांची जरूरी असते.

पुष्कळदा जंतुजन्य सौम्य आजारात औषधांची जरूरीही नसते. आपल्या आपणच हा आजार थोडया दिवसात बरा होत असतो. या आजारात मुलाला तोंडानं द्रवपदार्थ, शक्यतो मीठ साखर लिंबू पाणी, देत रहाणं हाच उपचार असतो. या सरबतालाच जलसंजीवनी (ORS ओरल डीहाड्रेशन सोल्यूशन ) म्हणतात. खेडयापाडयातून वैद्यकीय मदत नसलेल्या ठिकाणी मुलांना याच प्रथमोपाचारानं बरं वाटतं. पुष्कळ वेळा जीवघेण्या आजारातून जीवनदानही मिळतं.

बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या औषधी कंपन्यांनी तयार केलेली ही सरबाताची पाकीटं मिळतात. त्याची किंमत फार अवाजवी वाटते. पण ज्यांना परवडतात, घरात बनवणं जिकिरीचं वाटतं, मुलंही आवडीनं घेतात आणि ज्यात घटक पदार्थ योग्य प्रमाणात घातलेले असतात अशी सरबाताची (ORS) ची पाकीटं विकत आणून त्याचं सूचनांप्रमाणं सरबत करून मुलाला पाजायला काही हरकत नाही. मात्र या सरबाताची अनेक वेगवेगळ्या प्रमाणात तयार केलेली मिश्रणं मिळतात त्यातून योग्य करतांना पावडर आणि पाण्याचं प्रमाण सांभाळणं ही महत्वाची गोष्ट विसरून चालणार नाही. घरी सरबत तयार करतांना, हयात घोटाळा होण्याची शक्यता असते. १ लिटर पाण्याला ८ चमचे (४० ग्रॅम) साखर अ १ चमचा ( ३.५ ग्रॅम) असं प्रमाण असायला हवं. त्यात १/२ लिंबू पिळलेलं असावं.

जुलाबाच्या पहिल्याच दिवशी मूल ठीक असतांना शी तपासणं, औषध देणं याची जरूरी नसते. मूल ठीक वाटत असतांना शी तपासणं, औषधं देणं याची जरूरी नसते. मूल ठीक वाटत असलं (वर दिलेले धोके नसले) तर जुलाब आपणहून थांबण्याची वाट पहायला काहीच हरकत नसते. अशा अधूनमधून होणाऱ्या छोटया मोठया जुलाबांमुळंच आतडयाची प्रतिकारशक्ती आणि बाळाची सहनशक्ती वाढत असते. पण बरेच दिवस न थांबणारे जुलाब, जरी प्रकृति अगदी खालावत नसली तरी भूक न लागणं, किरकीर करत रहाणं, वजन तेच कायम रहाणं किंवा कमी होणं यासाठी शी तपासून जरूर तर योग्य ती औषधं घ्यावी लागतात.

दात येण्याच्या काळात तर (६ महिने ते १८ महिने) मुलाला रंगीबेरंगी, चिकट, पाताळ , फेस असलेली इ. रोज वेगवेगळ्या वर्णनांची शी बदलून बदलून होत असते. मात्र मूल अशी शी होत असतांनाही हसत खेळत असेल, तर अशा या शी साठी बाळाला औषधं द्यायची जरूरी नसते. कारण, शी मध्ये जरी दोष असला तरी त्यावर मात करण्यासाठी बाळात कुवत आहे हेच त्यातून समजत असतं. अशावेळी आपल्याला बाळासाठी औषध द्यायची असून त्याच्या शीच्या रंगरूपासाठी नाही, हे समजावून घ्यावं, यासाठी वेगवेगळ्या तपासण्या आणि औषधांची जरूर नसते.जुलाबाच्या आजारात काय करू नये?
या संबंधी काही सूचना देणं जरूर आहे. जुलाब थांबण्याची लोमोटिल सारखी औषधं किंवा अफू, जायफळ सारखे घरगुती उपाय करू नयेत. यामुळं आतडयाची हालचाल मंदावल्यामुळं तात्परते घरगुती उपाय करून नयेत. यामुळं आतडयाची हालचाल मंदावल्यामुळं तात्पुरते जुलाब थांबल्यासारखं वाटतं. पण जुलाबाची क्रिया आतडयात चालूच राहिलेली असते. त्या पदार्थांचा निचरा न झाल्यानं पुढे गुंतागुंत वाढते. अफू जायफळानं मूलं झोपतात, आतडयांची हालचाल कमी होऊन पोट फुगतं आणि तोंडानं काही घेतलं न गेल्यानं डीहायड्रेशन वाढण्याचीच शक्यता वाढते.

पूर्वीच्या जुलाबात ज्या औषधांमुळं मुलाला बरं वाटलं होतं तीच औषधं स्वत:च मनानं चालू करणं हे चूक आहे. अशा चुकीच्या उपचारांमुळे होणारी गुंतागुंत वाढत जाते.

होमिओपॅथी किंवा आयुर्वेदीय औषधांबद्दलही औषधं उपाय करून शकत नाहीत असा गैरसमज असल्यांन स्वत:च मनानं ही औषधं घेण्याकडे लोकांचा कल दिसतो. हे अत्यंत गैर आहे. ही औषध मुलाला दिली आहेत हे डॉक्टरांना न सांगणं हे उपचार करण्याच्या वाटेत अडथळाच आणतं.

एक वर्षानंतरच्या इतर उलटया जुलाबांबद्दल (पोट बिघडणं):
मुलाचं पोट बिघडलंय असं लक्षात आल्यावर सर्वात प्रथम विचार करायचा तो त्याच्या खाण्यांतच याचं कारण सापडतं. मुलांच्या खाण्याची नोंद पालकांनी घेतलेली असावी. घरी अजिबात भूक नसलेल्या मुलानं इतरत्र काही खाल्लंय का, याची माहिती मिळवावी. अपचन होण्याची मुख्य कारणं म्हणजे मांसाहार, अंडी, डाळी, उसळी, मिठाइ, केक, बिस्किटं, पेस्ट्रीज, इ. यांचं जास्त किंवा एकत्रित खाणं. अपचनामुळं झालेल्या उलटी जुलाबाचं निदान अगदी सोपं असतं. मुलाच्या उलटी आणि जुलाबाला अत्यंत घाण वास येतो. मुलाला खाण्याची अजिबात इच्छा नसते, आणि पुष्कळदा उलटी झाल्यावर मुलाला बरं वाटतं. एखादा वावगा किंवा विषारी पदार्थ खाण्यात आला असला तर हे उलटी जुलाब होणं हे शरीराच्या फायद्याचंच असतं. मुलाला डीहायड्रेशन कसं होणार नाही हे पाहिलं म्हणजे पुरतं. पदार्थाचा निचरा झाला की हे जुलाब आपोआप थांबतात. आणि भूक १-२ दिवसात पूर्ववत लागते.

सर्दी खोकला ताप:
वरचेवर होणाऱ्या या किरकोळ आजारानं दोन तीन दिवस का होईना पण मुलं(अन्‌ मोठी माणसंही) हैराण होतात. हा आजार पुष्कळदा व्हायरस (विषाणू) मुळे ऋतुबदल होतांना होतो. बरेचदा संसर्गजन्य असल्यानं त्याच्या साथीच येताना दिसतात. २-३ दिवसांच्या त्रासानंतर आपण होऊन हा आजार आटोक्यात येतो. मात्र औषधांच्या मदतीनं यात होणारे त्रास कमी करता येतात.

लहान मुलांमध्ये पुष्कळदा कांजिण्या, गोवर आणि तत्सम आजारांची सुरूवात सर्दी ताप खोकल्यानं होते अन्‌ एक दोन दिवसातच अंगावर विशिष्ट प्रकारची पुरळं उठतात. आणि इतर सर्व लक्षणंही दिसू लागतात. जोपर्यंत आजाराची सगळी लक्षणं किंवा खुणा दिसत नाहीत तोपर्यंत या वेगवेगळ्या आजारांचं निदान होऊ शकत नाही. कधी कधी प्राणघातक गंभीर आजाराची सुरूवात सुध्दा किरकोळ सर्दी खोकल्यांनं होऊ शकते.

मुलांना सर्वच आजारात विश्रांतीची जरूरी नसते. पण मूल बिछान्यात पडून राहू लागलं की काहीतरी काळजी करण्यासारखं नक्कीच आहे असं समजावं. यासाठी अधिक काळजी घेण्याची व जलद उपचारांची जरूरी असते.

तापासाठी पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन, किंवा दोन्ही, नाक चोंदल्यास_ फारच त्रास होत असल्यास नाकात टाकण्याचे थेंब, सर्दी खोकल्याची नेहमीची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानं नेहमी घरी ठेवून कोणत्या प्रमाणात कशी वापरावीत हे माहिती करून घ्यावं आणि त्यानुसार प्रथमोपचार म्हणून घरी वापरावीत.

औषधांचा वापरही अगदी क्वचित करावा. फारच त्रास होत असला तर वापरण्यासाठी राखीव ठेवावीत. हसत्या खेळत्या मुलाला नाक गळतंय म्हणून औषधं देण्याचं टाळावं, खाणं, पिणं, झोप यात फारसा बदल होत नसेल तर किरकोळ त्रासासाठी औषधं दिली तर, आजार परवडला औषधं नको असं वाटण्याची शक्यता असते. म्हणूनच अगदी गरज असल्याशिवाय औषधं देऊ नयेत. बाळाच्या तब्येतीतल्या चढ उतारांकडं, नवीन येणार्‍या लक्षणांकडे नीट लक्ष देत रहावं आणि असं काही आढळल्यास लगेच डॉक्टरांच्या निदर्शनाला आणून द्याव.

दुखी:
अनेक प्रकारच्या ‘दुखी’ मुळे लहान आणि मोठे लोक हैराण होतात. दुखीचे प्रकार अनेक असले, त्याची कारणं अनेक असली तरी सर्वांवर प्रथमोपचार एकच आहे. मुलांच्या दात किडण्यानं दात दुखी, सर्दीबरोबर कानदुखी, वाढीच्या वयातली पायदुखी या नेहमी येणाऱ्या तक्रारी. यासाठी आयुबुप्रोफेन आणि पॅरासिटॅमॉल ही औषधं घ्यावीत. ही औषधं दिल्यावर तात्पुरता ४ तासांपर्यंत तरी आराम मिळतो. तो मिळाला नाही किंवा दुखणं वाढलं तर मात्र डॉक्टरांना दाखवायला हवं.

पोटदुखीचं थोडंसं वेगळं आहे. बॅरालगान्‌ ऍन्ट्रेनिल सारखी औषधं प्रथमोपचार म्हणून द्यावीत. यानंतर आराम पडला नाही तर काही गंभीर कारण तर नाही ना हे पहावं लागतं. मुलांच्या अचानक सुरू झालेल्या डोकेदुखी, मानदुखी कडे मात्र थोडंसं जास्त काळजीपूर्वक पहावं लागतं. औषधं देऊनही परत दुखत असलं तर डॉक्टरांना लगेच दाखवावं हे बरं!