Print
Hits: 46289

आपल्याबाळाला अंगावर पाजणं ही अगदी नैसर्गिक भावना सर्व सस्तन प्राण्यांत दिसून येते. माणसाच्या बाबतीत मात्र बर्‍याच नैसर्गिक ऊर्मी दाबून टाकल्या जाताना दिसतात. जितकं जसजस आपण सुधारत जातो.

शिक्षणानं, पैशानं, यंत्रांनी या नैसर्गिक गोष्टीवर एक प्रकारचं दडपण येतं आणि त्याचा समतोल बिघडतो , आणि म्हणूनच अशा विषयाबाबत गैरसमजुतींमुळं आणखी वाईट परिणाम होऊ नये म्हणून, शिकविण्याची वेळ येते.

एक गोष्ट मात्र खूपच समाधानाची आहे ती म्हणजे, अजून तरी आपल्या देशात, स्त्रियांना ‘अंगावरच दूध आपल्या बाळाला द्या’ असं विनवावं लागत नाही. सर्वच स्त्रिया आपल्या बाळाला आपलं दूध पाजण्यासाठी उत्सुक असतात. पण काही गोष्टींबद्दलच अज्ञान आणि काही गोष्टींबद्दलच्या गैरसमजुती यामुळं अंगावरच्या दुधाचा फायदा पूर्ण पणे बाळाला मिळत नाही.

बाळाला आईचं दूध मिळावं यासाठी निसर्ग बरीच व्यवस्था करीत असतो. गर्भ २० आठवडयाचा झाल्यानंतर कधीही प्रसूती झाली तरी आईला त्याला पाजण्यासाठी दूध यावं अशी नैसर्गिक शारीरिक तयारी झालेली असते. मुलाच्या वया-वजनानुसार त्याला हवं तसं दूध आईकडून मिळावचीही व्यवस्था होत असते. यासाठी गरोदरपणाच्या शेवटच्या ३ महिन्यांत आईच्या अंगावर चरबी साठवली जाते. त्यामुळं तिच्या शरीराचा आकार बदलेला जातो. यानंतर आईचा आहार जरी अपुरा पडला तरी बाळाला उत्तम दूध मिळत रहावं यासाठी ही व्यवस्था असते. वाढलेलं वजन आणि आकार बाळाला अंगावरचं दूध मिळावं यासाठी आईनं स्वत:ची थोडी तयारी करायला हवी. गरोदरपणीच आगामी जबाबदारीची जाणीव व्हायला लागते पण पूर्ण कल्पना मात्र प्रत्यक्ष मूल सांभाळतानाच येते. अंगावरचं दूध पाजणं ही अडचणं वाटते आणि स्तनपानाला सोपे पर्याय सापडल्यामुळं हे जिकिरीचं काम कमी करावसं वाटतं. पण हे पूर्ण चुकीचं आहे.

बाळासाठी अंगावरच्या दुधाइतकं चागलं अन्न दुसरं कोणतंही नाही. या दुधात बाळाला हवी असलेली पोषणद्रव्यं तर असतातच पण रोगप्रतिबंधक शक्तीही असते. याच गुणांमुळं हे दूध इतर कोणत्याही दुधापेक्षा सरस ठरतं. ते निर्जंतुक असतं, शिवाय बाळाला हवं तेवढं, हवं तेव्हा मिळू शकतं.

बाळाला अंगावर पाजण्याच्या निमित्तानं जी जवळीक आणि मायेचे स्पर्श बाळाला मिळतात, त्यानंच त्याचं आईशी खूप जवळचं नातं निर्माण होत असतं आईच्या स्पर्शाची, वासाची, आवाजाची आणि अस्तित्वाची ओळख बाळाला अशा जवळीकीतून होत असते. ही ओळखच त्याचं नातं आणखी पक्कं बनवते. अशा तऱ्हेने अंगावरचं दूध पिणाऱ्या मुलांची वाढ झपाटयाने होऊ लागते अन्‌ त्याचे भूक वाढून, ते जास्त जोरानं पिऊ लागतं. अशा पिण्यामुळं आईलाही दूध भरपूर येत राहतं आणि अशी त्यांची जोडी चांगली जमून स्तनपान चांगल्या रीतीनं चालू रहातं. अशी जोडी जमून येण्यासाठी आईच्या मनाची खूपच तयारी असणे आवश्यक आहे. तिचा आत्मविश्वास आणि बाळाला दूध देण्याची प्रबळ इच्छा यांवरच भरपूर दूध येणं अवलंबून असतं. आईची प्रबळ इच्छा आणि बाळानं त्याला दिलेला प्रतिसाद जर चांगला असेल तर कोणत्याही विरूध्द उपयांनी हे थांबत नाही, अगदी दूध बंद पाडण्याच्या औषधांनी सुध्दा! इतकंच नव्हे तर दत्तक घेतलेल्या बाळालाही पाजायचं ठरवलं तर दूध येऊ शकतं! याची माहिती आईला असण्यानं तिचा आत्मविश्वास वाढतो.

स्तनपान करून नवीन बाळ स्वत: वाढवण्याचा आणखी एक मोठा फायदा असतो तो म्हणजे आईला तिच्या आईला कराव्या लागलेल्या कष्टांची, झालेल्या त्रासाची खरी जाणीव झाल्यानं तिच्या बद्दल प्रेम आणि आदर वाढून त्यांचं आई- मुलाचं नातं आणखी पक्कं होतं. मनाच्या तयारी इतकीच स्तनांची तयारीही महत्वाची. बोंडशी नीट तयार नसेल तर बाळ दूध पिऊ शकत नाही. नाहीतर दहाजणींपैकी एकीचं दूध बाळाला नीट पिता न आल्यानं बंद पडतं. आत गेलेली बोंडशी साध्या उपायांनी पुढे येत नसेल तर सिरींजने ओढून तयार करता येतात.

बाळ जन्मल्यावर लवकर अंगावर पाजायला घ्यावं.
बाळ जन्माला आल्या बरोबर लवकरात लवकर म्हणजे १/२-१ तासातच, दोघांचाही थकवा गेल्याबरोबर, एकमेकांनी जवळ येणं आणि बाळाला आईच्या अंगावर चोखू देणं ही यशस्वी स्तनपानाची सुरूवातच.

असं केल्यानं लवकर दूध यायाला सुरूवात व्हावी अशी तयारी निसर्गानं खूप आधीच केलेली असते. त्याचा आपण उपयोग करून मात्र घ्यायला हवा. अगदी ऑपरेशन झालेल्या आईला सुध्दा इतरांच्या मदतीनं हे करता येईल. तिची उत्सुकता आणि इतरांना तिला मदत करायला भाग पाडेल. आणि त्याचा फायदा झालेला पाहून सर्वांचीच या उपक्रमाबद्दल खात्री पटून सर्व आयांना अशा तर्‍हेने लवकर दूध पाजायला घेण्यासाठी तेही सुचवतील.

सुरूवातीला येणारा चीकही बाळासाठी फार मोलाचा असतो.
यात रोगप्रतिकारक सत्वं भरपूर प्रमाणात असतात. प्रत्येक आईनं तिच्या बाळासाठी दिलेली ही पहिली जपणुकीची ठेवचं! तिचा फायदा प्रत्येक बाळाला मिळालाच पाहिजे. म्हणून हे दूध काढून फेकून देणं सर्वस्वी चूक आहे. एक दोन दिवसांतच आईचं दूध येणं चांगलं वाढतं आणि दर २ तासांनी बाळाला पोटभर पाजण्याइतकं ते येऊ लागतं अशा वेळी कंटाळा न करता बाळाला दर २ तासांनी रडलं की देत राहिलं पाहिजे. पहिल्या आठवडयात बाळाला पाजण्याचं वेळापत्रक बनवणं जरूरी नाही. बाळानं ‘मागितलं की द्यायचं’ हेच धोरण ठरवायचं.

१-२ आठवडयांतच बाळाला, हा दिवस- ही रात्र असं समजायला लागतं आणि बाळ स्वत:चं वेळापत्रक बसवून टाकतं. दिवसा साधारणपणे २-२ ॥ तासांनी तर रात्री ३ ते ४ तासांनी ते अंगावर पितं. ५ ते १० मिनिटांत पोटभर पिऊन झोपी जातं ते थेट पुढच्या पिण्याच्या आधी उठतं.

काही मुलं मात्र प्याल्याबरोबर शी करतात. पिता पिताही शी, शू करतात. यात काही काळजी करण्यासारखं नसतं. अंगावरच पिऊन तृप्तपणे बाळ झोपतंय म्हणजेच त्याला दूध नक्की पुरं पडतंय. त्यासाठी सारखं वजन सुध्दा करून पहायची जरूरी नाही.

अशा प्रकारानं बाळाला पहिले ३ महिने तरी फक्त अंगावरचंच दूध पाजावं. हे दूध देत असताना वरचं पाणी पाजायची गरज नाही. दुधातलंच पाणी मुलाला पुरेसे असतं. काही कारणानं म्हणजे आईच्या गंभीर आजारांमुळं, किंवा आस्तनातल्या गाठी, गळवांमुळं तिला बाळाला पाजणं शक्य होत नाही, तेव्हा तात्पुरतं दुसरं कोणतं तरी दूध बाळाला द्यावं लागतं. पण आईनं स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देता त्या काळानंतर परत बाळाला पाजायला घेतलं तर परत पहिल्यासारखचं दूध येऊ शकतं.

आईच्या किरकोळ आजारात बाळाला पाजणं बंद करायची जरूरी नसते.
चांगलं दूध येत असताना ते बंद किंवा कमी करून आईला कामावर हजर व्हावं लागतं त्याबद्दल मात्र खरंच फार वाईट वाटतं. यासाठी आईला बाळाला दूध पाजण्यासाठी वेगळी रजा मिळावयची सोय हवी किंवा मग कामाच्या ठिकाणीच बाळाच्या सांभाळाची आणि त्याला पाजण्याची सोय केली पाहिजे. हळू हळू स्त्रीच्या हक्कांविषयी आपण जागृत होत आहोत. त्या हक्कांपैकीच हा प्रमुख हक्क मानला पाहिजे. तसंच बाळाचाही तो ‘जन्मसिध्द हक्क’ आहे याचा विसर पडता कामा नये.

भारतातही काही राज्यांमध्ये (उदा. हरियाणा) ६-६ महिने पर्यंत रजेची सोय झालीही आहे. आपल्याकडे सर्वांसाठी ही सुधारणा होईपर्यंत पगारी रजा न मिळाल्यास बिनपगारीही रजा घ्यावी. पण बाळाला आईचं दूध द्यावं इतकं या दूधाचं महत्व आहे. याच्या भविष्यातल्या फायद्यांकडं पाहता ही वेळेची, पैशाची , आणि मायेची एक प्रकारची गुंतवणूकच आहे असं वाटतं. जेवढी आपण यात गुतंवणूक करू त्याच्या कितीतरी पटीनं बाळाच्या पुढच्या आजारांमध्ये खर्च होणारा वेळ, पैसा, (आणि मनस्तापही) वाचतो म्हणजेच परत मिळतो. अंगावरचं दूध किमान ६ महिने मिळालेल्या मुलांमध्ये जुलाब, उलट्या न्मूमोनिया इ. आजाराचं प्रमाण वरचं दूध प्यालेल्या मुलांमधल्या या आजारांच्या प्रमाणापेक्षा खूपच कमी असतं.

अंगावरच दूध काढून ठेवलं तर २-३ तास सहज छान रहातं.
ज्या आईला कामावर जाणंच भाग आहे. पण बाळालाही पाजायची इच्छा आहे, तिनं सुटीत घरी परत येऊन बाळाला पाजावं किंवा दूध काढून ठेवून, साठवून, आपण नसताना भुकेच्या वेळेला ते देण्याची व्यवस्था करावी.

फ्रीजमध्ये ८ तासांपर्यंत छान रहातं. हे दूध कोमट पाण्यात वाटी ठेवून किंवा अगदी गारही बाळाही पाजलं तरी चालतं. अंगावरचं दूध उकळायची जरूरी नाही. उलट उकळल्यामुळं त्यातली रोगप्रतिबंधक द्रव्यं कमी होतात. अंगावर दूध पिणाऱ्या मुलांच्या दैनंदिन कार्यक्रमाबद्दल माहिती असणं महत्वाचं आहे. या दुधाची शी पातळ होणं शी बिघडल्याचं लक्षण नसून ते योग्य आहे. ही शी हळदीच्या पिवळ्या रंगाची असते आणि थोड्या वेळानं शीचा लंगोट हिरवा होतो. त्यात काळजीच काहीच कारण नाही. शी दूध पिता पिता किंवा नंतर लगेचही होते. अशी मुलं दिवसाकाठी १०-१२ वेळा सुध्दा शी करताना दिसतात. पण त्याचा त्यांना काहीच त्रास होत नसतो. त्यांनी डीहायड्रेशन होत नाही उलट त्याचं वजन समाधानकारक रीतीनं वाढत असतं.

या उलट वरच्या दुधाची (गाईचं, म्हशीचं किंवा डब्यातल्या पावडरचं) शी दिवसातून एकदा किंवा कधीकधी २ दिवसांतून एकदा घट्‌ट, दुपारी सुध्दा खराब न करणारी होते. हे दूध पचायला जड असल्यांनं बाळाचं पोट बराच वेळ भरलेलं राहून भूक उशीरा लागते. त्यामुळं एकूणच पाजण्याचा, स्वच्छतेचा वेळ वाचून बराच वेळ रीकामाही सापडतो. हे दूध दुसऱ्या कोणीही दिलं तरी चालतं म्हणून आईला बालाजवळच असायचं बंधन रहात नाही. अशा वेळी वरचं दूध पाजायचा मोह होणं सहाजिकच आहे. त्यातून पुन्हा नोकरीवर जाण्याचे वेध लागलेले असतात. दिवसभराचे हे श्रम जास्त वाटून, वरचं दूध पिऊन लठ्‌ठ झालेल्या मुलांचे डब्यावरचे फोटो पाहून, तेच दूध द्यावसं वाटू लागतं अन्‌ या कल्पनेनं आणि त्याच्या सुलभ उपलब्धतेमुळं आपोआप अंगावरचं दूध कमी होऊ लागतं. आजकाल आजूबाजूला निर्माण झालेल्या फसव्या आकर्षणाच्या आहारी न जाता थोडे जास्त कष्ट झाले तरी अंगावरच्या दुधाच्या बाजूनंच रहाण्याचा आईनं निश्‍चय करून तो अंमलात आणला पाहिजे. यातच त्यांचं आणि बाळाचं भलं आहे.

बाळाला पाजताना बाळाला आणि आईला आरामशीर वाटणं महत्वाच. आईनं अवघडत बसून पाजलं तर थोडयाच वेळात पाठ दुखायला लागून, अंगातून घामाच्या धारा वाहू लागून कधी एकदा हे पिणं संपतंय असं वाटू लागतं. असा त्रास होऊन त्यातलं सुख नाहीसं झालं की आईचं मानसिक बळ संपतं आणि तिलाही हे अवघड वाटू लागतं. मग दूध कमी येऊन बाळ रडू लागतं आणि संगळंच बिनसतं. हे टाळून दोघांनाही समाधान मिळेल आणि आराम मिळेल असं भिंतीला टेकून बसून शांत चित्तानं, आत्मविश्वासानं बाळाला पाजलं तर बाळ चांगलं पिऊ शकतं आणि त्याचं पिणं, शांत झोपी जाणं पाहून आईचा आत्मविश्वास दुणावतो. दूध येत असल्याची खात्री होते कोणीही समजावून सांगण्याची, कोणाच्याही आधाराची, मदतीची जरूरी रहात नाही.

पाजून झाल्यावर किंवा फार भराभर पिणाऱ्या मुलांच्या बाबतीत तर पिता पिता मधेच थांबूनही ढेकर काढावेत म्हणजे लगेचच होणाऱ्या दुधाच्या उलटया, अस्वस्थपणा, पोटदुखी, रडणं, गॅसेस अशा पुढच्या गोष्टी टाळता येतील.

कधी कधी ढेकर काढल्यानंतर काही मुलांमध्ये दहयासारखी उलटी होते. थोडीशीच गुळणी येत असेल तर घाबरू नये. जास्त होत असल्यास एकदम खाली आडवं न करता थोडसं तिरकं उजव्या कुशीवर झोपवावं. पण प्रत्येक वेळीच भरपूर उलटी व्हायला लागली तर मात्र डॉक्टरांना दाखवावं.

दूध पाजताना मूल झोपी जातं तेव्हा त्याच्या तोंडातून स्तन ओढून बाहेर काढताना निपल दुखावून त्याला चिरा पडतात आणि म्हणून पुढच्या वेळी बाळाची स्तनावरची पकड सोडवावी. म्हणजे अलगदपणे त्याला बाजूला करता येईल. तसंच पितांना नाक मोकळं रहाते आहे ना हेही पहावं. मुलाला पाजण्यासाठी निजून त्याच्या तोंडात स्तन देण्याची पध्दत सोपी पण चुकून झोप लागल्यास बाळ अंगाखाली दाबलं जाऊन दगावल्याचीही उदाहरणं आहेत. म्हणूनच ही पध्दत अजिबात अवलंबू नये.काय करू नये?
ज्या आईला कामावर जाणंच भाग आहे, पण बाळालाही पाजायची इच्छा आहे, तिनं सुटीत घरी परत येऊन बाळाला पाजावं.