Print
Hits: 92551

अगदी सूक्ष्म अशा बीजापासून ते पूर्ण प्रगल्भ विकसित प्रौढ मनुष्यापर्यंतच्या प्रवासात होणाऱ्या शरीराच्या, मनाच्या, बुध्दीच्या बदल अन्‌ घडामोडींना ‘वाढ’ असं सक्षिप्त नांव दिलंय. यात नुसतीच शरीराच्या आकाराची वाढ अभिप्रेत नाही. पण या भागात आपण फक्त शारीरिक वाढीचा आढावा घेऊ या.

माणसाच्या शरीराचा वाढीचा सर्वात जास्त वेग, तो पोटात गर्भावस्थेत असतानाच्या शेवटच्या काही महिन्यात असतो. या नंतरच्या आयुष्यात याच्या खालोखालचा वेग असतो तो वयात येतानाचा. या दोन्ही वेळा शरीराच्या आकारात आणि अवयवांच्या विकासात झपाटयानं बदल होत असतात.

उंची
काही वनस्पतींमध्ये जशा एकाच वनस्पतीच्या अनेक जाती असतात, आणि त्या आपापले गुणधर्म सांभाळत वाढत असतात, तसंच माणसाचंही असतं. काही जाती, आणि वंश हे धिप्पाड, उंच असतात तर काही नाजूक, खुजे, लहान चणीचे असतात.

मुलांच्या वाढीच्या वेगातही बरीच विविधता बघायला मिळते. काही मुलं लवकर वयात येतात तर काही उशीरा. हे वयात येणं अनुवांशिक असतं. तसंच बाहेरच्या अनेक गोष्टींच्या प्रभावावरही ठरत असतं. जितकी समृध्दी आणि शिक्षण जास्त, तितकं वयात येणं लवकर असं समजलं जातं. या न्यायानं पाश्‍चात्यांचा आणि आपल्या समाजातल्या वरच्या वर्गातल्या मुली अन्‌ मुलगे त्यांच्या बरोबरच्या खालच्या वर्गातल्या मुलामुलीपेक्षा आणि खेडयातल्या अविकसित भागातल्या मुलामुलींपेक्षा लवकरच वयात येताना दिसतात.

वयात येतांना वजन आणि उंची झपाटयानं वाढतात. वयात येण्याची क्रिया मुलींमध्ये १० ते १२ या वर्षात होते तर मुलांमध्ये १४ ते १६ या वर्षात होते. याकाळात मुलं फारच वेगानं वाढतात. सर्व मिळून १० ते १५ किलोपर्यंत सुध्दा वजन याकाळात वाढू शकतं आणि ६ ते १० इंच उंची सुध्दा ! ही वाढीची प्रक्रिया तेव्हा पूर्ण होते आणि त्यानंतर मात्र वाढ जवळजवळ थांबतेच, आणि मूल पूर्ण वाढलं असं आपण समजतो. जी मुलं अकाली वयात येतात, तेव्हा ती वेगानं जरूर वाढतात पण ही क्रिया लवकर थांबल्यानं त्याची उंची कमी भरण्याची शक्यता असते, वयात येण्याचं वय, वाढीचा वेग आणि ती संपून वाढ थांबण्याचं वय या सगळ्या गोष्टी निसर्गतःच आपोआप होत असतात. यावर अनुवंशिक बाबींचा प्रभाव पडतोच. पण आजूबाजूच्या गोष्टींमधे घडलेल्या बदलांमुळं उदा. समृध्दी, शिक्षण, चांगलं चुंगलं खाणं-पिणं, स्वातंत्र्य, मोकळीक या सगळ्या गोष्टींचा चांगला परिणाम म्हणून या गटातल्या मुलांची मोठेपणाची ठेवण थोडी सुधारून ती आपल्या आईवडिलांपेक्षा उंच, वजनदार झालेली दिसतात.

शरीराची निरोगी अवस्था, मेंदूतून मिळणाऱ्या प्रेरणा, मानसिक स्थिती, आहार, व्यायाम, आणि वाढीसाठी आवश्यक ती संप्रेरकं, आणि त्यांच्या चेतना या सगळ्याचा योग्य तो मेळ बसणं, आणि शरीरातल्या सर्व अवयव संस्थाच्या पेशींनी त्या आदेशांना जुमानून योग्य तो प्रतिसाद देणं अशा सर्व गोष्टींच्या सुयोग्य समतोलामुळं शरीराची वाढ होत जाते आणि योग्य वेळी थांबतेही. खरोखरीच नीट विचार केला तर ही सगळी प्रक्रिया थक्क करून टाकणारी आहे. यात कुठंही गडबड गल्लत होऊ शकते पण ते केवळ अपवादानंच, एरवी योग्य वाढ होणं हा जणू निसर्ग नियमच आहे!

उंची वाढवण्यासाठी काही उपाय असतात का? या बुटक्या आईवडिलांचा अगदी जिव्हाळ्याचा, आणि महत्वाचा प्रश्न असतो. त्यांना स्वत:ला आलेल्या मानसिक ताणातून निदान आता आपल्या मुलाला तरी जावं लागू नये अशी अतिशय प्रामाणिक इच्छा असते. त्यासाठी ते शक्य झाल्यास काही महागडे उपाय करायला तयार असतात. इथेच काही गैरसमजुतींमुळं आणि चुकीच्या माहितीमुळं त्यांची दिशाभूल होण्याची दाट शक्यता असते. अतिशय महागडे ठरलेले ( उदा. ग्रोथ हार्मोनचे) उपायही जरी वापरले तरी मोठेपणाची मुलांची ठेवण हा निदर्गदत्त अनुवंशिक गुण (दोष ) आहे. त्यात बदल घडवता येत नाही. अशा उपायांनी त्या वयांत मुलांची वाढ, ती औषध योजना चालू असते तोवर नेहमी पेक्षा वेगानं होते सुध्दा पण त्यामुळे ती लवकर संपते आणि पुन्हा मोठेपणची चण शेवटी त्याच्या आईवडिलांवरच जाते.

अशा मुलांच्या आईवडिलांना योग्य त्या सल्ल्याची आणि मार्गदर्शकाची अत्यंत जरूरी आहे. त्यानी काही गोष्टींचा वस्तुस्थिती म्हणून स्वीकार करायला हवा आणि आपलं मूलही आहे तसं, आनंदपूर्वक स्वीकारायला हवं. यासाठी डॉक्टर जरूर मदत करतील. यामुळं मुलांचा स्वत:च्या उंची कडं पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि त्यांच्या मानसिक वाढीवर चांगला परिणाम झालेला दिसतो. मुलाला त्याच्या बुटके पणामुळं न्यूनगंड कसा निर्माण होणार नाही हे पालकांनी जागरूकतेनं पाहिलं पाहिजे. यासाठी अवाजवी अपेक्षा ठेवून त्यासाठी सतत निष्फळ प्रयत्‍न करणं सोडून देण्याची आवश्यकता आहे.

सुरवातीला पटलेल्या या कल्पना पुन्हा एकदा शंका निर्माण करतात ते मूल ‘वयात येण्याच्या’ वयात आलं की, इथं आणखी अशीच एक गोष्ट घेण्यासारखी आहे ती म्हणजे वेगवेगळ्या मुलांच्या ‘वयात येण्याच्या’ वयात तफावत असते. मुलानं किंवा सोळावर्षानंतरही वयात येण्याचे शारीरिक बदल दाखवले नाहीत तर मात्र काही तरी मोठा दोष असण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणं जरूरी असते.

वजन:
बाळ जन्माला आल्याबरोबर मुलगा का मुलगी याची माहिती मिळाल्यावर पुढचा प्रश्न येतो तो वजनाचा. वजन चांगलं असणं हे जणू त्याच्या तब्येतीचं महत्वाचं लक्षण.

थोडंफार ते खरंही आहे. कमी वजनाच्या मुलांचे अनेक जीवघेणे प्रश्न असतात. ते इतरत्र सांगितलेही आहेत. वजन कमी असणं हा बाळाच्या जिवाला मोठा धोका असतो. विशेष वेगळी काळजी न घेतल्यासही बाळं दगावण्याची शक्यता फार असते. या बद्दल माहिती करून घेणं फार जरूरीचं आहे. तीही त्याच विभागात सांगितली आहे.

बाळाचं वजन गर्भावस्थेत वाढणं हे त्याच्या आईच्या वयावर, सांपत्तिक स्थितीवर, स्वास्थ्यावर, शरीरिक, मानसिक स्थितीवर, बाळंतपणाच्या खेपेवर, तिला गरोदरपणी होणार्‍या आजारांवर, औषध उपायांवर, तिनं घेतलेल्या नको त्या पदार्थांवर उदा. दारू, तंबाखू, मिश्री, इत्यादी यावर आणि गर्भाच्या संख्येवर अवलंबून असतं. आदिवासी स्त्रियांना दारूची सवय असते. त्याचेही दुष्परिणाम होतातच. या बद्दल स्त्रियांना माहिती करून देण जरूरीचं आहे. भारतीय बाळाचं सरासरी वजन २.८ किलो असतं. जन्मत: मुला मुलीत वजनात काही फरक नसतो. पण जगण्याची क्षमता, प्रतिकारशक्ती, या सगळ्यात मुलीच अधिक उजव्या ठरतात. जन्मानंतरच्या वाढीत मात्र मुलगे मुलीपेक्षा सरस असतात.

जन्मवजनाच्या दुप्पट ४ महिन्याला, तिप्पट १ वर्षाला, चौपट वजन २ वर्षाला.
मुलांची भूक ही वजन आणि उंची वाढण्याच्या गरजेप्रमाणं असते. जरूरीपेक्षा जास्त आहार बळजबरीनं खायला घालून त्यात फारसा बदल करता येत नाही. उलट इतर तक्रारी सुरू होतात. मुलाच्या जन्मवजनावर, नैसर्गिक ठेवणीवर आणि अनुवंशिक गुणांवर विचार करून हे मूल मोठेपणी कसं होणार याच अंदाज करता येतो. मुलांच्या जन्मत:च्या वजनाकडं, त्याच्या वजनवाढीच्या प्रकाराकडं आणि ठेवणीकडं पाहून व त्याच्या आईवडिलांच्या आणि आजी आजोबांच्याही वजनाकडं पाहून म्हणजेच अनुवंशिक गुणांवर विचार करून ते मूल मोठेपणी कसं होईल याचा अंदाज करता येतो. हे मागेच सांगितलं आहे.

मुलांच्या पहिल्या काही वर्षातला लठ्‌ठ पणा हा त्यांच्या मोठेपणीच्या लठ्‌ठ पणाचं मूळ असल्याचंही आता संशोधनात लक्षात आलं आहे. अशी ही लठ्‌ठ मुलं नंतर तरूणपणी जरी सडसडीत (ठीक ) दिसली तरी पुन्हा चाळीशी नंतर लठ्‌ठ होण्याची दाट शक्यता असल्याचं दिसून आलंय. या लठ्‌ठ पणामुळंच मोठेपणी हृदयविकार, रक्तदाब यासारखे विकार बळावत असल्याचंही सिध्द झालयं. म्हणून मुलाचं वजन वाजवीपेक्षा जास्त असणं, ते छान दिसत असतं तरी, योग्य नाही. याकाळात खाल्लेल्या आणि शरीरावर जमलेल्या चरबीचा परिणाम इतका दूरगामी होऊ शकतो हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. त्याप्रमाणंच लहान मुलांचा आहार चरबीयुक्त कसा राहणार नाही याकडं लक्ष पुरवलं पाहिजे. तसंच चॉकलेटस्‌, मिठाइ यातून, मुलांना वरच्या दुधातून आणि दुधाच्या पदार्थातून ही जास्तीची चरबी मिळत असते.

लठ्‌ठपणा
यातही अनुवंशिकतेचा मोठाच प्रभाव आहे. घराण्यात पिढीजात अवाजवी लठ्‌ठपणा असेल तर मूल लहानपणी गोंडस दिसलं तरी मोठेपणी लठ्‌ठच होणार हे आधीच जाणून ते कमी करण्याकडे प्रयत्‍न ठेवावेत. आईवडील दोघेही लठ्‌ठ होणार हे आधीच जाणून ते कमी करण्याकडे प्रयत्‍न ठेवावेत. आईवडील दोघेही लठ्‌ठ असतील. तर सत्तर टक्के वेळा मुल जाड होण्याची शक्यता असते. तर एक जण लठ्‌ठ असल्यास ती ५० टक्के असते. दोघेही लठ्‌ठ नसले तरी, आजकालच्या राहणीमानामुळे पुढच्या पिढीत लठ्‌ठपणा येण्याची शक्यता कायमच असते.

लठ्‌ठ मुलांनाही जास्त वजनामुळं अनेक व्याधींना तोंड द्यावं लागतं. त्यांच्या शारीरिक तसंच मानसिक वाढीवर, स्वभावावर या वजनवाढीचा परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. त्यांची एकूण जगण्याची पध्दतीच इतरांपेक्षा वेगळी होत जाते, आणि ते एकाकी पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी आईवडिलांनी खूपच प्रयत्‍नशील रहावं लागतं.

वजन कमी वाढणं
ही तक्रार मात्र नेहमीच ऐकू येते. खरं तर मुलं छान खेळत पळत असतात, उत्साही असतात. त्यांचे रोजचे कार्यक्रम व्यवस्थित चालू असतात.

त्यांच्या तब्येतीचीही काही तक्रार नसते. मग आई वडिलांनाच अशी काळजी का पडलेली दिसते, याचं मुख्य कारणं म्हणजे पालकांच्या आपल्या मुलाच्या वजन वाढी बद्दलच्या चुकीच्या समजुती आणि अपेक्षा.

मुलांची वाढ पूर्वी सांगितल्या प्रमाणं होतेय ना, याचा आढावा घेतला तर बरेचदा ती व्यवस्थित असल्याचंच लक्षात येतं. आईवडिलांना मात्र तसं समजावून सांगावं लागतं. नाहीतर त्यांना आपल्या मुलांच्या तब्येतीची अकारण काळजी लागून राहाते. क्वचित अपराधीही वाटतं. याच भावनेतून टॉनिक्सची मागणी केली जाते किंवा डॉक्टर बदलले जातात.

यात खरोखरीच पालकांचं अज्ञान दूर होण्याची गरज आहे. डॉक्टरांकडे नियमितपणे मुलाची तपासणी झाल्यावर, त्याची वाढ डॉक्टरांनी समाधानकारक आहे असं सांगितल्यावर तरी आई वडिलांनी आपल्या कल्पना बदलाव्या अशी अपेक्षा आहे. ज्या मुलांचा वजन वाढीचा खरा प्रश्न डॉक्टरांपुढे असतो. त्या गरीब आईवडिलांचे प्रश्न फार निराळेच असतात. आईच्या अंगावर दूध पिणाऱ्या मुलांचं वजन सुरवातीला छान वाढतं. पुढे वेळेवर वरचे पदार्थ चालू न केल्यानं आणि अंगावरच दूध संपल्यानं प्रश्न निर्माण होतात. अशी वरच्या पदार्थाची वेळेवर सवय न केलेली मुलं एक वर्षानंतर या पदार्थांना तोंडही लावत नाहीत आणि अंगावर काहीच न मिळाल्यानं कुपोषणाला सुरूवात होते. त्याताच त्यांना आजारही होतात आणि वजन आणखीनच मागं येतं.

आजारातून वर येऊन वजन भरून काढण्यासाठी शरीराला जास्त खावं लागतं. ते न मिळाल्यानं त्यांची तब्येत आणखीनच खराब होत राहाते. या सर्वाचा परिणाम वाढ खुंटण्यावर होतो. त्यांच्या गरिबी, अज्ञान, बेकारी, अंधश्रध्दा, व्यसनं, उपचार या सर्व प्रश्नांवर विचार करू लागलो तर मार्ग फारच अवघड आणि लांब, न संपणारा दिसतो. कधी कधी या प्रश्नाकडं पाहून नैराश्य येतं. देशात बहुसंख्य मुलांचा प्रश्न हा आता सांगितला तो आहे. सुस्थितीतल्या मुलांशी त्यांची तुलना कशी होणार?

यामुळेच गरीब मुलांच्या अकाली मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. असं असल्यानं मुलं जास्त निर्माण होऊ देण्याकडे त्यांचा कल असला तर त्याचं काय चुकलं? इथेच सगळ्या कुटुंबनियोजन कार्यक्रमाचा मूळ धागा सापडतो. लोकसंख्या नियंत्रित मर्यादित करायची तर या मुलांच्या आरोग्याची हमी आपल्याला देता आली पाहिजे. तरच हे कार्यक्रम यशस्वी होतील, अन्यथा परिस्थिती फार बिकट आहे.