बालक्रिडापटूंच्या प्रयोगशाळेतील व मैदानावरील चाचण्या
बालक्रिडापटूंची कार्यक्षमता ठरवणारा, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे VO2max ( हवेतील प्राणवायू जास्तीतजास्त प्रमाणात शोषुन घेण्याची क्षमता) त्याचे प्रमाण उत्तम असणे, हे चिकाटीच्या, अधिक वेळ चालणार्या क्रिडाप्रकारांसाठी, उपयुक्त असतात हे सिध्द झाले आहे. खेळात पुढे असणार्या मुलांची शारीरिक वाढ, ही इतरांपेक्षा अधिक जलद झाल्यामुळे, त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा, खेळणार्या मुलांची कार्यक्षमता सर्वच बाबतीत, अधिक असते. लहान मुलांसाठी खालील ६ चाचण्या अधिक महत्वाच्या आहेत.
- ५० मीटर धावणे
- १२ मिनिटे धावणे (कूपर्स टेस्ट)
- शटल रन
- एका जागी उभे राहून मारलेली लांब उडी
- मेडिसीन बॉलची फेकी
- स्नायूंची प्रतिक्षिप्त क्रिया (Motor reaction time)
वरील चाचण्या ह्या, खेळाडू कुठल्या विशिष्ट क्रिडाप्रकारात, नैसर्गिकरीत्या चमकदार प्रगति करू शकेल ह्याचा अंदाज देऊ शकतात. अशाच प्रकारच्या काही चाचण्या ऑस्ट्रेलियन स्पोर्टस मेडिसीन असोसिएशनने निर्माण केल्या आहेत.
मानसिकतेचा विचार केल्यास तणावपूर्ण परिस्थितीमध्ये मानसिक संतुलन ठेवणे. चटकन निराश न होणे, बदलत्या परिस्थितीमध्ये, तणावाखाली असताना देखील योग्य, अचूक निर्णय घेणे, स्पर्धात्मक क्रिडाप्रकारांमध्ये नेत्रदिपक कामगिरी करण्यास अत्यावश्यक आहे.
एखाद्या क्रिडा प्रकारात अत्युच्च दर्जा गाठण्यासाठी खालील गुणवत्ता असणे अत्यावश्यक आहे.
- स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणे.
- एका विशिष्ट क्रिडा प्रकाराबद्दल आतून गोडी वाटणे, त्यात प्रगति करण्यासाठी आवश्यक खडतर, दीर्घकालीन प्रशिक्षणात, सातत्याने उत्साह टिकवून ठेवून, सक्रीय भाग घेणे.
- क्रिडाकौशल्य चटकन आत्मसात करणे, व त्याचा अचूक उपयोग स्पर्धांमध्ये करणे.
- वेळप्रसंगी, काही आवडत्या गोष्टींचा त्याग करून, शिस्तबध्द जीवन जगण्याची सवय लावून घेणे.
- बदलत्या परिस्थितीनुसरूप, चटकन, अचूक निर्णय, प्रसंगावाधान राखून घेण्याची क्षमता असणे.
- संघातील व इतर निगडीत व्यक्तिंशी , प्रसारमाध्यमे, पुरस्कर्ते, चाहते ह्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करणे.
- भविष्यकाळात moleculaw Bioligy च्या साह्याने Talent spotting अधिक लवकर व अचूकपणे करणे व त्यानुसार खेळाडूस क्रिडाप्रशिक्षण देणे शक्य होणार.
लहान मुलांच्या जीवनातील खेळाचे स्थान
ज्याप्रकार लहान वयातील खाण्याच्या सवयी, पुढील आयुष्यात देखील चालू राहातात. त्याचप्रमाणे, लहान वयातील शारीरिक हालचालींचे प्रमाण, कार्यक्षमता खेळ खेळणे, हे पुढील आयुष्यातील , शारीरिक क्षमता दर्शवते. लहान मुलांमधील , दैनंदिन जीवनातील उर्त्स्फूत शारीरिक हालचालींचे प्रमाण , खेळ खेळणे, क्रिडा प्रशिक्षण घेणे, हे अनुवंशिकता, खेळास पोषक वातावरण व लहान मुलाच्या निरोगीपणावर अवलंबून असते.
प्राथमिक शालेय जीवनात, केवळ आनंदासाठी, उर्त्स्फूतपणे, खेळ खेळण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. तर माध्यामिक शालेय जीवनात, नियोजितपणे, एकत्रितपणे केलेल्या क्रिडा प्रकारांना उदा. सामुहिक जिम्नॅस्टीक्स, किंवा क्रिडा प्रशिक्षणाला अधिक महत्व देणे आवश्यक आहे. प्रत्येक लहान मुलाने , त्याच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार कुठल्याना कुठल्या खेळात, स्वत:च्या आनंदासाठी भाग घेणे त्याच्या सर्वांगीण शारीरिक व मानसिक वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे. अशा उर्त्स्फूतपणे केलेल्या शारीरिक हालचालींची तीव्रता , ही नियोजित, मार्गदर्शनाखाली केलेल्या हालचालींपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात असल्याचे सिध्द झाले आहे.
लहान मुलांना थोडा वेळ शारीरिक कवायत, थोडा वेळ खेळ व थोडा वेळ विश्रांती, अधिक आवडते. ह्या खेळांचा कालावधी एका वेळेस ५ मिनिटांकडून अधिक नसावा. लहान मुलांमध्ये खर्च झालेली Phosphate ची, उर्जा देणारी द्रव्य, तात्काळ भरून येतात. आणि त्यामुळे हानिकारक अशा lactate चे प्रमाण, शरीरात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाढत नाही.
लहान वयात देखील खेळाडूने, पराभवाला सामोरे जाण्यास, अपयश पचवण्यास शिकायला हवे व लवकरात लवकर, त्या निराशाजनक अनुभवातून बाहेर यायला शिकायला हवे साधारणपणे १० वर्षांची मुले ही, आपल्या पालकांना खुश ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. त्यामुळे अपयश आल्यास त्यांना आपल्या क्रिडाप्रेमी पालकांच्या जिव्हारी लागणार्या टिकेस, वेळप्रसंगी शारीरिक मारास देखील सामोरे जावे लागते. व तो ताण त्यांना अतिशय कष्टदायक असतो. १२ ते १५ वर्षाची, पौगंडावस्थेतील मुले , मुली, शारीरिक बदलांच्या अवस्थेतून (body) जात असतात. त्या दरम्यान खेळाद्वारे आपल्या बदलत्या शरीराच्या ताकदीची आव्हाने स्वीकारण्याची चांगली संधि त्यांना मिळते.
शालेय जीवनात, बरीचशी मुले, खेळ आणि स्वत:ची खेळातील कारकीर्द, अतिशय गंभीरपणाने घेत असल्याने, शालेय संघात, जिल्हा पातळीवर, सब ज्युनियर गटात निवड न होणे, ह्यासारख्या गोष्टी त्यांच्या मनाला सतत बोचत राहतात.
बाल खेळाडू आणि आहार
लहान मुलांचा सरफेस एरिआ व सेल्युलर ऍक्टीविती अधिक प्रमाणार असल्याने त्यांचा बेसल मेटॅबोलीक रेट, जास्त असतो. त्यात देखील जर ते मूल, वाढणारे , भरपूर खेळणारे असल्यास, त्यास योग्य पोषणाची, सकस आहाराची अधिक गरज भासते. पोषण योग्य प्रकारे होत आहे की नाही याचे योग्य मूल्यमापन लहान मुलांच्या वजनातील वाढीद्वारे करता येते. उष्णांक वाढवण्यासाठी आहारामध्ये, अधिक उष्णांक पुरवणार्या फळे, दूध, भाज्या, पोळी, भात भाकरीचा अधिक प्रमाणात समावेश करणे, अत्यावश्यक आहे. मिठाई तसेच तळलेल्या पदार्थाचा समावेश न करणेच योग्य. लहान मुलांना अधिक प्रमाणात आहार घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी , अन्नपदार्थ, चटकदार, खमंगवास येणारे, आकर्षक रंगाचे करणे, गरजेचे आहे. डबा नेत असल्यास त्यात सकस पोषक अन्नपदार्थांचा समावेश होणे, आवश्यक आहे. रात्रीचे जेवण ही दिवसभरातील उष्णाकांची उणीव भरून काढण्याची योग्य वेळ असते.
लहान मुलांना, योग्य प्रकार, नियमितपणे जेवणाच्या वेळेवर हसत खेळत जेवण्यास शिकवायला हवे. खाण्याच्या वेळा, त्यांच्या प्रशिक्षणनुरूप स्पर्धानुरूप बदलणाऱ्या असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कुपोषण झाल्यास त्यांच्या शारीरिक वाढीवर दुष्परिणाम होऊन, त्यांच्या अभ्यासातील व खेळातील प्रगतिवर, अहितकारक परिणाम होतात. हे विसरता कामा नये. लहानपणातील कुपोषणामुळे, येणारा, निरूत्साह, कमकुवतपणा , थकवा हे पुढे मोठे झाल्यावर देखील तसेच चालू राहते.
आहारात ५० ते ६० टक्के कार्बोदके २५ ते ३५ टक्के चरबी युक्त पदार्थ, १० ते १५ टक्के प्रथिनांचा , तसेच योग्य प्रमाणात, जीवनसत्वे लोह, कॅल्शियम आणि इतर खनिज पदार्थांसाठी, तृणधान्यांचा अंडी, फळे, हिरव्या पालेभाज्या, गूळ, दूध, दूधाचे पदार्थ, डाळी मोडी आलेली कडधान्ये या अन्न पदार्थांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे. व्यायाम प्रकार करताना तसेच खेळताना, घामावाटे, जलद श्वसनावाटे, शरीरातील कमी झालेले पाण्याचे प्रमाण, सतत ठराविक वेळाने, पाणी पिऊन योग्य प्रमाणत ठेवणे, आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे की नाही, हे वजन, लघवीचा रंग, लघवीचे प्रमाण, काही प्रमाणात तहान लागण्याची संवेदना, याच्यावर ठरवता येते, १ किलो वजन कमी झाल्यास, ४ कप पाणी पिणे (१ कप २४० मिलीलिटर) आवश्यक आहे. लघवीचा गडद पिवळा रंग, शरीरातील पाणी कमी झाल्याचे दर्शवते.
पाणी पिणे हे, खेळाच्या दरम्यान तसेच नंतर देखील चालू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी, बाजारात उपलब्ध पावडर पाण्यात मिसळून वापरण्यास काही हरकत नाही. क्रिडा प्रकार. किंवा खेळ, अधिक काळ चालणार असल्यास, ठराविक वेळानंतर, साखर घातलेली गोड पेये घेणे, गरजेचे आहे. लहान मुलांना आवश्यक उष्णांकांची पाण्याची, तसेच क्षाराची गरज ही त्या त्या क्रिडाप्रकारच्या तीव्रतेवर, तो किती वेळ चालणार आहे, ह्याचेवर तसेच वातावरणाचे तपमान व आद्रतेवर अवलंबून असते.
बालक्रिडापटूंच्या आहार विषयक, कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना ह्या सर्व बाबींचा विचार करणे अत्यावश्यक आहे. खेळ एक उपचार पध्दती लहान मुलांमध्ये, खेळ हे, उपचार पध्दती म्हणून विविध प्रकारच्या आजारांमध्ये, उपयुक्त सिध्द झाले आहे.