मुल जन्माला आल्याबरोबर त्याचा आहार फक्त दुधाचा असतो आणि वर्षाचं झाल्यावर, जवळजवळ सगळाच आहार मोठ्या माणसासारखा असतो. मधल्या काळात दुधाची गरज कमी होत जाते आणि इतर पदार्थ पचवण्याची शक्ती वाढत जाते.
याच काळात मुलाच्या आवडी निवडीही विकसित होत असतात. अशा सर्व गोष्टींचा एकत्र विचार करून, संपूर्ण दुधाच्या आहारावरून मुलाला पूर्ण घन आहारावर आणण्याची क्रिया हळू हळू त्याच्या तब्बेतीच्या आणि स्वभावाच्या कलानं, योग्य त्या पदार्थानी आणि एक वर्षाचा होण्यापूर्वी पूर्ण होईल अशा तऱ्हेने वेळीच चालू करावी लागते. मूल एक वर्षाचं झाल्यावर त्याला मोठया माणसासाठी बनवलेला रोजचा साधा जेवणाचा आहार पचविता येतो.
मूल वर्षाचं झाल्यावर त्याच्यासाठी वेगळं खाणं बनवण्याची जरूरी नाही.
मूल ३ महिन्याचं होईपर्यंत त्याचा आहार पूर्णपणे दूधच असतो. नंतर मात्र सैलसर दाट पदार्थ द्यायला सुरूवात करायला हवी. ही सुरूवात आताच (इतक्या लवकर) करायची कारणं अशी, की याच काळात मूल चोखण्याची क्रिया विसरून चघळून, चावून गिळण्याची क्रिया शिकत असतं. त्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं आणि सराव व्हायला हवा म्हणून. हळूहळू मुलांच्या आवडी निवडीही तयार होत असतात. वयाच्या ६ महिन्या नंतर मुलाला एखादा पदार्थ आवडला नाही, तर तो त्या पदार्थाकडं वळूनही पहात नाही, स्पष्ट विरोध करतो. म्हणून, अशी समज येण्यापूर्वीच आपण आता आयुष्यभर जे पदार्थ मुलाच्या आहारात प्रमुख म्हणून वापरणार आहोत त्या पदार्थाची ओळख करून देणं आवश्यक ठरतं. नंतर सवयीमुळं आवड आपोआपच निर्माण होते.
आईच्या दुधाखेरीज वरच्या कोण्त्याही पदार्थाची ‘चव’ मुलाच्या जिभेला मुद्दाम ‘लावावी’ लागते, भात, गहू यांच्या नेहमीच्या पदार्थाच्या चवी जशाच्या तशा ‘आवडणं’ नेहमीच सहजपणे होत नसल्यानं, त्याची अशी ओळख करून देऊन आवड निर्माण करावी लागते. तीन महिने पूर्ण झाल्यावर टोमॅटो सूप, पालक सूप व संत्री मोसंबीचा रस इ. पातळ पदार्थ सुरू करावे. हे नवीन पदार्थ सुरू करतांना दर आठवडयाला कोणताही एक व पहिल्या दिवशी थोडा व मग वाढवत जाऊन आठवडयाच्या शेवटी एकावेळी जेवढा घेईल तेवढा द्यायला हरकत नाही. पदार्थ तयार करताना आणि पाजताना मात्र स्वच्छतेचं काटेकोर पालन केलं पाहिजे. हे पदार्थ भुकेपेक्षा चवीसाठी आणि थोडया प्रमाणात लोह आणि जीवनसत्वं यांच्या साठी उपयोगी पडतात.
चार महिन्यापासून भाताची पेज किंवा भात आणि मूग डाळ अशा मिश्रणाची खीर असे पदार्थ, एक भूक भागेल इतके द्यायला सुरूवात करवी. खिमट करण्याकरता तांदूळ व डाळ (मूग, तूर) याचं चारास एक या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यांचा भाजून रवा काढून ठेवावा. जरूर तेव्हा शिजवून तूप-मीट घालून न गाळता चमचा वाटीनं भरवावं. काही मुलांच्या बाबतीत, ४ थ्या महिन्याच्या सुरूवातीला चोखण्याची क्रिया अद्याप जोरदार असल्यानं, त्यांना ही दाट खीर नीटशी खाता येत नाही. अशा वेळी पदार्थ थुकल्यासारखं दिसतं. याचा अर्थ, मुलाला तो आवडला नाही असा काढू नये. १-२ आठवडयातच परत तो पदार्थ भरवून त्याला खायला जमतंय का, ते पहावं. लवकरच त्याला ते चघळून खायला आणि गिळायला जमतं आणि भरवण्याचं काम सहज सोपं होतं. मधल्या काळात निराश न होता वरचेवर प्रयत्न करून पहात रहावं. पोट बिघडलं असतांना सुध्दा तादुंळ-डाळ हा आहार मात्र पचवायला अतिशय हलका असल्यानं चालू ठेवायला हरकत नाही.
रोज नवे नवे पदार्थ द्यायला हरकत नाही पण ते पदार्थ चविष्ट आणि आकर्षक कसे बनतील याकडं लक्ष द्यावं. अर्थात् ते रोजच्या पदार्थांपैकीच असावेत. करायला फार वेळ लागू नये. वेगवेगळेपणानं कंटाळवाणे कसे होणार नाहीत हेही पहावं.
मूल जन्माला आल्याबरोबर त्याचा आहार फक्त दुधाचा असतो आणि वर्षाचं झाल्यावर, जवळजवळ सगळाच आहार मोठ्या माणसासारखा असतो. मधल्या काळात दुधाची गरज कमी होत जाते आणि इतर पदार्थ पचवण्याची शक्ती वाढत जाते.
मोठया माणसांप्रमाणेच लहानांनाही ‘चेंज’ हवा असतो!
कोणताही पदार्थ केला की मुलाला देण्याआधी त्याची चव आईनं स्वतः चाखून पहावी. तसेच तपमानही फार गरम अथवा गार नाही ना, हे पहावं. हे करतांनाही ‘स्वच्छता’ पूर्वी इतकीच चालू ठेवायला हवी. मुलांच्या हातात त्यांचं खाणं देतांना, ते पदार्थ स्वच्छ स्थितीतच त्यांच्या तोंडात जात आहेत ना हे पहात तिथंच बसून लक्ष ठेवणं जरूरीच असतं. नाहीतर अस्वच्छ होऊन पदार्थ पोटात गेल्यावर जुलाब न झाले तरच नवल! अशा जुलाबांमुळं बाळाला अमुक पदार्थ पचला नाही, परत द्यायला नको असे गैरसमज होतात.
६ महिन्यानंतर दोन भुका वरच्या खाण्याच्या असाव्यात. आता तांदुळ डाळीच्या रव्यांच खिमट उकडलेल्या, पूर्ण कुसकरता येतील अशा भाज्या (उदा. बटाटा, दुध्या इ.) घालून घट्ट करता येईल. नाचणी, गहू, साबूदाणा वगैरेंची खीर, केळं सफरचंद, चिक्कू वगैरे घट्ट फळ, बिस्किटं, अंडयाचा पिवळा बलक यापदार्थांनी दुसरी भूक भागवावी.
९ व्या महिन्यानंतर ३ वेळा असं वरचं खाणं द्यायला हरकत नाही. १ वर्षानंतर ४ वेळा वरचं खाणं अन् कपभर दूध इतकं पुरे. यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळापत्रकाची अन् मोजणीची जरूरी नाही. प्रत्येक मुलासाठी त्या त्या आईनं आपापलं वेळापत्रक, कोणते पदार्थ, किती द्यावं हे मुलाच्या प्रतिसादावर पाहून बसवावं.
सर्वसाधारणप्रमाणे आहाराचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असावा
३ महिन्याला फळांचे रस (संत्र, मोसंब), भाताची पेज, सार, भाजीची सूपस्.
४ महिन्याला नाचणीची खीर, भात डाळीचं खिमट/खीर
६ महिन्याला हेच पदार्थ जरा दाट करून, भाज्या, केळं किंवा बटाटा शिजवून त्यात दूध साखर किंवा दही मीठ घालून.
७ महिन्याला अंड, पिवळा बलक आवडेल आणि पचनाला झेपेल तसा, रव्याची खीर, भातात कडधान्यं एकेक करून शिजवून.
८ महिन्याला भात वरण, इडली, उपमा, शिरा, सांजा, रव्याची खीर इ. पदार्थ मऊ करून शिवाय घरचे पदार्थ मऊ करून, भाज्या, आमट्या, उसळी.
यानंतर हळू हळू सर्वच पदार्थ. त्यातले तिखट, मसालेदारपणा वगळता सर्वकाही, बारीक करून (दात नाहीत म्हणून) पोटभरपण ४ भागात विभागून. १ वर्षानंतर हेच पदार्थ फक्त (इतर खास पदार्थ क्वचित प्रसंगानुसार)
६ महिन्याच्या आत कोणतेही मांसाहारी पदार्थ देऊ नयेत.
पदार्थ नक्कीच ताजे अन् स्वच्छ असावेत. मुलाला देताना वाटीत उरेल इतकं घ्यावं म्हणजे नक्की त्याला ‘किती पुरतं? याचा अंदाज बांधता येईल. प्रत्येक खाण्यात उगीचच साखर घालून त्याला एकच गोड चव आणून त्या चवीच्या आधारानं पदार्थाची आवड लावू नये. स्वतंत्र चवींची आवड निर्माण होणं यामुळं कठीण जातं. साखर खाण्यामुळं होणारे दुष्परिणाम होतात ते वेगळेच.
चरबीयुक्त अशा पदार्थाची (साय, लोणी, तूप, बटर) मुलाला फारशी जरूरी नसते. ते फार घालू नयेत.
बाळ वर्षाचा झाल्यावर त्याच्यासाठी स्वतंत्र वेगळं काही शिजवायला लागू नये. इथपर्यंत त्यापूर्वीच पोचायचं आणि वर्षाच्या आतच कपानं किंवा भांडयानं दूध प्यायला शिकवायचं. असं सगळं लक्षात ठेवून करत गेलं, म्हणजे ही सगळी क्रिया अगदी सुरळीत होते. यातले अडथळे आधीच ओळखून टाळले म्हणजे हयातला आनंदही अनुभवता येतो.
‘वरचं खाणं’: घन आहार
- Details
- Hits: 30865
15
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
