सुदृढ आरोग्याचा उगम हा प्रत्येक बाबतीत चांगल्या सवयी आणि आणि जाणीवपूर्वक केलेल्या निवडीतून होतो. चांगल्या आरोग्याचा आनंद आत्ता आणि भविष्यातही घेण्यासाठी तरुणांनी योग्य असा व्यायाम, ताणतणावाचे नियोजन, स्वच्छता राखणे, अशा गोष्टींबरोबर पौष्टिक आहार, पुरेशी झोप ह्या गोष्टीही योग्य त-हेने करणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर लहान मुलांना हे ही समजले पाहिजे की शारिरीक तब्येती बरोबर भावनिक आरोग्यही किती महत्त्वाचे असते. कारण शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य याचे खूपच घनिष्ट संबंध असतात, हे जर मुलांना लहानपणापासूनच कळले तर ते स्वत:वर चांगल्या गोष्टी बिंबवून घेतात, आणि त्यांना चांगले वळण लागत जाते. आणि असे झाल्यास त्याचा मुलांच्या शालेय जीवनावरही सकारात्मक परिणाम दिसून येतील.
मुलांनी पुढील गोष्टी जरूर शिकाव्यात
- पौष्टीक अन्नाचे सेवन करणे. चॉकलेट, गोळ्या किंवा साखरेनी मढवलेला खाऊ अती प्रमाणात खाणे टाळणे.
- सकाळी नियमित, पोट भरेल अशी, पौष्टीक न्यहारी घेणे.
- मुलांना लहानपणापासूनच खेळून आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर साबणानी हात धुणे, स्वच्छता पाळणे अशा आरोग्यासाठी चांगल्या सवयी लावाव्यात.
- मुलांना योग्य वयात योग्य ते लसीकरण होत आहे की नाही ह्याची पालकांनी दक्षता ठेवावी, आणि त्याची नोंदही ठेवावी.
- मुलांना व्यायामासाठी उद्युक्त करावे. व्यायामाचे महत्त्व पटवून द्यावे.
- नियमीत व्यायाम, ताणतणाव, पौष्टीक आहार, पुरेशी झोप, स्वच्छता ह्या सर्व गोष्टींबद्दल मुलांशी मोकळेपणाने चर्चा करावी.
- एकटे असताना मोक्याच्या क्षणी काय करावे ह्या विषयीसुद्धा मुलांशी चर्चा करावी.
हसत खेळत चांगल्या सवयी:
दात घासणे (२ ते ५ ह्या वयोगटासाठी)
जेव्हा मुलांना दात घासायची सवय लावायची असते तेव्हा ते हसत खेळत एखाद्या बडबडगिताच्या सहाय्याने करा. ’दात घासणे’ ह्या विषयी एखादे दोन ओळींचे बडबडगित तयार करा आणि दात घासताना ते म्हणा. म्हणजे मुलांना मजा वाटते. काही मुले स्वत:च्या प्रत्येक दाताला नाव देतात, आणि दात घासताना ते आठवतात. दातामधे जे जंतू अडकतात, त्यांचा नायनाट करायचा, यावरून सुद्धा गोष्ट बनू शकते. ह्या सर्व युक्त्यांमुळे मुळे दात घासणे हे सक्तीचे न वाटता मजेचे आणि हवेहवेसे वाटते.
"टू शेअर ऑर नॉट टू शेअर"
बालवाडी वयोगटातील मुलांसाठी
कुठल्या गोष्टी फक्त आपल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी सर्वांच्या आहेत हे मुलांना आरोग्याच्या दृष्टीने समजण्यासाठी हा उपक्रम जरूर करून पहावा.
- मुलाला टूथ ब्रश, टूथ पेस्ट, कप, कंगवा, केसाचा ब्रश, आणि चमचा ह्या वस्तूंची चित्रे गोळा करायला सांगा.
- ही चित्रे एका मोठ्या कागदावर चिकटवायला सांगा. जरूर पडल्यास मदत करा.
- त्यामधे क्रेयॉन, खडू किंवा पेन्सिलच्या सहय्याने "कोणती गोष्ट मी इतरांबरोबर शेअर करत नाही" त्याखाली फुली मारायला सांगा.
- ज्या गोष्टी सर्वांनी वापरायच्या असतात त्याचेही एक पोस्टर मुलाला बनवायला सांगा आणि त्यावर "बरोबर"च्या चिन्हाची खूण करायला सांगा.
पौष्टीक आहार (सर्व वयोगटांतील मुलांसाठी)
बालपनापासून मुलांच्या पोटात पौष्टिक आहार जाणे अत्यंत महत्त्वाचे असते:
- दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही, चीज, लोणी, तूप, आइसक्रीम
- भाज्या: पालेभाज्या, गाजर, काकडी, बीन्स इत्यादी.
- मांसाहारी पदार्थ: अंडे, चिकन, मटण इत्यादी.
- फलाहार: सफरचंद, संत्रे, पपई, आंबा, केळी इत्यादी.
- गव्हाचे पदार्थ: पोळ्या / चपात्या, भाकरी, ब्रेड, इत्यादी.
दररोज आपल्या शाळकरी वयाच्या मुलाच्या पोटात चार प्रकारचे अन्न जाणे आवश्यक आहे: दूध, गहू, फळे, भाज्या, आणि अंडे किंवा मांसाहार.
पुढील पदार्थामधे गहू, फळे आणि दूध यांचा समावेश आहे
- ४ कप लो शुगर गव्हाच्या सेरीलमधे फळे चिरून टाकावीत, आणि त्यात २ कप दूध घालावे.
- हा पदार्थ मधल्या वेळच्या न्यहारीसाठी उत्तम असतो.