Print
Hits: 9061

संमोहनकाराकडे अलौकिक किंवा दिव्य शक्ति असते.
संमोहनशास्त्राला मानसशास्त्राचा शास्त्रशुध्द पाया आहे. कोणत्याही संमोहनकाराकडे कोणत्याही प्रकारची अलौकिक किंवा दिव्यशक्ति नसते, मात्र कठीण परिश्रम व प्रदीर्घ साधना करावी लागते. सहसा जादूचे प्रयोग करणारे आपल्या प्रयोगाची गूढता वाढवण्यासाठी व हातचलाखी लपवण्यासाठी अशी अलौकिक शक्ति आपल्या मध्ये आहे असा दावा करतात.

संमोहनविद्या ही भानामती, जादूटोणा अथवा काळी विद्या यासारखी विद्या आहे.
या पूर्वी सांगितल्याप्रमाणे संमोहनशास्त्राला मानसशास्त्रीय पाया आहे. त्यामुळे हे शास्त्र कोणीही सर्वसामान्य व्यक्ति योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली काही काळ साधना करुन शिकू शकते. या शास्त्राने सर्वसामान्यांना दुर्गम वाटणाऱ्या गोष्टी घडवता येतात. मात्र जादूटोण्या मध्ये वर्णन केलेल्या प्रमाणे कोणालाही वश करणे, एखाद्याचा नाश करणे, गुप्त धन शोधणे इ. प्रकारचे चमत्कार करता येत नाहीत. अर्थात जादूटोना अथवा भानामती इ. प्रकारच्या काळ्या विध्येमध्ये वर्णन केलेले चमत्कार सुध्दा ऐकीव व अतिरंजित असतात. मुळातच भानामती, जादूटोणा अशा नावाने कोणतीही विद्या अस्तित्वात नाही. याबाबत प्रा. श्याम मानव व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांसारख्या अंधश्रध्दा निर्मूलनाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी भरपूर कार्य केले असून त्यातील फोलपणा वेळोवेळी उघड पाडलेला आहे.

संमोहन कोणावरही होऊ शकते
संमोहित होण्यासाठी मनाची एकाग्रता व संमोहित होण्याची इच्छा या दोन महत्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे वेड्या, अतिचंचल मनोवृत्तीच्या व संमोहनास मनातून विरोध करणारया व्यक्ति (नकारात्मक विचारसरणीच्या संमोहनाची गरज वाटणाऱ्या व्यक्तिंवर अतिशय अल्पकाळात संमोहनाचा गाढ परिणाम साधता येतो.

याबाबत औंध येथील प्रसिध्द ह्र्दयशल्यविशारद डॉ. अविनाश इनामदार यांच्या रुग्णालयात मला आलेला अनुभव खूपच चांगला आहे. प्रयोगादाखल ह्रदयशस्त्रक्रियेपूर्वी मी ज्या ज्या रुग्णांना संमोहन उपचार दिले, ते सर्व रुग्ण संमोहनाच्या गाढ अवस्थेत गेले व शस्त्रक्रियेसंबधी दिलेल्या सुचनांचा त्यांना खूपच फायदा झाला.

संमोहित व्यक्ति संमोहनकाराची गुलाम होते व संमोहनकाराच्या आज्ञांचे तंतोतंत पालन करते
अशा प्रकारची धारणा सहसा संमोहनाचे मनोरंजक कार्यक्रम पाहिलेल्या व्यक्तिंची होते, कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये संमोहित व्यक्ति संमोहनकारच्या सगळ्या सूचनांचे पालन करते असे दिसते. मात्र सूक्ष्म अवलोकन केल्यास असे दिसून येते की, संमोहित अवस्थेतील वर्तणूक ही रोजच्या जीवनाचेच एक अंग असते. उदा. दु:खाचा आभास करुन रडावयास लावणे, आनंदाचा अभास करुन हसायला लावणे, नृत्याची इच्छा जागृत करुन नाचावयास लावणे या सर्व सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारची अनैतिक सूचना नसते. किंबहुना संमोहित अवस्थेतसुध्दा संमोहित व्यक्तिवर अंतर्मनाचे संपूर्णत: नियंत्रण प्रस्थापित असते. यामुळे नाचण्याची इच्छा नसलेल्या काही व्यक्ति संमोहित अवस्थेतसुध्दा नाच करत नाहीत.

संमोहित करुन एखाद्या व्यक्तिकडून गुन्हा घडवता येतो
संमोहित व्यक्ति संमोहन अवस्थेतसुध्दा अंतर्मनाच्या पूर्ण नियंत्रणाखाली असते; त्यामुळे नैतिक - अनैतिक व कायदेशीर - बेकायदेशीर या सर्व गोष्टींची तिला जाण असते. अशा अवस्थेत कोणतीही व्यक्ति गुन्हेगार किंवा अनैतिक कृत्य आपल्या मर्जीविरुध्द करणार नाही. मात्र मुळातच सदर व्यक्ति गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्यास स्वभावधर्माप्रमाणे गुन्हेगारी वर्तन करु शकेल.

एखाद्या व्यक्तिस संमोहित करुन त्याच्या जवळील दागदागिने, पैसे अथवा इतर चीजवस्तू काढून घेता येतात.
कोणत्याही व्यक्तिस तिच्या मर्जी शिवाय संमोहित करता येत नाही, त्यामुळे अनोळखी व्यक्तिने रस्त्यांत नकळत संमोहन केल्याच्या घटना काल्पनिक असतात. स्वत:कडून हरवलेल्या चीजवस्तू अथवा स्वत:च्याच चुकीमुळे झालेले नुकसान (जुगार, सटटा इ.) लपविण्यासाठी बऱ्याचदा लोक संमोहन करून लुटल्याचा बहाणा करतात. यामुळे त्यांची संभाव्य बदनामी व घरच्यांकडून होणारा त्रास टळतो. मात्र अकारण संमोहनशास्त्र बदनाम होते.

संमोहित करुन पळवून नेता येते
वरील परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तिच्या सहकार्याशिवाय संमोहन करता येत नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तिने संमोहित करुन पळवून नेले असे होणार नाही. चित्रपटसृष्टीच्या दुनियेचे जबरदस्त आकर्षण असलेले अनेक तरुण तरुणी घर सोडून मुंबईसारख्या शहरांकडे धाव घेतात व तिथे ठोकर बसल्यावर जेव्हा घरी परत येतात तेव्हा आपल्याला संमोहित करुन पळवल्याचा बहाणा करतात.

संमोहित अवस्थेत एखाद्या स्त्री बरोबर अनैतिक कृत्य करता येते
या बाबत संपूर्ण जगभर वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत. त्या सर्वांचा निष्कर्षं एकच आहे. तो म्हणजे, कोणत्याही स्त्रीस संमोहित अवस्थेत अनैतिक कृत्य करावयास लावणे शक्य नाही. कारण संमोहित अवस्थेत सुध्दा अंतर्मनाचे त्या व्यक्तिवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित असते. लहानपणापासून नीतिमत्तेचे झालेले संस्कार संमोहित अवस्थेत सुध्दा कार्यरत असतात.

दूर अंतरावरुन लहरी(!) सोडून संमोहन करता येते
संमोहन हे केवळ संमोहनकार व संमोहित होऊ इच्छिणारी व्यक्ति या दोघांच्या परस्पर सहकार्यावरच अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिस कोणत्याही प्रकारे संमोहित होण्याची सूचना दिल्याखेरीज संमोहित करता येत नाही किंवा पूर्वसूचनेशिवाय दूर अंतरावरुन निव्वळ फोटो पाहून अथवा त्या व्यक्तिच्या नांवे लहरी सोडून संमोहन करता येत नाही.

संमोहन उपचाराने कोणते विकार बरे होतात?

 1. अजयला चांगली नोकरी होती. घरातील वातावरण सुध्दा चांगले होते पण कामावर त्याला सतत टेन्शन येई, आपल्या हातून काही चूक होईल ही भिती सतत मनांत असे, त्यामुळे कोणत्याही नवीन कामाची जबाबदारी घ्यायला तो टाळत असे, कामावर लक्ष लागत नसे. चार-पाच दिवसांच्या संमोहन उपचाराने अजयचा मानसिक ताण कमी झाला.
 2. सुप्रिया ही हुशार मुलगी होती. १० वीत ७८% मार्कस मिळाले होते. १२ वीच्या परीक्षेच्या वेळी तिला खूप टेन्शन आले. त्यामुळे ती आजारी झाली. ताप, डोकेदुखी, मळमळ इत्यादि त्रास होऊ लागला. संमोहन उपचाराच्या दोनच बैठकीत तिचा त्रास कमी झाला.
 3. सौ. ज्योत्स्ना यांना जेव्हां उपचारासाठी आणले तेव्हां त्यांनी अनेक आजाराच्या तक्रारी केल्या. पाठ, पोट, कंबर, छाती, डोकं, प्रत्येक ठिकाणी आपल्याला आजार आहे अशी त्यांची कल्पना होती. सर्व वैद्यकीय चाचण्या सामान्य होत्या त्यामुळे डॉक्टरांनीच मानसोपचार घेण्याचा सल्ला दिला. सुमारे पंधरा दिवसांच्या उपचाराने त्यांच्या तक्रारी कमी झाल्या.
 1. राकेशकुमार यांना उंच जागेची भिती होती. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यांवरुन ते खाली पाहू शकत नव्हते. संमोहन उपचाराने त्यांची भिती दूर झाली.
 2. अंजलीच्या अंगावर पाल पडल्यापासून तिला जबरदस्त भिती बसली. रात्री झोप येईना, सतत डोके दुखू लागले. जेवन कमी झाले. दोन महिन्यात ५ किलो वजन कमी झाले. पाल पाहताच तिची वाचा बंद होऊ लागली. संमोहन उपचारानंतर पालीची भिती व घृणा सुध्दा कमी झाली.
 3. रुपालीचे आईशी नेहमी भांडण होत असे.' आई माझ्याकडे नेहमीच दुर्लक्ष करते, मुद्दामहून मला त्रास देते.' छळते अशी तिची तक्रार होती. उपचार रुपालीला दिले. पण नंतर तिनेच येऊन सांगितले आता आई सुधारली आहे.
 4. छाया ही टी. वाय बी. कॉम ला शिकवणारी मुलगी चुकून एका दृष्ट मुलाच्या प्रेमात पडली. थोडे दिवस छान वाटले नंतर मात्र त्या मुलाच्या स्वभावाचा त्रास होऊ लागला. प्रेमभंग झाला. काय करावे ते सुचेना. एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. तो असफल झाला. छाया आता रोज सिगारेट ओढू लागली. सिगारेटचे व्यसन लागले. मनात मात्र अपराधीपणाची भावना निर्माण झाली. एकदा स्वत:च उपचारासाठी आली. केवळ तीन बैठकांमध्ये मानसिक त्रास कमी झाला व सिगारेटचे व्यसन सुध्दा सुटले.
 5. नयनाचा विवाह एका इंजिनियर बरोबर झाला. लग्नानंतर एकच महिना ती सासरी होती. या एका महिन्यात तिचा इतका छळ झाला की पुन्हा ती सासरी गेलीच नाही. घटस्फोट घेतला. या घटनेला सात वर्ष झाली. या काळात नयनाला खूपच नैराश्य आले. कोणाशीही बोलावेसे वाटेना. काही करण्याची इच्छा राहिली नाही. वडिलांनी पुन्हा लग्न जमवण्याचा प्रयत्न केला पण तिने साफ नकार दिला. घरातील सर्वजण चिंतेत होते. दहा दिवसांच्या उपचाराने नयनाचा स्वभाव पूर्ण बदलला. पुन्हा पहिल्यासारखीच हसू लागली.
 6. कर्नल गांगुली यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेला. डॉक्टरांनी सिगारेट बंद करायला सांगितली परंतु चाळीस वर्षाची सवय जाईना. संमोहन उपचाराने सिगारेट पूर्ण बंद झाली.
 7. विजयाला चौदाव्या वर्षी पाळी सुरु झाली. गेल्या चार वर्षात तिची पाळी कधीच नियमीत आली नाही. पाळीच्या काळात पोटात भयंकर वेदना होत असत शिवाय पाळीचा स्त्राव सुध्दा आठ दहा दिवस होत राही. संमोहन उपचाराने विजयाचा सर्व त्रास कमी झाला.
 8. मनोहर जेव्हां उपचारा बद्दल चौकशी करायला आला तेव्हां त्याच्या कानात ईअर प्लग होते. त्याला सर्व आवाज प्रमाणापेक्षा जास्त मोठ्याने ऐकू येत असे. यामुळे सतत टेन्शन व डोकेदुखी जाणवत असे. संमोहन उपचारा नंतर मनोहरने कानातील प्लग काढून टाकले. आवाज सामान्य पध्दतीने ऐकू येऊ लागले.
 9. जयवंतचे लग्न ठरले. पण तो खूप घाबरला होता. आपल्यात लहानपणीच्या चुकांमुळे लैंगिक दुर्बलता आली आहे अशी त्याची धारणा झाली. केवळ काही दिवसांच्या उपचाराने त्याचे मनोबल वाढले व चुकीची धारणा दूर झाली.
 10. विश्वासरावांना ह्रदयविकार झाला. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले भितीपोटी ते ऑपरेशनला तयार होत नव्हते. संमोहन उपचार दिल्यावर मनातील ऑपरेशनची भिती गेली. ऑपरेशन उत्तम झाले.
 11. सुचित्राच्या आत्याचा बाळंतपणात मृत्यू झाला. याचा परिणाम सूचित्रावर झाला. गर्भवती सूचित्रा घाबरली होती. संमोहन उपचाराने भिती तर दूर झालीच शिवाय बाळंतपण सुध्दा वेदनाविरहित झाले.
 12. तोतरे बोलणाऱ्या उमेशने उपचार घेताच त्याचा आत्मविश्वास वाढला. आता तो बोलताना फारसा अडखळत नाही.

टीप- वरील सर्व घटना सत्य आहेत केवळ नावे काल्पनिक आहेत.