Print
Hits: 6204

होमिओपॅथिक औषधांमुळे गर्भवती माता अथवा गर्भावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. आपण आपल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही औषधे निर्धोकपणे घेऊ शकता. गरोदरपणात आढळणाऱ्या काही सर्व सामान्य लक्षणांसाठी होमिओपॅथीची खालील औषधे उपयुक्त ठरतात. या सदरात सुचविलेली औषधे ही उदाहरणादाखल दिलेली आहेत. व्यक्तिनुसार त्यांची निवडी व मात्रा बदलत असते. कुठल्याही वैद्यकिय सल्ल्याशिवाय येथे सुचविलेल्या औषधांचे सेवन करू नये.

गर्भावस्थेत सकाळी होणारी मळमळ व वांती

औषध : सिम्फोरीकार्पस रेसमोसा (Symphoricarpus Racemosa)
गरोदरपणात होमिओपॅथी गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दोन तीन महिन्यात काहीजणींना मळमळणे, अन्नाची वासना जाणे, उलटी होणे असे त्रास सकाळच्या वेळात होतात. यालाच मॉर्निंग सिकनेस किवा डोहाळे लागणे असे म्हणतात. या अवस्थेमध्ये काहीही खाण्याची इच्छा होत नाही. कसल्याही प्रकारची हालचाल करू वाटत नाही. पाठ टेकून झोपल्यावर बरे वाटते. भूक अस्थिर असते. या त्रासावर उपाय म्हणून सिम्फोरीकार्पस रेसमोसा हे औषध सुचविले जाते.

औषध : रोबिनिया (Robinia) पित्त, मळमळ, आम्लपित्तामुळे छातीत जळजळ, आंबट उलटया ,करपे ढेकर यांवर हे उपयुक्त औषध आहे.

सर्वसामान्य वेदना

औषध : आर्निका (Arnica)
गरोदरपणात मातेचे कंबर व पाय दुखतात, थकवा जाणवतो. गादीवर झोपले तरी ती कडक वाटते. या लक्षणांवर उपाय म्हणून आर्निका हे औषध उपयुक्त ठरते.

औषध : रस टॉक्स (Rhus tox)
सामान्य अस्वस्थता, हाडे आकडणे, विश्रांती घेत असताना देखील पाय दुखणे. रात्री शांत झोप न लागणे, रात्रभर कूस बदलत राहणे या लक्षणांवर रस टॉक्स हे औषध उपयुक्त ठरते.

अस्वस्थ पायांची स्थिती - रेस्टलेस लेग्स सिंड्रोम

औषध: झिंकम (Zincum)
काही गर्भवती मातांना कधी कधी पायांना मुंग्या येणे किंवा झिणझिण्या येणे अशा भावना होतात, तर बऱ्याच वेळा पाय झटकल्यासारखे हलू लागतात. झोप लागण्यात व्यत्यय येतो व नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवतो. या प्रकाराला रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (Restless legs syndrome) म्हणतात. झिंकम या औषधाचा या विकारावर चांगला फायदा होतो.

भावनिक ताण

औषध : काली फॉस (Kali phos)
गरोदरपणात अति काम केल्याने थकवा येतो, मानसिक ताण जाणवतो, काळजी अथवा अति-उत्सुकतेमुळे झोप लागत नाही. अशा वेळेला मेंदूला तरतरी देण्यासाठी काली फॉस हे औषध द्यावे.

औषध : जेलसिमियम (Gelsemium)
चिंता आणि भीती वाटणे, झोप न लागणे. अंग दुखणे, जडपणा जाणवणे. भावनिक उत्सुकतेमुळे शारीरिक तक्रारी वाढतात. या सर्व लक्षणांवर जेलसिमियम हे औषध उपयुक्त आहे.

औषध : एकोनाईट (Aconite)
गरोदरपणात वेडीवाकडी स्वप्नं पडल्याने अस्वस्थ वाटते आणि चिंता लागून राहते. प्रसूतीच्या वेळी येणाऱ्या कळांची भीती वाटते, ह्या सर्व लक्षणांसाठी हे औषध आहे.

औषध : सेपिया (Sepia) गरोदरपणात अति घरकाम केल्याने थकवा येतो, जडपणा जाणवतो, चिडचिड होते आणि खिन्न वाटते. पहाटेच जाग येते, निद्रानाश होतो आणि मनामध्ये दिन विचार येत राहतात. यासाठी सेपिया हे औषध उपयुक्त ठरते.

शारीरिक ताण

औषध : नक्स वोमिका (Nux vomica)
गरोदरपणात अति काम केल्यामुळे शारीरिक तक्रारी उद्भवतात. शांत झोप लागत नाही, मध्यरात्रीच जाग येते, चिंता वाटते व घाबरल्यासारखे वाटते, पहाटे पर्यंत झोप लागत नाही, ह्या सर्व लक्षणांवर नक्स वोमिका हे औषध आहे.

छातीत जळजळणे

औषध: मर्क सॉल (Merc–sol.)
गरोदरपणात रात्रीचे छातीत जळजळणे / दुखणे, उचकी लागणे व करपट ढेकर येणे ह्या सर्व तक्रारींवर मर्क सॉल हे औषध उपयुक्त आहे.

गोळा येणे (स्नायूंच्या आकुंचनामुळे)

औषध : कल्केरिया कार्बोनिका (Calc carb.)
वारंवार आळस येणे, रात्री झोपेत किंवा सकाळी उठताना पायांत (विशेषतः पिंढरीत) गोळा येणे. या लक्षणांवर हे औषध आहे.

औषध : मॅग्नेशिया फॉसफोरिटा (Mag phos.)
शरीरात कुठेही गोळा आल्यावर थोडे दाबल्यावर किंवा गरम शेक दिल्यावर बरे वाटणे, अस्वस्थता व झोप न लागणे, या सर्व लक्षणांवर हे औषध आहे.

नाक बंद होणे (सर्दीमुळे)

औषध : पल्सेटिला (Pulsatilla)
विशेषतः रात्री कोंडट खोलीमध्ये झोपल्यास नाक व सायनस बंद होते. सकाळी बरे वाटते (नाक वाहते) आणि खुल्या हवेत किंवा सकाळच्या ताज्या हवेत फार बरे वाटते. ह्या सर्व लक्षणांवर पल्सेटिला हे औषध उपयुक्त आहे.

औषध : काली बायक्रोमिकम (Kali bich.)
नाक बंद होणे, सकाळी नाकामधून चिकट घाण येणे. कोरडेपणामुळे श्वास घायला त्रास होणे. ह्या सर्व लक्षणांवर काली बायक्रोमिकम हे औषध उपयुक्त आहे.

त्वचेची खाज

औषध : सलफर (Sulphur)
त्वचेची (पुरळ न येता) खाज होते, गरम पाण्याने अंघोळ केल्यास जास्त जळजळते, विशेषतः रात्री जास्त खाजवल्यामुळे झोप लागत नाही, ह्या सर्व लक्षणांवर सलफर हे औषध उपयोगी आहे.