Print
Hits: 13874

शतकानुशतके विविध त्वचारोग जगात अस्तित्वात आहेत. सर्व औषध प्रणालीत त्यांच्यावर औषधेही उपलब्ध आहेत. परंतु हे रोग कायमचे नाहीसे झाले नाहीत. होत नाहीत कदाचित होणारही नाहीत. प्रत्येक पॅथीचा प्रत्येक त्वचारोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. गेली कित्येक वर्ष ‘सल्फा ड्रग्ज’ मोठ्या प्रमाणात वापरली गेली. त्यांची ऍलर्जी येऊ लागली. नंतर पेनिसिलीन, सर्व मायसिन्स वगैरे इलाज सुरु झाले. परिणाम तोच, आयुर्वेद, युनानी वगैरे पध्दतीतही पुष्कळ प्रकारचे इलाज चालू असतात.

रोगी मात्र रोग बरा होईपर्यंत विविध पॅथीकडे फिरत राहतात. त्यांना लवकर गुण हवा असतो. वरुन वरुन इलाज करुन काही उपयोग होत नाही. प्रत्येकाची त्वचा हे वैयक्तिक प्रतिबिबं असू शकते. (A skin condition is a reflection of the individual as a whole) हा डॉ. गार्डीनर यांचा दृष्टिकोन होमिओपॅथीला जवळचा आहे. शरीरातील अंतर्गत बदलाचे प्रतीक म्हणजे माणसाची त्वचा हा होमिओ दृष्टिकोन वेगळा आहे. अंत:स्थ घडामोडींचे बहि:स्थ स्वरुप म्हणजे त्वचा ! त्यासाठी अंत:स्थ उपचारच केले पाहिजेत.

त्वचेवरही जरा काही पुरळ दिसू लागले की ते नष्ट करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला जातो. त्याचा नेमका उलटा परिणाम होतो. पुरळाच्या रुपाने शरीराला नको असलेले जे बाहेर टाकायचे असते ते पुन्हा आत खेचले जाते. हीच गोष्ट अनेक रोगांच्या बाबतीत घडते. रोग दबला जाता कामा नये. त्याचे मूळ कारण नाहीसे केले पाहिजे. परिणाम नव्हे त्यामुळे बाहेरुन लावण्याची विविध मलमे, लोशन्स, तेले यांच्या वापर करताना विचारच करायला हवा. हे वरवरचे इलाज वाया जातात.

आज औषधांच्या बाबतीतही मानसशास्त्रीय दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. कारण मनाचा संबंध त्वचेशी फार जवळचा आहे. मानसिक आणि भावनिक उद्रेकांचा परिणाम त्वचेवर होतोच. होमिओपॅथीचे जनक डॉ. हॅनमन यांनी हे पूर्वीच लिहून ठेवले आहे.

अनेक लोकांची त्वचा विविध ठिकाणी खाजत असते. काहींना हा उपद्रव अधिक असतो. एखादी घटना त्यांच्या मनाविरुध्द झाली व त्यावर उपाय निघाला नाही तर ते भावनेच्या अधिक आहारी जातात. खाज वाढू शकते. ते खाजवीत राहतात. खाजवून खाजवून त्या जागा जाडसर बनतात. त्यामुळे विद्रुपता येते. स्वत:वर चिडून हे कृत्य अनेक वेळा केले जाते.

इसबासारख्या रोगात हे अनेकवेळा घडते. खाजविल्याशिवाय समाधान होत नाही. अशा तरेच्या लैंगिक विकारांनाही बरेचजण बळी पडतात. अशा लोकांचे सामाजिक जीवन डागळते.चारचौघात जाण्याची त्यांना लाज वाटते. मुरुमांच्या बाबतीत हेच घडते. अनेक तरुण तरुणी या विकारामुळे समाजात मिसळत नाहीत. बाजूला पडतात. त्याचा परिणाम त्वचेवर वाढत जातो. कित्येक कुटुंबात अशा तरेची अनुवंशिकता असू शकते. मुरुमावर कोणतीही क्रीम्स किंवा चुर्ण लावून उपयोग होत नाही. त्यासाठी पोटातच औषधे घ्यावी लागतात. पाच-दहा दिवसांत हा विकार बरा होत नसतो.

इसब आणि दमा या रोगांचे असेच होते. एखाद्याला या दोन्ही व्याधी असू शकतात. होमिओपॅथीनुसार या दोन्हींवे कारण एकच असते. त्यासाठी वेगवेगळे इलाज करण्याची गरज नसते. एखाद्याचा दमा दबला तर त्याला इसब होऊ शकतो किंवा उलटीही होते. म्हणून अनुवंश पहावा लागतो. तो जर असेल तर होमिओ पध्दतीतील नोसोड औषधे वापरावी लागतात. विशेषत: जर ऍलर्जी असेल तर त्या कुटुंबात दम्याची पार्श्वभूमि असतेच. इसबाच्या पाठीमागे काही वेळा क्षयाचा इतिहास असू शकतो. मधुमेहाची तपासणीही करावी लागते.

चामखिळींच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागते. चामखिळी पुष्क्ळांच्या अंगावर असतात. काहींच्या अंगावर भरमसाठ उगवण असते. काहीजणांना विद्रुपताही येते. त्या जाळल्या किंवा कापल्या तरी पुन्हा उगवतात. त्यासाठी होमिओ औषधे पोटातच घ्यावी लागतात. कॅन्सरचा अनुवंश असेल तर विशेष औषधे घ्यावी लागतात. हाता-पायाची नखे विद्रुप होतात. नखांचे रंग बदलतात. तुकडे उडतात. चिरा पडतात. स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट सौंदर्य हानीची ठरते, ‘फंगस इन्फेक्शन’ समजून वर वर इलाज केले जातात. रोग लवकर बरा होत नाही. त्यामागे ‘सायकोटीक’ अनुवंश असल्याने त्या तहेरेने औषध दिली जातात. शिवाय क्षय, मधुमेह कुटुंबात पाहावा लागतो.

केस गळणे, केसात कोंडा होणे याविषयी हल्ली टीव्ही वर जाहिरातींनी बेजार केले आहे. ‘लगातार जाहिराती पाहून अखेर पुष्कळ जण त्यांना बळी पडतात. पैसे भरमसाठ जातात. पण गुण दिसत नाही. नुसते तेल किंवा शांपू लावून उपयोग नसतो. त्यांचे मुळ नाहीसे करावे लागते. स्त्रियांच्या बाबतीत अनेक कारणे लक्षात घ्यावी लागतात. डोक्यातील कोंडा काहीवेळा सोरायसीस या लवकर ब-या न होणा-या त्वचारोगाची सुरुवात असू शकते. केसात ‘चाई’ लागणे हा प्रकारही त्वचारोगाचाच असतो. तेथे मलमाचा उपयोग होत नाही.