सकाळ वृत्तसेवा
२९ ऑक्टोबर २००९
मुंबई, महाराष्ट्र
असाध्य रोग बरे करतो असे सांगून हजारो रुपयांना बोगस औषध विकून अनेक असहाय रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करून उखळ पांढरे करणाऱ्या वर्सोव्यातील "बॉडी रिवायवल क्लिनिक'वर अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्देशांवरून पोलिसांनी काल छापा टाकला. या वेळी क्लिनिकचा मालक मुनीर खान याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी तेथील पाच महिला डॉक्टरांसह सोळा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या डॉक्टरांवर रुग्णांच्या फसवणुकीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कर्करोग, ब्रेन ट्युमर, हृदयविकार यांसारख्या असाध्य रोगांवर हमखास उपचार करण्याच्या नावाखाली अंधेरी पश्चिमेला चारबंगला परिसरात एक्सलंसी इमारतीत मुनीर खान हा बोगस वैज्ञानिक-डॉक्टर स्वतःच शोधलेल्या "बॉडी रिवायवल' नावाच्या औषधाची विक्री करीत असे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असलेले रुग्ण आणि त्यांच्या असहाय नातेवाईकांची मोठी गर्दी या क्लिनिकमध्ये होत होती. "बॉडी रिवायवल' या औषधाची १०० मिलीची बाटली १५ हजार सहाशे रुपयांना तेथे विकली जात होती. या औषधाच्या सेवनानंतर अन्य कोणतेही औषध घेण्याची आवश्यकता नाही, असा दावाही खान करीत होता; मात्र या औषधाने कोणत्याही रुग्णाला बरे वाटले नाही. त्यामुळे खान याच्या विरुद्ध काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली. अन्न व औषध प्रशासनाने दहा दिवसांपूर्वी "बॉडी रिवायवल'च्या क्लिनिकवर छापा घातला. त्यापूर्वी मुनीर खान याने तयार केलेले औषध तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुर्वेदिक तंत्रशाखेकडे पाठविण्यात आले होते. या शाखेने या औषधाचे परीक्षण करून ते बोगस असल्याचे सांगितले. गेली अनेक वर्षे रुग्णांना फसविणाऱ्या या भोंदू शास्त्रज्ञाला अटक करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले होते. त्यानुसार काल वर्सोवा पोलिस अंधेरी पश्चिमेला असलेल्या मुनीर खानच्या क्लिनिकवर त्याला अटक करण्यासाठी गेले; मात्र या वेळी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या पाच महिला डॉक्टर, मुनीर खान याचा मुलगा मुनीश (२८), व्यवस्थापक अपूर्व पारीख (३५) व कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक अशा सोळा जणांनी त्याला पळून जाण्यास मदत केली. त्यानंतर पोलिसांनी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या या पाच महिला डॉक्टर आणि अन्य अकरा जणांना रुग्णांची फसवणूक तसेच सरकारी कामात अडथळा करण्याच्या आरोपाखाली अटक केली. या आरोपींना न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले असून मुनीर खान याचा शोध सुरू असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.