Print
Hits: 3641

महाराष्ट्र टाइम्स
२ सप्टेंबर २००९
- हर्षल मळेकर

अनेक आजारांवर प्रभावी उपचार करण्यासाठी सध्या म्युझिक थेरपीला खूप महत्त्व प्राप्त झालंय. यालाच अनुसरून टाइम्स म्युझिकने काही सीडीज् प्रकाशित केल्या आहेत.

म्युझिक मनाला भावतं, मन रिझवतं आणि मनाला सुखावतंही. केवळ मन रिझवण्यासाठीच नव्हे तर, सध्याच्या विविध आधुनिक उपचारपद्धतींना पूरक म्हणूनही 'म्युझिक थेरपी' महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सुप्रसिद्ध सितारवादक पंडित शंशाक कट्टी गेल्या ११ वर्षांपासून या विषयावर अभ्यास करीत असून, त्यातूनच त्यांनी 'सूरसंजीवन' म्युझिक थेरपी सुरू केली आहे.

मुळात, म्युझिक थेरपी ही 'आयुवेर्द बेस्ड' आहे. यामध्ये आयुवेर्दिक उपचार पद्धतींचा भारतीय शास्त्रीय संगीताशी सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशिष्ट वेळेत संगीताचे ठराविक राग ऐकल्यानंतर चांगले 'रिझल्ट' मिळू शकतात. याबाबत कट्टी यांनी सांगितलं की, संगीताच्या ग्रंथांमध्ये कोणते ध्वनी कफ, पित्त, वात अशा विकारांवर उपयुक्त ठरु शकतात याचे उल्लेख आहेत. उदाहरणार्थ, वातावर उच्च स्तरावरील ध्वनी ऐकणं फायदेशीर असतं. त्यानुसारच राग बांधण्यात आले असून, ते ऐकण्याच्या वेळाही ठरविण्यात आल्या आहेत. त्यानुसार एखादा विशिष्ट राग ऐकून या दोषांवर परिणाम साधता येतो.

मात्र, ही थेरपी 'सप्लीमेंटरी' असून नियमित औषधं घेत असताना त्याबरोबरीने म्युझिक थेरपीचा प्रयोग करावा, असेही कट्टी आवर्जून सांगतात. पंडित कट्टी हे स्वत: पेशंटना 'लाइव्ह' म्युझिक थेरपी देतात. कट्टी यांनी डॉ. हिमालय पंतवैद्य, डॉ. शुभांगी ढगे, वैद्य संजय छाजेड यांचा सल्ला घेऊन त्यानुसार विशिष्ट प्रकारची म्युझिक थेरपी तयार केली आहे. संधीवात, ऍसेडीटी, मायग्रेन, डायबिटीस, यकृत विकार, अस्थमा, हायपरटेन्शन, स्ट्रेस अशा विविध विकारांवर उपयुक्त ठरतील अशा सीडी, कॅसेट त्यांनी तयार केल्या आहेत.

वाताच्या दोषावर दिवसातून दोनवेळा म्हणजे, पहाटे ३ ते ७ आणि दुपारीही ३ ते ७ या वेळेत 'मधुवंती' राग ऐकावा. हाय ब्लडप्रेशरसाठी सकाळी ७ ते १० या वेळेत 'तोडी' तर संध्याकाळी ७ ते १० या वेळेत 'पूरिया' ऐकणं फायदेशीर आहे. मायग्रेनच्या विकारावर सकाळी ६ ते ९ या वेळेत 'रामकली' आणि झोपण्यापूवीर् राग दरबारी कानडा ऐकण्याचा सल्ला दिला जातो. परंतु यापैकी सर्व राग हे विशिष्ट पद्धतीनेच आणि विशिष्ट वाद्यांवर वाजविणंच अपेक्षित असतं. तरच हवे तसे 'रिझल्ट' मिळू शकतात. 'टाइम्स म्युझिक'ने मायग्रेन, संधीवात, हायब्लडप्रेशर यावर उपयुक्त ठरतील अशा सीडीज तयार केल्या आहेत. रुपक कुलकर्णी (बासरी), संगीता शंकर (व्हायोलिन), जयंती कुमारेश (वीणा), चिराग कट्टी (सितार) आणि जयदीप घोष (सरोद) या कलाकारांनी त्यासाठी वाद्यवादन केलं आहे.आपल्या गर्भावर उत्तम संस्कार व्हावेत, त्याचा उत्तम विकास व्हावा यासाठी हल्लीच्या माता खूप जागरुक असतात. गरोदरपणात मन शांत आणि प्रसन्न ठेवणंही तितकंच महत्त्वाचं. गर्भाचा चांगला विकास व्हावा यासाठी कट्टी यांचा 'गर्भांकूर' हा चार सीडीचा सेटही प्रकाशित झालाय. यासाठी कट्टी यांनी स्वत: सतारवादन केलंय. गर्भारपणाच्या विविध महिन्यात ऐकण्यासाठी या चार स्वतंत्र सीडी तयार करण्यात आल्या आहेत.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.