Print
Hits: 2927

सकाळ वृत्तसेवा
१० जून, २०१०
आर. एच. विद्या
हैद्राबाद, भारत

खम्माम जिल्ह्यातील कुमारस्वामी या आदिवासी तरुणाला सध्या ताप, उलट्या आणि अस्वस्थपणा ही लक्षणे दाखविणाऱ्या वेगळ्याच रोगाने ग्रासले आहे. विविध आजारांसाठी नवीन औषधे आणि लशींच्या चाचण्या घेणाऱ्या प्रयोगशाळांनी त्याचा चाचणीसाठी "स्वयंसेवक' म्हणून वापर केल्याने त्याची ही अवस्था झाल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. कुमारस्वामीसारख्या शेकडो मुला-मुलींना "गिनी पिग' बनविण्याचा व्यवसाय राज्यात जोरात सुरू असल्याचे या प्रकरणाच्या शोधाअंती निष्पन्न झाले आहे.

कुमारस्वामीला या कामासाठी महिन्याला दहा हजार रुपये मेहनताना देण्यात आला. तो म्हणतो, जवळपास 40 दिवस रोज दोनवेळा ते माझे रक्त काढत. रक्त घेण्याआधी आणि नंतर मला विशिष्ट गोळी देण्यात येई.'' गेल्या आठवड्यात आपल्या चेरला गावी परतल्यानंतर कुमारस्वामी अचानक तापाने फणफणला. त्याला उलट्या सुरू झाल्या आणि अस्वस्थ वाटू लागले. खम्माम येथे त्याला उपचारासाठी नेले असता, चाचण्यांचे हे "साईड इफेक्‍ट' असल्याचे समजले. मानसिक ताण व हिपॅटायटीस-सी यासारख्या विकारांवरील औषधांच्या या चाचण्यांचा कायमस्वरूपी परिणाम त्याचे मूत्रपिंड आणि स्वादुपिंडावर होऊ शकतो, असे सांगून तेथील डॉक्‍टर म्हणाले, की 40 दिवस रोज 480 मिलिमीटर रक्त शरीरातून काढून चार गोळ्या खायला लावल्यावर दुसरे काय होणार?

या प्रकारानंतर चेरला येथील तहसीलदारांनी तरुणांची भरती करणाऱ्या डझनभर एजंटांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी केलेल्या तपासात असे समजले, की चाचण्यांसाठी करारबद्ध करताना "जोखीमपत्रा'वर सह्या घेतल्या जातात. चाचणी घेताना जीव जाण्याची किंवा कायमस्वरूपी एखादा अवयव निकामी होण्याची शक्‍यता मांडणारे कलम त्यात असते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना जोखीम समजावून सांगितली जातच नाही. चाचण्यांसाठी "स्वयंसेवकां'ना रुग्णालयात दाखल करून घेणे आवश्‍यक असताना प्रत्यक्षात वसतिगृहे किंवा मध्यमवर्गीयांच्या वसाहतींमध्ये ठेवले जाते. तेथे काही परिचारिका, एक डॉक्‍टर आणि एक स्वयंपाकी असतो, तसेच 24 तास सुरक्षा असते. "स्वयंसेवकां'ना तेथून बाहेर जाण्यास मनाई असते. शिवाय, चाचणीबद्दल कोणाला सांगायचे नाही, अशीही अट असते.

खम्माम आणि विशाखापट्टणम जिल्ह्यातील चारशे युवकांना अलीकडेच या चाचण्यांसाठी करारबद्ध करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या चाचण्या राज्यात 2000 पासूनच सुरू झालेल्या असल्याने आणखी मोठ्या संख्येने युवक या प्रकाराला बळी पडले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

राज्यात 92 औषध प्रयोगशाळा आहेत. सातशे शास्त्रज्ञ तेथे काम करतात. हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाचे विकार, तसेच मधुमेह आणि हिपॅटायटीस-सी या रोगांवरील लशी आणि औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे 12 हजार "स्वयंसेवकां'ची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांचा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार झालेला आहे. या शिवाय, या यादीत नाव नसलेल्या अनेकांचा वेळोवेळी चाचण्यांसाठी वापर केला जातो. दीडशे ते दोनशे रुपये रोज आणि जेवण, करमणूक असा त्यांचा नैमित्तिक करार असतो. चित्रपट स्टुडिओ किंवा चित्रीकरणाच्या ठिकाणाला भेट आणि श्रीशैलम, तिरुपती दर्शनाचे आश्‍वासन त्यांना दिले जाते. त्यांच्या आवडत्या नट-नटांच्या भेटीचे आमिषही दाखविले जाते.

काही दिवसांपूर्वीच एका स्वयंसेवी संस्थेने मर्क कंपनीच्या गर्डासिल व "ग्लायको'च्या सर्वारिक्‍स या गर्भाशयाच्या कर्करोगावरील लशी आदिवासी मुलींना बळजबरीने दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या लक्षात आणून दिले होते. या लशीचा परिणाम आणखी 20 ते 30 वर्षांनी या मुली पस्तीशी ओलांडतील तेव्हाच समजणार आहे

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.