Print
Hits: 3206

सकाळ वृत्तसेवा
२५ सप्टेंबर २०१०
पिंपरी, भारत

ऍटॅक्‍सिया हा मेंदूविषयक असाध्य आजार जडलेल्या दापोडी येथील दोन सख्ख्या भावांनी या रुग्णांसाठी स्वमदत गट (सपोर्ट ग्रुप) स्थापन केला आहे. त्याचे उद्‌घाटन आंतरराष्ट्रीय ऍटॅक्‍सिया जनजागृती दिनानिमित्त शनिवारी (ता.25) होत आहे.

पाश्‍चिमात्य देशात व विशेषकरून अमेरिकेत आढळणारा हा आजार भारतातही पसरू लागला असून, त्याविषयी मेंदूविकारतज्ज्ञांनी (न्युरोलॉजिस्ट) चिंता व्यक्त केली आहे. रामबाण इलाज नसलेल्या व बऱ्या न होणाऱ्या "ऍटॅक्‍सिया'चे साठहून अधिक रुग्ण पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरात असल्याचा अंदाज आहे.

"ऍटॅक्‍सिस' या मूळ ग्रीक शब्दापासून या आजाराच्या नावाची उत्पत्ती झाली असून, त्याचा अर्थ "असमन्वय' असा आहे. शरीराचा तोल व हालचाल नियंत्रित करण्याच्या मेंदूच्या कामावर विपरीत परिणाम झाल्याने ऍटॅक्‍सिया होतो. लाखात दोन व्यक्तींना तो होत असल्याचे दिसून आले आहे. एकट्या अमेरिकेत त्याचे दीड लाख रुग्ण आहेत.

भारतात आढळणारा लकवा हासुद्धा या आजाराचा एक प्रकार असल्याचे निगडीतील लोकमान्य रुग्णालयातील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश नाडकर्णी यांनी सांगितले. ""थायरॉइडची कमतरता, छोट्या मेंदूला कमी रक्तपुरवठा किंवा पाठीच्या कण्यात पू झाला, तर ऍटॅक्‍सिया होऊ शकतो, तसेच हा आजार चाळीस प्रकारांत आढळतो,'' असे त्यांनी सांगितले.

ऍटॅक्‍सियाची लक्षणे
"ब्रेक फेल' झालेली गाडी, असे ऍटॅक्‍सियाग्रस्ताचे वर्णन करता येईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. कर्करोगाप्रमाणे तो वाढत जातो. आजार झाल्यावर रुग्णाचे हात, पाय, डोळे, बोटे आदी अवयवांवरील नियंत्रण कमी होत जाते. आधाराशिवाय त्यांना चालता येत नाही वा कुठलेही काम करता येत नाही. या रुग्णांच्या समोरून वाहन आले, तरी त्यांना चटकन बाजूला होता येत नाही. तसेच चालताना अडथळ्याला धडकून ते पडू शकतात.

पालक चिंतेत
सेवानिवृत्त के. एच. राव (वय 68) यांची दोन्ही मुले गुरुप्रसाद (वय 36) आणि विवेक (39) यांना हा असाध्य आजार झाला आहे. विवेकला तीनचाकी खुर्ची, तर गुरुप्रसादला काठीचा आधार आहे. गुरुप्रसाद हा युरोपमध्ये नोकरी करीत असताना वयाच्या 33व्या वर्षी त्याला हा आजार झाला. त्यामुळे त्याला भारतात परतावे लागले. हे दोघेही पदवीधर आहेत. के. एच. राव आणि रुक्‍मिणीदेवी या साठी गाठलेल्या आई-वडिलांना आपल्या रुग्णाईत मुलांची सेवा करावी लागत आहे. "आमच्यानंतर त्यांचे काय होणार,' अशी चिंता त्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

शनिवारी स्वमदत गटाची घोषणा
भारतात फक्त हैदराबाद येथे ऍटॅक्‍सियाग्रस्तांचा "सपोर्ट ग्रुप' कार्यरत आहे. हा आजार जडलेले सख्खे बहीणभाऊ "समग' नावाने तो चालवितात, तर पिंपरी-चिंचवड परिसरात या रुग्णांचा "ग्रुप' या आजाराने पीडित असलेले दापोडीतील गुरुप्रसाद आणि विवेक राव या भावांनी सुरू केला आहे. "एचआयव्ही'ग्रस्तांचाही असा स्वमदत गट असल्याने ते आनंदी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच धर्तीवर ऍटॅक्‍सिया रुग्णांचेही जीवन सुसह्य करण्याच्या हेतूने त्यांचाही "सपोर्ट ग्रुप' स्थापन करण्याचे ठरविले असल्याचे राव बंधूनी सांगितले. "इंटरनॅशनल ऍटॅक्‍सिया अवेअरनेस डे' निमित्त पुण्यातील पूना हॉस्पिटलच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता या ग्रुपचे उद्‌घाटन होणार आहे. "ऍटॅक्‍सिया मला पराजित करू शकत नाही,' हे या नव्या "सपोर्ट ग्रुप'चे घोषवाक्‍य आहे, तसेच ऍटॅक्‍सियाग्रस्तांना फक्त हवा आधार, एवढीच या ग्रुपची मागणी आहे. संपर्क ः दूरध्वनी ः 020-27143184 किंवा मोबाईल ः 9370895840.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.