Print
Hits: 3004

सकाळ वृत्तसेवा
०३ ऑगस्ट २०१०
पिंपरी, भारत

सांगवीतील औंध उरो रुग्णालयाच्या इमारतीमधून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करून ते पूर्वीच्या राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या (ईएसआय) इमारतीत स्थलांतर केले जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सोमवारी (ता. 2) पत्रकारांना दिली.

सांगवी येथील औंध उरो रुग्णालयात चारशे खाटांची व्यवस्था आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उरो रुग्णांची संख्या घटल्यामुळे नागरिक व अन्य रुग्णांच्या सोयीसाठी उरो रुग्णालय इमारतीच्या एका भागात शंभर खाटांचे सर्वोपचार रुग्णालय तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र, या इमारतीत उरो रुग्ण (टीबी) उपचार घेत असल्याने अन्य रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उरो रुग्णालयाच्या इमारतीमधून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करावे, रुग्णालयाचा कारभार सुधारावा, रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशा मागण्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री शेट्टी यांच्याकडे केल्या होत्या. गेल्या दोन वर्षांसून या प्रकरणाचा पाठपुरावा त्यांनी केला आहे. या विषयी त्यांनी विधानसभेतही प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यामुळे श्री. शेट्टी यांनी सोमवारी सकाळी औंध रुग्णालयाला भेट दिली. आमदार जगताप यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष प्रशांत शितोळे, महापालिका आयुक्त आशिष शर्मा, वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेंद्र नगरे आणि त्यांचे सहकारी या वेळी उपस्थित होते. उरो व सामान्य रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, ईएसआय रुग्णालय इमारत आणि आरोग्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्राची श्री. शेट्टी यांनी पाहणी केली. तेथील समस्यांची माहिती घेत असताना त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.

प्रशिक्षण केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करून केंद्रातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे श्री. शेट्टी यांनी उद्‌घाटन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""उरो रुग्णालयाच्या इमारतीमधील सर्वोपचार रुग्णालय पूर्वीच्या ईएसआय रुग्णालयाच्या इमारतीत स्थलांतरित केले जाईल. या इमारतीत साडेतीनशे खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. या इमारतीमधील फर्निचरचे नूतनीकरण व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे. येत्या महिन्यात या सुविधा उपलब्ध होऊन सर्वोपचार रुग्णालयाचे स्थलांतर केले जाईल.''

झोपडपट्टीत स्वच्छता अभियान राबवा
साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये, यासाठी शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छता अभियान राबवून कीटकनाशकांची नियमित फवारणी करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत, असे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.