Print
Hits: 3504

सकाळ वृत्तसेवा
१० जुन २०१०
नवी मुंबई, भारत

गरजू रुग्णांना मोठी शस्त्रक्रिया, तसेच महागडे उपचार आता महापालिकेच्या दहा टक्के कोट्यातून मोफत घेता येणार आहेत. महापालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दहा टक्के कोट्यातील उपचारासंबंधीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून या ठरावावरील निर्णय प्रलंबित होता. अखेर आज या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे गरजू रुग्णांचा मोफत उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, हिरानंदानी रुग्णालयाच्या प्रशासनाकडून दहा टक्के कोटा महापालिकेला देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती, असा आरोप लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होता. यामुळे रुग्णालयावर दबाव आणण्यासाठी महापालिका आणि रुग्णालय प्रशासन यांच्यातील करार रद्द करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते; मात्र हिरानंदानी रुग्णालयाने कोट्यातील रुग्णांवर मोफत उपचार करण्यास संमती दिल्याने ही कारवाई थांबविण्यात आल्याचेही समजते.

यानुसार वाशी येथील हिरानंदानी हेल्थकेअर रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार नवी मुंबईतील 10 टक्के नागरिकांना बाह्य रुग्ण म्हणून; तर रुग्णालयातील एकूण 150 खाटांपैकी 20 खाटा गरजू रुणांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा करार तीन वर्षांसाठी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने रुग्णांसाठी खाटा, डॉक्‍टरांचा सल्ला, शस्त्रक्रिया व जेवण मोफत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हृदय शस्त्रक्रिया अथवा एखाद्या अपघातात मोठी दुखापत झाल्यास रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार आहेत. रुग्णालयातून देण्यात येणारी औषधे रुग्णांना छापील किमतीवर दहा टक्के सवलतीच्या दरात मिळणार आहेत. या प्रस्तावाप्रसंगी स्थायी समिती सदस्यांनी आपापले विचार मांडले. त्यानंतर स्थायी समिती सभापती अनंत सुतार यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

'आयसीयू'साठी पाच हजार रुपये
हिरानंदानी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाकडून 'आयसीयू'साठी 15 हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये; तर जनरल वॉर्डसाठी पाच हजार रुपयांऐवजी एक हजार रुपये घेण्यात येणार आहेत. या ठरावासही महापालिका व हिरानंदानी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी दिली.

महापालिकेबरोबर झालेल्या करारात दहा टक्के कोटा देण्याचे आम्ही स्वयंस्फूर्तीने ठारविले होते, त्यामुळे आमच्यावर दबाव आणण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.

डॉ. राजीव बोधनकर, संचालक, हिरानंदानी रुग्णालय

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.