Print
Hits: 3518

सकाळ वृत्तसेवा
०५ ऑक्टोबर २०१०
नवी दिल्ली, भारत

"टेस्ट ट्यूब बेबी' या उपचारपद्धतीचा शोध लावणारे व जगातील पहिली "बेबी' जन्मास घालणारे रॉबर्ट एडवर्डस यांचे कौतुक वैद्यकीयशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल आज जगभरात होत असले, तरी हीच कामगिरी भारतात त्याच वेळी करणारे डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या वाट्याला उपेक्षा, मानहानी व जीवनाबद्दलचे नैराश्‍य आले होते, ही बाब विसरता येत नाही.

डॉ. मुखोपाध्याय यांनी "टेस्ट ट्यूब' पद्धतीने दुर्गा ऊर्फ कनुप्रिया अग्रवाल हिला दि. 3 ऑक्‍टोबर 1978 रोजी जन्मास घातले. दुर्गा ही भारतातील पहिली व जगातील दुसरी "टेस्ट ट्यूब बेबी' होय. कोलकत्यातील डॉक्‍टर मुखोपाध्याय यांना या कार्याबद्दल आठ वर्षांनी सन्मान मिळाला, परंतु मधल्या काळात त्यांचा नैराश्‍याच्या गर्तेत मृत्यू झाला होता.

रॉबर्ट एडवर्डस यांची "टेस्ट ट्यूब बेबी' मुखोपाध्याय यांच्या कामगिरीच्या अगोदर केवळ तीन महिने, म्हणजे 25 जुलै 1978 रोजी जगात अवतरली होती. लुईस ब्राऊन याच्या या जन्मानंतर एडवर्डस यांचा लंडनमध्ये त्या वेळी जंगी सत्कार झाला.

मुखोपाध्याय यांच्या "दुर्गा'मुळे पश्‍चिम बंगालमध्ये नैतिक स्वरूपाचे प्रश्‍न निर्माण झाले होते. आपण इतिहास निर्माण केला आहे, हा मुखोपाध्याय यांचा दावा पश्‍चिम बंगालच्या सरकारने फेटाळून लावला. त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. या सरकारने एक समिती नेमून त्यांची सतत झाडाझडती घेतली. त्यांचे काम "बोगस' असल्याचा निष्कर्ष या समितीने नंतर जाहीर केला. समाजाने घातलेला बहिष्कार, प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, राज्य सरकारने दिलेल्या धमक्‍या आणि केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेण्यास घातलेली बंदी, यांमुळे मुखोपाध्याय यांना नैराश्‍याने ग्रासले व त्यांनी 19 जून 1981 रोजी आत्महत्या केली.

त्यांच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी, 1986मध्ये, त्यांच्या अद्‌भुत कार्याची दखल घेतली गेली. भारतात "टेस्ट ट्यूब बेबी'चा प्रयोग यशस्वीरीत्या करणारे पहिले डॉक्‍टर म्हणून मुखोपाध्याय यांना मृत्युपश्‍चात सन्मानित करण्यात आले.

"दुर्गा'च्या जन्मानंतर आठ वर्षांनी भारतातील दुसरी "टेस्ट ट्यूब बेबी', हर्षा चावडा हिचा जन्म झाला. मुंबईच्या केईएम रुग्णालयात डॉ. इंदिरा हिंदुजा यांच्या प्रयत्नांनी 16 ऑगस्ट 1986 रोजी हर्षाने डोळे उघडले. डॉ. मुखोपाध्याय यांच्याबद्दल त्या वेळी वाद उभे केले गेल्याने, डॉ. इंदिरा हिंदुजा यांनाच भारतात "टेस्ट ट्यूब बेबी'च्या जनक म्हटले गेले होते.

लुईस ब्राऊन, दुर्गा यांच्या जन्मानंतर टीका, वाद-विवाद व सामाजिक बहिष्कार यांसारख्या गोष्टींना निमित्त मिळाले. हर्षाच्या जन्माच्या वेळी समाजात या विषयावर किंचित जागृती निर्माण झालेली होती. मूल नसलेल्या जोडप्यांना या प्रकाराने दिलासा मिळेल, अशी चिन्हे दिसू लागली होती. एका पाहणीनुसार, भारतात अशा जोडप्यांचे प्रमाण 10 टक्के आहे.

पुरुषांमध्ये शुक्राणूंचे कमी प्रमाण, जंतूसंसर्ग आणि नपुंसकता ही कारणे, तर महिलांमध्ये गर्भाशयातील दोष, स्त्रीबीजाची कमतरता आदी कारणांमुळे मूल होत नसल्याची उदाहरणे आहेत. "इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' या पद्धतीद्वारे उपचार करणारे भारतात आता चारशेहून अधिक दवाखाने आहेत. येथील उपचार कमी खर्चात होत असल्याने परदेशांतून काही जोडपी येथे येतात. या सर्व प्रगतीमध्ये डॉ. मुखोपाध्याय यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या जीवनावर (व मृत्यूवर) आधारित "एक डॉक्‍टरकी मौत' हा चित्रपटही बनविण्यात आला.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.