Print
Hits: 4226

सकाळ वृत्तसेवा
०४ मे २०१०
नागपुर, भारत

दमा (अस्थमा) आजार जगातला सहावा सर्वाधिक धोकादायक आजार असून, त्यामुळे दररोज हजारो रुग्ण मृत्युमुखी पडतात. योग्य वेळी डॉक्‍टरांचा सल्ला आणि नियमित उपचार हा आजार दूर पळवू शकतात, असे मत शुअरटेक रुग्णालयाचे दमा विशेषज्ञ डॉ. विवेक गुप्ता यांनी पत्रपरिषदेत व्यक्‍त केले.

जागतिक दमा दिवसाच्या पूर्वसंध्येवर आयोजित पत्रपरिषदेत डॉ. गुप्ता म्हणाले, सर्वसाधारणपणे लहान मुले आणि वृद्धांमध्ये दमा अधिक आढळतो. दर दहापैकी चार मुलांमध्ये दमाचे प्रमाण आहे. पोटामध्ये इन्फेक्‍शन झाल्याने दमा होण्याची शक्‍यता अधिक आहे. मुलांकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. त्यामुळे दमाची लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायला हवा.

डॉ. गुप्ता यांनी आजाराची लक्षणे व त्याबद्दल नागरिकांमध्ये असलेले भ्रम यावेळी दूर केले. काम करताना दम येणे, खोकला किंवा रात्री छाती भरून येणे ही दमाची मुख्य लक्षणे आहेत. औषध घेतल्यानंतरही सर्दी, खोकला बरा होत नसेल तर डॉक्‍टरांकडे जाऊ दमा नसल्याची खात्री करून घेणे आवश्‍यक आहे. दमा अनुवंशिक असल्याचेही त्यांनी सांगितले. आई किंवा वडील यांच्यापैकी एकाला किंवा दोघांनाही असेल तर मुलांना दमा होण्याचे प्रमाण 30 ते 30 टक्‍के असते, अशी माहिती त्यांनी दिली. इन्हेलर थेरेपी दम्यावर चांगला व प्रभावी उपाय असून, योगा, ध्यान आणि प्राणायामानेही आजार कमी करता येऊ शकतो, असे ते म्हणाले.

दमा आजाराबद्दल जनजागृती करण्याकरिता शुअरटेक रुग्णालयातर्फे या महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याअंतर्गत पाच मे रोजी नर्सेसना प्रशिक्षण, नऊ मे रोजी मोफत दमा मार्गदर्शन शिबिर, 13 तारखेला रुग्णांना मार्गदर्शन आणि 31 ला जागतिक तंबाखू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशिवाय खेड्यापाड्यांमध्येसुद्धा वर्षभर उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला धीरज काबरा व श्रीकांत घोष उपस्थित होते.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.