Print
Hits: 2990

सकाळ वृत्तसेवा
०२ डिसेंबर २०१०
मुंबई, भारत

कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झालेले नसून 30 सप्टेंबर 2009 पर्यंतच्या दीड वर्षात देशात एक लाख 34 हजार 184 नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 21 हजार महाराष्ट्रात असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी आज पत्रकारांना सांगितले. कुष्ठरोग्यांच्या मदतीसाठी राष्ट्रीय धोरण आखण्यात यावे, अशी शिफारस राज्यसभेच्या विनंती अर्ज समितीने सरकारला केली आहे.

कुष्ठरोग्यांच्या समस्यांबाबत राम नाईक, इंटरनॅशनल लेप्रसी युनियनचे डॉ. शरद गोखले, डॉ. गोपाल, उदय ठकार, भीमराव मधाळे आदींनी पाच डिसेंबर 2007 रोजी राज्यसभेचे तत्कालीन खासदार वेदप्रकाश गोयल यांच्यामार्फत संसदेकडे विनंती अर्ज केला होता. त्यावर खासदार व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील विनंती अर्ज समितीने 24 ऑक्‍टोबर 2008 रोजी संसदेच्या पटलावर अहवाल सादर केला होता. या अहवालावरील कारवाईचा अहवाल समितीचे विद्यमान अध्यक्ष खासदार भगतसिंह कोश्‍यारी यांनी 22 नोव्हेंबर 2010 रोजी संसदेस सादर केला आहे. त्याबाबत नाईक यांनी पत्रकारांना माहिती दिली.

कुष्ठरोगाचे नवीन रुग्ण आढळून येत असून हे धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमध्ये 43 हजार, बिहारमध्ये 30 हजार, आंध्र प्रदेशमध्ये 15 हजार रुग्ण आढळून आले. सर्वेक्षणाचे काम जुलै 2011 पर्यंत पूर्ण करावे आणि कुष्ठरोग्यांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण ठरवावे, अशी शिफारस समितीने केली आहे. ज्या कुष्ठपीडितांना 40 टक्‍क्‍यांहून अधिक अपंगत्व आले आहे, त्यांना अपंगांच्या सोयी मिळाव्यात. त्यांना दरमहा दोन हजार रुपये निर्वाहभत्ता मिळावा, अंत्योदय योजनेनुसार अत्यल्प दराने अन्नधान्य मिळावे, तो वाहन चालविण्यासाठी सक्षम असेल, तर वाहन परवाना मिळावा, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. देशात कुष्ठरोग्यांच्या 612 वस्त्या असून शासकीय डॉक्‍टरांनी तेथे जाऊन त्यांना औषधोपचार करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे, असे नाईक यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.