Print
Hits: 3655

ई–सकाळ
वैशाली भुते
पुणे, भारत

“हॅलो, मी राहुल बोलतोय. मला जगावंसच वाटत नाहीय. अभ्यासाला वैतागलोय. सकाळी शाळा, दुपारी ट्यूशन आणि संध्याकाळी होमवर्क यातच दिवस संपतोय. टीव्ही पाहायला बसलो की आई ओरडते, खेळायला गेलो की बाबा मारतात. मला काहीएक मनासारखं करू देत नाहीत. काल तर सहामाहीत मार्क कमी पडले म्हणून दोघांनीही मला मारलं. आता मला नाही जगायचं, मीही आत्महत्या करणार...” राहुल एकटाच बोलत होता. शाळा, अभ्यासाचा ताण आणि पालकांच्या अपेक्षांमुळे कुचंबनेतून आत्महत्येचा पर्याय त्याने निवडला होता. फोनवर दुसरीकडे असलेल्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घ्यायलाही तो तयार नव्हता. आई–बाबा ऐकून घेत नाहीत. शिक्षकांना वेळ नाही. म्हणून आपली भावना तो अशा तऱ्हेने फोनवर मांडत होता. राहुल हे नाव बदललेले; फक्त प्रातिनिधिक उदाहरण. पण देशभरात “चाइल्ड लाइन” या हेल्पलाइनवर राहुलसारखी असंख्य मुले आपल्या समस्या मांडताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा विषय महाराष्ट्रात सध्या ऐरणीवर असला, तरी मुलांच्या एकूणच कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीत मोठे बदल घडत असल्याचे या “हेल्पलाइन’मुळे अधोरेखित होत आहे. हेल्पलाइनकडे येणाऱ्या दूरध्वनींची वर्षागणिक वाढत जाणारी संख्या पाहिल्यास मुलांच्या समस्या आणि त्या सुटण्याची गती यातील दरी वाढत आहे, हेच स्पष्ट झाले आहे.

पुण्यामध्ये ज्ञानदेवी या सामाजिक संस्थेमार्फत “चाइल्ड लाइन” चालविली जाते. मुलांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या या संस्थेने 2001 मध्ये 0 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी ही हेल्पलाइन सुरू केली. सुरवातीला वर्षाला असलेली 1500 दूरध्वनींची संख्या वाढत जाऊन केवळ तीन वर्षांत ती चार हजारांवर गेली. गेल्या दोन वर्षांपासून ही संख्या 19 हजारांवर गेली असून, मागील वर्षांत 21 हजारांचा टप्पा गाठला आहे. ऑल इंडिया चाइल्ड लाइन फाउंडेशनने जाहीर केलेली आकडेवारी विशेष बोलकी असून, फाउंडेशनच्या देशातील 82 शहरांतील हेल्पलाइनवर येणाऱ्या दूरध्वनींमध्ये दरवर्षी लाखोंची भर पडत आहे. 2003– 04 या वर्षांत देशातील 53 शहरांमधून 19 लाख 80 हजार 638 दूरध्वनी आले. हाच आकडा 2004–05 मध्ये 20 लाख 28 हजार 348 होता; तर 2005–06 या वर्षांत 20 लाख 69 हजार 731 मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 2006–07 मध्ये दूरध्वनींची संख्या स्थिर राहिली; तर 2007– 08 मध्ये ती सुमारे एक लाखाने वाढून 21 लाख 46 हजार 729 झाली.

सर्वाधिक दूरध्वनी भावनिक आधार शोधण्यासाठी येतात. त्याखालोखाल न्यूनगंडातून दूरध्वनी केले जातात. या दूरध्वनींची संख्या चार ते पाच लाखांदरम्यान असते. मृत्यूशी संबंधित वर्षाला शेकडो मुले दूरध्वनी करत असल्याचे हेल्पलाइनची आकडेवारी सांगते.

“चाइल्ड लाइन’च्या प्रमुख अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या,” “वर्षभरच मुलांचे दूरध्वनी येत असले, तरी वार्षिक परीक्षेच्या काळात प्रमाण 25 टक्‍क्‍यांनी वाढते. दहावी–बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. अभ्यास पूर्ण झालेला नाही, अभ्यास झाला पण आठवत नाही, परीक्षा देता येईल का, परीक्षेची भीती वाटते, असे अनेक प्रश्‍न ही मुले मांडतात. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही, ही समस्या घेऊन दूरध्वनी करणाऱ्या मुलांचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे. निकालाच्या काळातही दूरध्वनी वाढतात. पास होईन का, यापासून आई–वडिलांचा अपेक्षाभंग झाला तर मी काय करू, माझे करिअर कसे असेल, अशा अनेक समस्या असतात.”

“आई–वडिलांच्या दडपणामुळे मला आत्महत्या करायची आहे, त्यासाठी मी सर्व तयारी केली आहे, असे सांगणारे महिन्याला सरासरी दोन दूरध्वनी येतात,” असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. “एकाकीपणा, अभ्यासातील घटलेली प्रगती, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, घरातील – शाळेतील मारहाण, अभ्यासाचा ताण, मित्रमैत्रिणींमधील बिघडलेले संबंध, अशी कारणे त्यामागे असतात,” अशी माहतीही त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांमध्ये मुलांवरील लैंगिक अत्याचारात वाढ झाल्याचेही या दूरध्वनींवरून स्पष्ट झाले असल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “नोव्हेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत लैंगिक अत्याचाराबाबतचे तब्बल 40 दूरध्वनी आले. एकूण दूरध्वनींपैकी 80 टक्के दूरध्वनी मध्यम, उच्चमध्यम वर्गातील मुलांचे असतात. पालक वेळ देत नाहीत, लक्ष देत नाहीत, स्वातंत्र्य देत नाहीत, पालकांमधील भांडण सहन होत नाही, याही समस्या मुले सांगतात.”

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘fair dealing’ or ‘fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.