सकाळ वृत्तसेवा
२७ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत
डॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्याची पद्धत, औषधांची साठवण व औषधांमधील परस्परक्रिया याविषयी रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी भारती विद्यापीठाच्या "पूना कॉलेज ऑफ फार्मसी'तर्फे "हेल्पलाइन' सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. महाडिक यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ""बऱ्याच वेळा डॉक्टरांनी औषधे दिल्यानंतर औषधे घेण्याची पद्धती तसेच एकापेक्षा जास्त औषधे असतील तर त्यातील परस्परक्रियांमुळे "रिऍक्शन'ची भीती वाटत असते. आपण घेत असलेले औषध कशासाठी आहे. त्याचे परिणाम काय असू शकतात. औषधाची मात्रा, वापरण्याची, साठवण्याची पद्धती, आजार व औषधांमधील परस्परक्रिया ही सर्व माहिती डॉक्टर व रुग्णांना असणे आवश्यक असते. ऍलोपॅथिक औषधांबरोबरच आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे घेण्याचे प्रमाण मोठे आहे. या औषधांमधील परस्परपरिणामांची माहितीही रुग्णाला असणे आवश्यक आहे. रुग्णाला औषधोपचार योग्य पद्धतीने व्हावा या हेतूने "हेल्पलाईन' सुरू केली आहे. औषधांची निवड, मात्रा, "साइड इफेक्ट', परस्परक्रिया या माहितीसोबतच विषबाधा तसेच लहान मुले व गरोदर स्त्रियांसाठी लसीकरण व औषधांची माहिती दिली जाईल.
विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयात डी. फार्म डी. हा अभ्यासक्रम गेल्या वर्षी सुरू करण्यात आला आहे. पाश्चिमात्य देशात असलेला हा अभ्यासक्रम महाराष्ट्रात फक्त "पूना कॉलेज ऑफ फार्मसी'मध्ये आहे. या अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत "हेल्पलाईन' चालविण्यात येणार आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे मेडिकल दुकानांमधून आणून घ्यायची ही आपल्याकडील पारंपरिक पद्धती आहे. युरोपीय देशांमध्ये डॉक्टरइतकेच "फार्मासिस्ट'ला महत्त्व आहे. रुग्णांना औषधे देताना डॉक्टर "फार्मासिस्ट'च्या सल्ला घेऊन औषधे देतो. या पद्धतीचा अभ्यासक्रम "फार्म डी.'च्या रूपाने सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमाचे विद्यार्थीच हे केंद्र चालविणार आहेत. सुरवातीला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत ही हेल्पलाइन सुरू राहणार आहे. 020-40555555 या "हेल्पलाइन'च्या 308 या विस्तारित क्रमांकावर ही सेवा उपलब्ध आहे. याशिवाय This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या "ई-मेल'वर संपर्क साधता येईल.''
रुग्ण समुपदेशनासाठी विशेष "हेल्पलाइन'
- Details
- Hits: 3336
0