Print
Hits: 3235

सकाळ वृत्तसेवा
०५ जुलै २०१०
योगीराज प्रभुणे
पुणे, भारत

काळ्या बाजारात होणारी शासकीय औषधांची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकारने शासकीय रुग्णालयातील औषधांचा रंग निश्‍चित करण्याचे ठरविले असून, त्या रंगाच्या गोळ्या खासगी औषध दुकानांत मिळणार नाहीत. सरकारी रुग्णालयात औषधे न मिळाल्याने सर्वसामान्य गरीब रुग्णांना होणारा त्रास यामुळे थांबणार आहे. या सर्व औषधांचा हिशेब "ऑनलाइन' यंत्रणेद्वारे दररोज राज्य पातळीवर सर्वांना उपलब्ध राहील.

राज्याच्या आरोग्य खात्याकडून दर वर्षी लाखो रुपयांची औषधखरेदी केली जाते. मात्र, वेगवेगळ्या पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गैरव्यवहारामुळे अनेक गरजू रुग्णांना औषधांपासून वंचित राहावे लागते. त्यांच्यासाठी राज्य सरकारने दिलेली मोफत औषधे अनेकदा त्यांना लगतच्या दुकानात जाऊन खरेदी करावी लागतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी आरोग्य खात्याने औषध खरेदीचे नवीन धोरण स्वीकारले आहे. स्थानिक पातळीवरील सरकारी औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठीही स्वतंत्र उपाय योजण्यात येत आहेत.

""सुट्या स्वरूपातील औषधे खरेदी न करण्याचे आरोग्य खात्याने ठरविले आहे. कोणत्याही मध्यस्थ संस्थेकडून औषधखरेदी न करता, थेट उत्पादकांकडून "पॅकिंग' स्वरूपात औषधखरेदी केली जाईल,'' असे राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी "सकाळ'ला सांगितले. ते म्हणाले, ""पॅकिंग' कसे करावे, याबाबतही स्पष्ट सूचना उत्पादकांना दिल्या जाणार आहेत. औषधांचा रंग आणि पॅकिंग वेगळे असल्याने बाजारपेठेत ही औषधे गेल्यास ती सहज ओळखता येतील. यामुळे खरेदीप्रक्रियेत पारदर्शीपणा येईल; तसेच उत्पादकांकडून खरेदी केल्याने ती स्वस्तात होईल.''

शेट्टी म्हणाले, ""सरकारी रुग्णालयांमधून रुग्णांना देण्यात आलेल्या प्रत्येक गोळीची नोंद संगणकावर करण्यात येणार असल्याने रुग्णालयास मिळालेली औषधे, रुग्णांना दिलेली औषधे आणि औषधांचा शिल्लक साठा याची रोजच्या रोज "ऑनलाइन' माहिती मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या रुग्णालयात औषधाचा साठा कमी आहे, तेथे पुरवठा करणे शक्‍य होणार आहे. ''

सर्व औषधे सरकारी रुग्णालयातच
राज्यातील सरकारी रुग्णालयात सर्व प्रकारची पायाभूत औषधे मिळतील, अशी व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला औषध मिळेल. रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.