Print
Hits: 2935

सकाळ वृत्तसेवा
१९ जुन २०१०
पिंपरी, भारत

'स्वाइन फ्लू'ची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना बळकट करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात उद्‌भवलेल्या या आजाराची आतापर्यंत उद्योनगरीतील 812 जणांना लागण झाली असून, त्यातील 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवडसह राज्य आणि देशभर गेले वर्षभर सुरू असलेली ही साथ पावसाळ्यात पुन्हा उचल खाण्याची भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे या संदर्भात वर्षभरापूर्वी सुरू केलेले उपाय अद्याप सुरूच आहेत. उन्हाळ्यात हा आजार काहीसा नियंत्रणात आला होता. मात्र, पावसाळ्यातील पोषक वातावरणामुळे तो पुन्हा बळावण्याची शक्‍यता असल्याने तो नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत गरज असल्याचे पालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी "सकाळ'ला सांगितले. हा आजार होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी शहरवासीयांना केले आहे.

पालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आणि 15 दवाखान्यांमध्ये तपासणी व उपचाराची सोय आहे. दरम्यान, शहरातील साठ टक्के रहिवाशांनी म्हणजे नऊ लाख 78 हजार 710 जणांनी गेल्या वर्षात "स्वाइन फ्लू' झाला आहे की नाही, याची तपासणी पालिकेच्या 37 प्राथमिक केंद्रांत गेल्या वर्षभरात करून घेतल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 16 जून रोजी दोन हजार 343 जणांची अशी वैद्यकीय तपासणी झाली.

'स्वाइन फ्लू'ची तपासणी व उपचारासाठी चोवीस तास सुरू असलेली पालिका रुग्णालये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, तालेरा, यमुनानगर, भोसरी, आकुर्डी, सांगवी, थेरगाव आणि जिजामाता रुग्णालय, पिंपरीगाव

सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू असलेले दवाखाने प्राधिकरण दवाखाना, दत्तनगर, नेहरूनगर, खराळवाडी, फुगेवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, पिंपरी वाघेरे, काळेवाडी, भाटनगर, वाल्हेकरवाडी, अपघात दवाखाना, मोशी, बिजलीनगर, पिंपळे निलख आणि काळाखडक दवाखाना

खबरदारीचे उपाय
रुग्णाने शाळेत वा नोकरीवर; तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये त्वरित वैद्यकीय सल्ला व उपचार घेऊन सात दिवस विश्रांती घ्यावी वारंवार डॉक्‍टर बदलू नये रुग्णाचा संपर्क टाळावा रुग्णाचे कपडे व इतर वस्तू स्वच्छ ठेवाव्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव हा अन्न वा पाण्यातून होत नसून या रोगाचे विषाणू रुग्णाचा खोकला व शिंकेतून बाहेर येत असल्याने रुग्णाने; तसेच इतरांनी गर्दीच्या ठिकाणी शिंकताना वा खोकताना नाक व तोंडावर रुमाल ठेवावा.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.