Print
Hits: 3276

सकाळ वृत्तसेवा
०४ ऑगस्ट २०१०
नंदुरबार, भारत

जीवनात ताणतणाव वाढत असल्याने मनोरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील शहादा तालुक्‍यातील 16 गावांमध्ये जनार्थ आदिवासी विकास संस्थेतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत 132 मनोरुग्ण आढळून आले. त्यात 45 महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात मानसोपचार विभाग सुरू करण्यात आला आहे.

ताणतणावाच्या प्रक्रिया सर्वत्र वाढल्याचे चित्र आहे. त्यातून ग्रामीण भागही सुटलेला नाही. प्रारंभी शहरी भागातील नागरिकांना अधिक तणाव असल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाढलेली बेरोजगारी, महागाई, जीवनातील ताणतणाव, कुटुंबासाठी दिला जाणारा वेळ, वाढलेली जबाबदारी, अनावश्‍यक जीवघेणी स्पर्धा, त्यातून तणाव निर्माण होतो. त्याचा परिणाम व्यक्ती मनोरुग्ण होते. ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांत अशा मनोरुग्णांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्यांमध्ये 40 ते 70 वर्षे वयोगटांतील व्यक्‍तींची संख्या असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने जनार्थ आदिवासी विकास संस्थेने शहादा तालुक्‍यातील 16 गावांत पाहणी करून प्राथमिक बाबींची चर्चा केली. गावागावात बैठका घेतल्या. त्यातून या गावांमध्ये 132 मनोरुग्ण असल्याचे आढळून आले.

गावनिहाय मनोरुग्णांची संख्या
संस्थेने शहादा तालुक्‍यातील 16 गावांमध्ये केलेल्या पाहणीत दामळदा येथे 15, कवळीथ- 10, गोगापूर- 4, भोरटेक- 10, चिखली- 6, लक्‍कडकोट- 7, नांदे- 10, कन्साई- 9, तलावडी- 14, इस्लामपूर- 10, सुलवाडा- 10, अमोदा- 4, अंबापूर- 10, गणोर- 10, भूते-आकसपूर- 2, नवलपूर येथे एक मनोरुग्ण आढळला.

दीर्घकाळ उपचार
मानसिक आजारावर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. त्यानंतर मनोरुग्ण व्यक्‍ती स्थिर होऊन नियमित, सामान्य जीवन जगू शकते. मनोरुग्णांमध्ये बहुतांश व्यक्‍ती 15 ते 45 या गटातील स्त्री- पुरुष आहेत. योग्य औषधोपचारामुळे ते सामान्य होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते गंभीर मानसिक विकार असलेल्या व्यक्‍तींचे प्रमाण एक टक्‍का आहे. उपचाराचा खर्च 300 ते 600 रुपये प्रतिमहा आहे. हा उपचार पूर्ण करणे आवश्‍यक ठरते. गरिबांना औषधोपचार परवडत नाहीत. शासनाकडूनही त्याकडे दुर्लक्ष होते. शारीरिक आजारावरील उपचारासाठी शासनाने गावपातळीपर्यंत पोहोचणारी यंत्रणा उभी केली. परंतु मानसिक उपचारांसाठी जिल्ह्यात सुविधेचा अभाव होता.

संस्थेची मदत
या मनोरुग्णांचा शोध घेऊन जनार्थ आदिवासी विकास संस्थेने विविध प्रयत्न केले. त्यात मानसिक आजारी व्यक्‍ती, त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्‍ती, कुटुंबातील सदस्य, संपर्कातील व्यक्‍ती, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

संस्थेच्या प्रयत्नांना यश
एकीकडे मनोरुग्णांच्या समुपदेशनासाठी प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे शासकीय पातळीवर उपचारांची सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थेने प्रयत्न केले. त्यातून धुळे येथील डॉ. जीवन पवार हे मानसोपचारतज्ज्ञ मार्च 2010 पासून महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जिल्हा रुग्णालयात सेवा देऊ लागले. या महिन्यापासून डॉ. चंद्रकांत जोशी यांची मानसोपचारतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. दर मंगळवार व शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेबारादरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात ते सेवा देतील.

अन्य रुग्णांनी लाभ घ्यावा
संस्थेने पाहणी केलेल्या 16 गावांतील 132 मनोरुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गावागावांत बैठका घेऊन मनोरुग्ण व मानसोपचारांबाबत माहिती दिली जात आहे. काही पोस्टर प्रकाशित करण्यात आले. जिल्ह्याच्या अन्य भागांतही असलेल्या मनोरुग्णांना औषधोपचारासाठी त्यांच्या निकटवर्तीयांनी जिल्हा रुग्णालयात आणावे, असे आवाहन जनार्थ आदिवासी विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना ही सेवा उपलब्ध झाली आहे. त्याचा आपल्या निकटवर्तीय मनोरुग्णांना लाभ द्यावा. आरोग्यासाठी काम करणाऱ्या सर्व व्यक्‍ती, संस्था यांनी ही माहिती गावागावांपर्यंत पोहोचवावी.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.