Print
Hits: 4123

महाराष्ट्र टाइम्स
२८ जुलै २०१०

एड्स आणि कॅन्सरपेक्षा जास्त लोक भारतात मलेरियाने दगावतात. सध्या या रोगाने मुंबई-पुण्याला ग्रासलंय. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्या मध्ये लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांचं प्रमाण प्रचंड आहे. मलेरियाची लक्षणं बदलतायत. त्यामुळे ताप आला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तो कदाचित मलेरिया असू शकतो. तेव्हा तात्काळ डॉक्टरचा रस्ता धरा.

हुडहुडी भरून ताप येणं, हे मलेरियाचं मुख्य लक्षण. मलेरियाच्या पेशण्टला प्रचंड घाम येतो, ताप येऊन-जाऊन असतो, खोकला येतो,डोकेदुखी होते. अनेकदा पेशण्टला डायरीया होतो. मलेरियाचा जंतू रक्तातल्या तांबड्या पेशी आणि यकृतातल्या पेशी नष्ट करत असल्यामुळे अनेकदा पेशण्टची त्वचा आणि डोळे किंचित पिवळसर दिसतात.

फाल्सिफेरम मलेरिया हा सर्वात घातक असतो. याला आपण सेलेब्रल मलेरियाही म्हणतो. मलेरियाचा हा प्रकार सर्वात घातक. या पेशण्टची किडनी आणि यकृत निकामी होण्याची शक्यता असते. तसंच मज्जासंस्थेवरही विपरित परिणाम होऊ शकतो. याचबरोबर व्हायवॅक्स मलेरियाही जीवावर बेतू शकतो, अशी उदाहरणं समोर आली आहेत.

लक्षणं बदलताहेत :
थंडी भरून ताप येणं हे मलेरियाचं मुख्य लक्षण. पण, अलिकडे असे बरेच पेशण्ट आहेत की ज्यांच्यामध्ये हे लक्षण आढळलंच नाही. या पेशण्टना हुडहुडी भरत नाही पण, त्यांना प्रचंड ताप येतो. क्वचित प्रसंगी त्यांच्या पोटात दुखतं आणि डायरीयाही होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताप आला, की त्याकडे दुर्लक्ष करू नका. तो मलेरियाचा ताप असू शकतो, असं समजून लगेचच डॉक्टरकडे जा. पुढचे किमान चार महिने तरी आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे.

कालपरवापर्यंत सेलेब्रल मलेरियाचे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असायची. हा मलेरिया सर्वात धोकादायक मानला जायचा. पण, व्हायवॅक्स मलेरियाने दगावलेल्या पेशण्टची संख्याही मोठी असल्याचं या वर्षी आढळलं आहे.

ड्राय डे पाळायला हवा :
डास चावल्यामुळे मलेरियाचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे मलेरिया रोखण्यासाठी डासांचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. मलेरियाच्या डासांच्या अळ्या स्वच्छ पाण्यात वाढतात. तुमच्या गॅलरीमधल्या कुंड्या मलेरियाच्या डासांचं ब्रीडिंग ग्राऊण्ड बनू शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कुंड्यात टाकलेल्या पाण्याचा नीट निचरा होतोय का हे पाहायला हवं. बैठ्या चाळींमध्ये पावसाचं पाणी घरात शिरू नये म्हणून छपरावर ताडपत्री टाकल्या जातात. ही ताडपत्री उडू नये म्हणून त्यावर टायर ठेवले जातात. या टायरमध्ये जमलेल्या पाण्यातही मलेरियाच्या डासाच्या अळ्या वाढू शकतात. त्यामुळे घराच्या आसपास पावसाचं पाणी साठून राहिल, अशी कोणतीही भांडी, डबडी, बाटल्या, बादल्या ठेवू नका. आठवड्यातून किमान एकदा तरी ड्राय डे पाळायला हवा. या दिवशी आजूबाजूला साचलेल्या पाण्याचा निचरा केला तरी मलेरियाच्या डासांचं आपोआप निर्मूलन होईल. वेळोवेळी पालिकेच्या माध्यमातून धूर फवारणी केलं, तर हा धोका खूप कमी होऊ शकतो.

डासांचा निप्पात :
इतकी काळजी घेऊनही घरात डास झाले, तर संध्याकाळी डास येण्याच्या वेळी खिडक्या बंद करा. घरात निलगिरी आणि तुळशीच्या पानांचा धूर करणं, खिडक्यांना डास रोखणारी जाळी लावणं अशा प्रकारची काळजी घेता येईल. लहान मुलांना मलेरियाचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे झोपताना त्यांच्या अंगाला ओडोमॉस लावायला विसरू नका.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.