Print
Hits: 2875

सकाळ वृत्तसेवा
२५ ऑगस्ट २०१०
दिलीप कुऱ्हाडे
पुणे, भारत

सावधान महाराष्ट्र ग्रासतोय साथीच्या आजारांनी

राज्यामध्ये गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण इत्यादी जलजन्य आजारांची तीन वर्षांपासून वीस लाखांपेक्षा अधिक जणांना लागण झाली. त्यात आतापर्यंत अडीचशे जणांचा मृत्यू झाला आहे. हिवतापाच्या रुग्णसंख्येतही राज्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, आतापर्यंत एक लाख नागरिकांना त्याची लागण झाली आहे. हिवताप (मलेरिया) नियंत्रणाचा कार्यक्रम राबविला जात असूनही गेल्या सहा वर्षांत हिवतापाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चौपट वाढली आहे. गेल्या वर्षी राज्यात 232 जण हिवतापाने मृत्युमुखी पडले. त्यातील तब्बल 198 जण मुंबईतील होते. यंदा ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत सुमार नऊ हजार नागरिकांना "स्वाइन फ्लू'ची लागण झाली असून, त्यापैकी 563 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग विभागाच्या सहसंचालक कार्यालयाने दिली आहे.

नऊ हजार नागरिकांना "स्वाइन फ्लू'ची लागण
राज्यात आतापर्यंत सुमारे नऊ हजार नागरिकांना "स्वाइन फ्लू'ची लागण झाली असून, त्यापैकी 563 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी पुण्यात सर्वाधिक म्हणजेच तीन हजार 236 जणांना "स्वाइन फ्लू'ची लागण झाली होती. यापैकी 211 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 1761 जणांना लागण, तर 28 जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये 304 जणांना लागण, तर 46 जणांचा मृत्यू झाला. या वर्षी (एप्रिल 2010 नंतर) पुण्यात एक हजारजणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, शंभरजणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 639 जणांना लागण, तर तीसजणांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिकमध्ये चारशेजणांना लागण व अकराजणांचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यांसह राज्यात स्वाइन फ्लूमुळे 191 जणांचा मृत्यू झाला. सोलापूर (15), नवी मुंबई ( 5), सातारा व बीड प्रत्येकी सात, रायगड, जालना व अमरावती जिल्ह्यांत प्रत्येकी तीन, कोल्हापूर, धुळे, लातूर, नांदेडमध्ये प्रत्येकी दहा, सांगली (सांगली-मिरज महापालिकेसह) आतापर्यंत 38 जणांना याप्रमाणे स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी, ठाण्यात प्रत्येकी दोनजणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पावणेतीनशे डॉक्‍टरांना विशेष प्रशिक्षण
राज्यात "स्वाइन फ्लू' रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यांत पुरेशा प्रमाणात तपासणी केंद्रे (स्क्रिनिंग सेंटर) सुरू केली आहेत. त्यात 109 विलगीकरण कक्ष, तर दीड हजार तपासणी केंद्रांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 206 तपासणी केंद्रे व 24 अधिकृत विलगीकरण कक्ष कार्यरत आहेत. तेथे तीनशे खाटा व 51 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही साथ रोखण्यासाठी लागणारे "टॅमिफ्लू' औषध सरकारकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, त्याचे वाटप सर्व जिल्ह्यांत आवश्‍यकतेनुसार करण्यात आले आहे. "पी.पी.ई', "मास्क', "व्ही.टी.एम.', "व्हेंटिलेटर', "हॅण्ड सॅनिटायझर' अशा सर्व आवश्‍यक साधनसामग्रीचा मुबलक पुरवठा सर्व जिल्ह्यांना करण्यात आला आहे. राज्यातील साडेसहाशे परवानाधारक खासगी औषधविक्रेत्यांना "टॅमिफ्लू' विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. स्वाइन फ्लूच्या गंभीर रुग्णांना त्या त्या जिल्ह्यात विशेष उपचार देता यावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशा डॉक्‍टरांना विशेष काळजी व कृत्रिम श्‍वासोच्छवासासाठी व्हेंटिलेटरबाबत आवश्‍यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. 23 डिसेंबर 2009 अखेर पावणेतीनशे विशेषज्ञांना हे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे सहसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हिवताप रुग्णांची संख्याही लाखावर
गेल्या वर्षी राज्यात हिवतापाचे एकूण रुग्ण 69 हजार होते. या वर्षी ही संख्या साधारणत: एक लाखापर्यंत पोचली आहे. मागील तीन महिन्यांत हिवतापाच्या रुग्णसंख्येने 36 हजारांचा आकडा ओलांडला आहे, तर जूनअखेर केवळ अकरा जणांचा हिवतापाने मृत्यू झाला असल्याचे सहसंचालक कार्यालयाचे म्हणणे आहे. त्यांनी जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील आकडेवारी दिलेली नाही. मुख्यतः यादरम्यान हिवतापाने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. मुंबईमध्ये हिवताप नियंत्रणासाठी यंदा केंद्र सरकारकडून राज्याला साडेतेरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून औषधे, अळीनाशक व कीटकनाशके यांची खरेदी केली जाणार आहे. तसेच रुग्णांच्या रक्तनमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी, हिवताप रुग्णांवर जंतूंच्या प्रकारानुसार समूळ उपचार, विषाणूजन्य तापाच्या निदानासाठी 16 केंद्रे व राष्ट्रीय विषाणू संस्था येथे व्यवस्था, शहरी भागातील डासोत्पतीच्या स्थानांवर अळीनाशकाची फवारणी, हिवताप उद्रेकग्रस्त भागांत, तसेच हिवताप अतिसंवेदनशील भागांत "सिंथेटिक पायरेथ्राइड' कीटकनाशकाची घरोघरी फवारणी, निवडक गावांमध्ये कीटकनाशक-भारित मच्छरदाण्यांचे वाटप आदी उपाययोजना करीत असल्याचे साथ रोग विभागाने म्हटले आहे. मागील सहा वर्षांत राज्यात 860 जण, तर एकट्या मुंबईत 623 जण हिवतापाने मृत्युमुखी पडले आहेत. सहा वर्षांत गोंदिया 48, तर पुणे आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी 33 रुग्ण हिवतापाने मृत्युमुखी पडले. 2004-05 मध्ये हिवतापाने 59 रुग्ण मरण पावले होते. ही संख्या यंदा चारपटीने वाढली होती.

हत्तीरोगाबाबत साडेबारा लाख रुग्णांची तपासणी
राज्यात गेल्या वर्षी हत्तीरोगाबाबत साडेबारा लाख रुग्ण तपासण्यात आले. त्यापैकी पाच हजारजण रक्तदूषित, तर साडेनऊशेजण बाह्य लक्षणेयुक्त रुग्ण आढळून आले. या वर्षी एप्रिल ते जूनअखेर हत्तीरोगाबाबत तीन लाख 20 हजार रुग्ण तपासण्यात आले असून, त्यांपैकी दीड हजार रक्तदूषित, तर 69 जण बाह्य लक्षणेयुक्त रुग्ण आढळून आले असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. त्याचबरोबर मागील वर्षी राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये साथीचे रोग असल्याची माहिती साथ रोग कार्यालयाने दिली आहे. साथीच्या आजारांसाठी जोखीमग्रस्त गावांची निवड करणे, सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याची जिल्हा व राज्य आरोग्य प्रयोगशाळेमार्फत नियमित तपासणी, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याकडे ब्लिचिंग पावडरच्या उपलब्धतेबाबत पाठपुरावा, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत "मेडिक्‍लोर' सोल्यूशनचे वाटप आदी उपाययोजना साथीच्या आजारांवर केल्याचे कार्यालयाने म्हटले आहे.

वीस लाख जणांना जलजन्य आजारांची लागण
राज्यामध्ये गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण इत्यादी जलजन्य आजारांनी गेल्या तीन वर्षांपासून वीस लाखांहून अधिकजण आजारी पडले असून, आतापर्यंत अडीचशे नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. जलजन्य आजारांचे मुख्य कारण दूषित पाणी हेच आहे. जलजन्य आजार वेगवेगळ्या जंतुंमुळे होत असले, तरी सर्व आजारांमध्ये बहुतांशवेळा रुग्णांचा मृत्यू निर्जलीकरणामुळेच होतो. आरोग्य विभागाने 1993 पासून दरवर्षी 15 मे 15 जूनदरम्यान संपूर्ण राज्यभर "जलजन्य साथरोग-जनजागरण अभियान' राबविले आहे. तरीसुद्धा राज्यात 2007 पासून दरवर्षी जलजन्य रुग्णांची संख्या वीस लाखांवर आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. जलजन्य आजारांनी राज्यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या अशी : नाशिक (26), सोलापूर (23), भंडारा (22), ठाणे आणि यवतमाळ प्रत्येकी पंधरा, धुळे आणि नागपूर प्रत्येकी अकरा, वर्धा, नंदूरबार, लातूर आणि उस्मानाबाद प्रत्येकी सात, गोंदिया, वाशिम, बुलडाणा, सातारा, पुणे प्रत्येकी सहा, चंद्रपूर, अमरावती, बीड, रायगड, अकोला प्रत्येकी पाच, रायगड (4), नांदेड (9), औरंगाबाद, जालना प्रत्येकी दोन, तर हिंगोली, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी एक.

आपत्ती व्यवस्थापन गटाची स्थापना
"स्वाइन फ्लू'संदर्भात जनतेला योग्य माहिती देण्यासाठी, तसेच खबरदारीचे उपाय सांगण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने तातडीने मुंबई आणि पुण्यातील नायडू रुग्णालयात नियंत्रण कक्ष, तसेच "हेल्पलाइन'ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत परिस्थितीचे नियंत्रण करून भावी कार्ययोजना ठरविण्यासाठी राज्यपातळीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन गटाची स्थापना करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागांतील डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थानांवर अळीनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. उद्रेकग्रस्त ठिकाणी उपाययोजनांच्या मार्गदर्शनासाठी अधिकाऱ्यांच्या सध्या भेटी सुरू आहेत. त्याचबरोबर राज्यातील शीघ्र प्रतिसाद पथकातील दीडशे डॉक्‍टरांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यसेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) सहसंचालक डॉ. व्ही. डी. खानंदे यांनी दिली.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.