Print
Hits: 3351

सकाळ
०६ मे, २०१०
नागपूर, भारत

विमानतळावर प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नेमण्यात आलेले होप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्‍टर निमहकीम आहेत. त्यांना रुग्णांना काय होते आहे याबाबत काहीच कळत नसल्याची सनसनाटी तक्रार एका प्रवाशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तक्रारवहीत नोंदविली गेली आहे. सदर प्रवाशाच्या तक्रारीहून विमानतळाच्या टर्मिनल व्यवस्थापकांनी होप हॉस्पिटलला एक पत्र पाठवून याबाबतचा जाब विचारला आहे.

28 एप्रिलला इंडिगोच्या 6 ई 403 या मुंबई-कोलकता विमानातील श्री. दोशी नावाच्या प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर "इमर्जन्सी लॅंडिग' करण्यात आले. दरम्यान, विमानतळावर उपस्थित होप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. संदीप यांना उपचारासाठी पाचारण करण्यात आले; परंतु रुग्णाला काय होते आहे, हे त्यांना समजलेच नाही. त्यामुळे अशा "निमहकीम' डॉक्‍टरची अकस्मात सेवा देण्यासाठी कशी नियुक्ती केली, असा सवालही या प्रवाशासोबत असलेले त्यांचे निकटवर्तीय स्वप्नील साने यांनी दिलेल्या तक्रारीत उपस्थित केला आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर होप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला निःशुल्क जागा, वीज, पाणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इमर्जन्सी लॅंडिंग' झालेल्या विमानातील प्रकृतीत बिघाड झालेल्या प्रवाशांवर उपचार करावेत, यासाठी ही तजवीज करण्यात आली. यात होप हॉस्पिटलसोबत झालेल्या करारानुसार त्यांनी एक एम. बी. बी. एस. डॉक्‍टर, पॅरामेडिकल स्टाफ, स्ट्रेचर अशा सुविधा देणे क्रमप्राप्त आहे; परंतु या कराराचे उल्लंघन करून होपने विमानतळावर एका बी. ए. एम. एस. झालेल्या तरुण डॉक्‍टरची नियुक्ती केली आहे. सदर प्रवाशाने तक्रार दिल्यानंतर होप हॉस्पिटलने केलेल्या कराराचे पालन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी विमानतळाचे टर्मिनल व्यवस्थापक दिलीप सोरते यांनी होप हॉस्पिटलला एक पत्र देऊन जाब विचारला आहे. नुकताच होप हॉस्पिटलची सेवा सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय विमानतळाच्या प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार ऑगस्ट 2010 पर्यंत होप हॉस्पिटलची सेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर मिळणार आहे; परंतु नुकत्याच झालेल्या प्रकारामुळे "एमआयपीएल'कडून भविष्यात होप हॉस्पिटलची सेवा नियमित राहील की नाही, हे सांगता येणे शक्‍य नाही. याबाबत होप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुरली यांच्याशी संपर्क साधला असता, विमानतळावर 24 तास सेवा देणे आम्हाला बंधनकारक नाही. संबंधित रुग्णाची तपासणी केली तेव्हा एमबीबीएस डॉक्‍टर बाहेर गेले असतील, असे उत्तर त्यांनी दिले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.