Print
Hits: 2309

Times Of India
11 June 2012

पुणे – औषधांची बनावट चिठ्ठी दाखवून गर्भपाताच्या गोळ्या खरेदी करण्याचे नवीन प्रकार पुढे येत असल्याचे निरीक्षण औषध विक्रेत्यांनी नोंदविले आहे. काही स्त्रीरोग आणि प्रसूती रोगतज्ज्ञांचे बनावट शिक्के करण्यात आल्याचेही डॉक्‍टरांनी सांगितले.

शहरातील औषध विक्रेत्यांकडील गर्भपाताच्या गोळ्यांची कसून तपासणी करण्याची मोहीम अन्न व औषध द्रव्य प्रशासनाने (एफडीए) हाती घेतली आहे. त्यातूनही या गोळ्या मिळविण्यासाठी डॉक्‍टरांच्या बनावट चिठ्ठ्या तयार करण्यात येत आहेत. त्यात स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांचे "लेटर पॅड' वापरण्यात येत असल्याचे निरीक्षण काही औषध विक्रेत्यांनी नोंदविले आहे.

औषधाच्या चिठ्ठीवर फक्त गर्भपाताची गोळी डॉक्‍टर कसे देतील, असा प्रश्‍न बिबवेवाडी परिसरातील एका औषध विक्रेत्याला पडला. त्यामुळे त्यांनी संबंधित डॉक्‍टरांना दूरध्वनी करून या रुग्णाला दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीची माहिती विचारली. प्रत्यक्षात संबंधित रुग्ण आपल्याकडे आलेला नाही आणि त्याला कोणत्याही औषधाची चिठ्ठी दिली नसल्याचा खुलासा डॉक्‍टरांनी केला. दरम्यान, ही चिठ्ठी तशीच ठेवून औषध घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने तेथून पळ काढला, अशी माहिती औषध विक्रेत्यांनी दिली.

शहरातील वेगवेगळ्या भागातही असे प्रकार घडत असल्याचे निरीक्षण औषध विक्रेत्यांनी नोंदविले आहे. बिबवेवाडीतील या प्रकाराबाबत डॉ. राजीव जोशी यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे, अशी माहिती देण्यात आली.

या बाबत "पुणे डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन'चे सचिव विजय चंगेडिया म्हणाले, "गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करण्यापूर्वी ग्राहकाचा, रुग्णाचा संपर्क क्रमांक औषध विक्रेत्यांनी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉक्‍टरांच्या चिठ्ठीचीही छायांकित प्रत ठेवावी, असेही त्यांना सांगण्यात आले आहे."

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.