Print
Hits: 2544

सकाळ
13 June 2012

मुंबई – साखरेचे खाणार त्याला देव देणारा असला, तरीही मुंबईतील हॉटेल्समध्ये अद्यापि मधुमेहींसाठी खास अशी थाळी नाही! यापुढे मात्र मधुमेहींना काय खावे, असा प्रश्‍न पडणार नाही; कारण बीसीजे रुग्णालय आणि आशा पारेख संशोधन केंद्राने त्यांच्यासाठी एक गोड बातमी दिली आहे. सुदृढ आरोग्याचा मंत्र देत मधुमेहींसोबत शरीरस्वास्थ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी "हेल्थी टिफीन' बीसीजे रुग्णालयातूनच मुंबईकरांना पुरविण्यात येणार आहे.

लाईफस्टाईल मेडिसिन सेंटरमध्ये याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी येथील डॉक्‍टर, आहारतज्ज्ञांनी मिळून कुकिंग क्‍लासही सुरू केले आहेत. त्याला मिळणारा प्रतिसादही दिवसेंदिवस वाढतोय. साखर झाली की भात खावा का, फळांमुळे शरीरातला "गोडवा' वाढणार तर नाही ना, तेलाची मात्रा किती असावी, या असंख्य शंकाकुशंकांची उत्तरे या वर्गातून मधुमेहींना मिळत आहेत. रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये तेलाचा शून्य अंश असणारे तरीही खाद्यांतीचा आनंद देणाऱ्या असंख्य पदार्थांच्या रेसिपीज मुंबईकरांसाठी शोधल्या जात आहेत. वेळेअभावी स्वयंपाक न येणाऱ्यांनाही "फिट' राहता यावे, यासाठी ही संशोधन मोहीम सुरू आहे.

कसा असेल मेन्यू? शरीरात वाढणारे मेद असंख्य रोगांना निमंत्रण देते. चरबीचे थरच्या थर साचत जातात. वरकरणी बारीक अंगकाठी असली, तरीही अनेकदा शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. हे सारे होते ते आहारातील तेलाच्या सढळ हस्ते केलेल्या वापराने. त्यामुळे आहारातील तेलालाच नकार देणारी अमेरिकेतील डॉ. नील यांची "शाकाहारी व्हा' ही थिअरी येथे मार्गदर्शक ठरणारी आहे. तेलाप्रमाणे दूध वा दुग्धजन्य पदार्थ तसेच मांसाहारी पदार्थांवरही हा आहारतक्ता काट मारतो. चहा घ्यावासाच वाटला तर शेंगदाणे वा अन्य बियांना पाण्यात भिजवून त्यापासून काढलेले दूध आरोग्यदायी लाभदायक असते, असे महत्त्वाचे प्रात्यक्षिक या नव्या आहारशास्त्रात आहे.

साखर असणाऱ्यांनी फळे खाऊ नयेत हा पारंपरिक समजही यात मोडून काढला आहे. फणस, अननस, कलिंगड सोडून मर्यादित प्रमाणात फळांच्या सेवनाने दिवसाची सुरुवात करावी. दमदार नाश्‍ता, दुपारी माफक जेवण, रात्री अल्प प्रमाणातील आहार घ्यावा, असा हा नवा आहार मंत्र सांगतो. मोड आलेल्या कडधान्यांसोबत पालेभाज्यांचा अधिकाधिक वापर, साल न काढता खाता येणारी फळे अधिकाधिक खाल्ल्यास चयापचय प्रक्रिया सुधारते. ओले खवलेले खोबऱ्याचे योग्य प्रमाणात सेवन शरीरास तंतुमय घटकांचा पुरवठा करते. शरीरास उष्मांक देणारे पांढरे तीळ, लाल तांदूळ, लाल पोह्यांसारख्या घटकांचा समावेश असणारे अनेक पदार्थ या "हेल्थ टिफिन'मध्ये असतील.

बदलत्या जीवनशैलीनुरूप "हायजीन व्हॅल्यू' अधिक ठेवली, तर त्यातील "हेल्थ व्हॅल्यू' कमी होणार, हे लक्षात घ्यायला हवे. पदार्थांवर जितकी जास्त प्रक्रिया केली जाते, तितका त्याचा कस कमी होतो. त्यामुळे रोजच्या वापरातील असंख्य पदार्थ योग्य प्रकारे वापराल, तर आरोग्यदायी पदार्थ बनवता येतात, योग्य आहारासोबत उत्तम व्यायामाची जोड ही मधुमेहाला नियंत्रित करते. त्यामुळे मुंबईकरांनी हा हेल्थ पॅटर्न स्वतः राबवून पाहिल्यास त्यांना धकाधकीच्या जीवनात फिट राहता येईल.

- डॉ. दीपक दलाल तेलाशिवाय स्वयंपाक होऊ शकतो, यावर सर्वसामान्यांचा विश्‍वास बसत नाही. दुग्धजन्य पदार्थांना पर्याय म्हणून शेंगदाण्याचा वापर करता येतो तर मसाला रोटीसारखे अनेक पदार्थ शोधले आहेत. केवळ मधुमेहींसाठीच नव्हे, तर आरोग्यदायी खानाखजाना मुंबईकरांना निश्‍चितच लाभदायक ठरेल.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.