Print
Hits: 2611

सकाळ
२३ जुलै २०१२

महेश पाटील
परभणी – दंतचिकित्सा विभागाच्या बळकटीकरणासाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात अद्ययावत यंत्रसामग्रीसह स्वतंत्र मौखिक सेवा कक्ष सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच नव्याने एक हजार 63 पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात ग्रामीणसह शहरीभागात तोंडाचा कर्करोग, दंतरोग, हिरड्यांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. राज्यात केलेल्या शालेय आरोग्य तपासणी शिबिरात मुलांमध्ये दंतक्षयाचे प्रमाण 92 टक्के; तर हिरड्यांच्या आजाराचे प्रमाण 67 टक्के एवढे आढळून आले. त्यामुळे मौखिक आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा व उपजिल्हा रुगणालयामध्ये मौखिक आरोग्य, तसेच दंतचिकित्सा विभागाच्या बळकटीकरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू करणे; तसेच एक हजार 63 पदांची निर्मिती करण्यात मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 87.33 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यात सध्या 16 हजार नोंदणीकृत दंतशल्य चिकित्सक असून, 32 दंत वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यात तीन शासकीय व 29 खासगी महाविद्यालयांचा अंतरभाव होतो. प्रतिवर्षी या महाविद्यालयातून एक हजार चारशे ते पाचशे दंतशल्यचिकित्सक पदवीप्राप्त करतात. यापैकी 75 टक्के शहरी भागात, तर 25 टक्के ग्रामीण भागात आपली सेवा देतात. हे प्रमाण अत्यंत विसंगत आहे. ग्रामीण भागासाठी मौखिक आरोग्याच्या सोयी उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. सध्या 23 जिल्हा रुग्णालये, तीन सामान्य आणि 24 उपजिल्हा रुग्णालयांत दंतोपचाराच्या सुविधा काही प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र ग्रामीण भागात ही सेवा उपलब्ध नाही.

त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मौखिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुट कॅनल, कॅप बसविणे, कॉस्मेटिक डेंटीस्ट्री, जबड्यांच्या शस्त्रक्रिया, मुख कर्करोग तपासणी, दंत परिवेस्टन शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी अत्याधुनिक डेंटल युनिट, क्ष-किरण चिकित्सा, सर्जिकल किट, निर्जंतुकीकरण सुविधा तात्काळ पुरविल्या जाणार आहेत. या शिवाय 50 खाटांच्या व 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात मौखिक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नवीन विभागाकरिता राज्यस्तरावर स्वतंत्र मौखिक सेल सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी उपसंचालक पद निर्माण केले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावर दंतशल्यचिकित्सक, दंतयांत्रिकी कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयात चिकीत्सालयीन सहायक हे पद निर्माण केले जाणार आहे. या शिवाय, अधिपरिचारिका, दंत तंत्रज्ञांची कंत्राटी पद्धतीने नियुक्‍ती करण्यात येणार आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.