Print
Hits: 4269

ई-सकाळ
पुणे, भारत,

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम या समस्येला जनुकीय मूळ असल्यामुळे आपण तो टाळू शकत नाही. परंतु योग्य उपचार करून मार्ग काढता येतो. उपचारांची पहिली पायरी म्हणजे अशा स्त्रियांनी आरोग्यकारक जीवनसरणी आचरणे हे महत्त्वाचे. सकस, समतोल आहार योग्य प्रमाणात घेऊन त्याला नियमित व्यायामाची जोड दिल्यास या समस्येचा त्रास कमी होण्यास निश्‍चित मदत होते. ........

मातृत्व ही स्त्रीला निसर्गाने दिलेली अमोल देणगी आहे. अशा या मातृत्व लाभण्याच्या प्रक्रियेमध्ये "पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम' हा विकार एक अडथळा बनतो व अनेक स्त्रिया मातृत्वापासून वंचित राहतात.

साधारणतः १०-२० टक्के स्त्रियांमध्ये आढळणारी ही समस्या निरनिराळ्या वयोगटांत वेगवेगळ्या समस्या घेऊन येते. पौगंडावस्थेतील ८५ टक्के स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येत नाही. ६० ते ७० टक्के स्त्रियांना नको असलेल्या ठिकाणी केसांची वाढ उद्‌भवते उदा. चेहरा, हात, पाय तसेच तोंडावर मुरुमे येतात, जाडी वाढू लागते. या सर्वांमुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊन त्यांचा आत्मविश्‍वास त्या गमावू शकतात. अशा या पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोममुळे लग्नानंतर साधारणतः ३० ते ४० टक्के स्त्रियांना वंध्यत्वाच्या समस्येला सामोरं जावं लागत. जर अशा स्त्रीला दिवस गेले तर तिचा गर्भपात होण्याची शक्‍यता नेहमीपेक्षा अधिक असते. तसेच गरोदरपणात मधुमेह होऊन नवजात अर्भकालाही अधिक प्रमाणात समस्यांना तोंड त्यावं लागतं. अशा स्त्रियांचे जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब व गर्भाशयाच्या पिशवीतील आंतरिक आवरणाचा कर्करोग होण्याची शक्‍यताही अधिक असते.

पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे पाण्यासदृश स्त्रावाने भरलेल्या अनेक छोट्या, छोट्या गाठी (सिस्ट) असलेले स्त्री बीजांडकोष (ओव्हरी). या गाठीचा आकार २-९ मि.मि. इतका छोटा असून, त्या एका स्त्रीबीजांडकोषामध्ये १२ किंवा जास्त संख्येने पॉली म्हणजे अनेक आढळतात. स्त्रियांमध्ये दोन स्त्रीबीजांडकोष असतात व ते गर्भाशयाला जोडलेले असतात. दर महिन्याला स्त्रीबीजांडकोष हे एक परिपक्व स्त्रीबीज निर्माण करते व त्याचबरोबर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन व ऍन्ड्रोजेन या संप्रेरक अंतःस्रावांची निर्मितीसुद्धा करते. पांढऱ्या व गुळगुळीत असणाऱ्या पॉलिसिस्टिक ओव्हरी या नेहमीच्या स्त्रीबीजांडकोषापेक्षा आकाराने मोठ्या असतात. तसेच गर्भधारणेसाठी लागणारे परिपक्व स्त्रीबीज त्या नियमितपणे निर्माण करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे ऍन्ड्रोजेन या पुरुषास्त्रावाचे उत्पादन त्या नेहमीपेक्षा जास्त करत असल्यामुळे या स्त्रियांना नको त्या ठिकाणी केस उद्‌भवतात.

एखाद्या स्त्रीला पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आजार आहे, याचे निदान खालील चाचण्यांवरून कळते. १) सोनोग्राफी २) रक्तातील संप्रेरक या अतःस्रावाची चाचणी जसे फॉलिकल स्टिम्युलेटिंग, हॉर्मोन ल्युटिनाइझिंग, हॉर्मोन टेस्टोस्टरॉन इ.

नियमित मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांमध्ये पाळीचा रक्तस्राव सुरू झाल्यानंतर स्त्रीबीजांची वाढ होण्यास सुरवात होते. एक स्त्रीबीजांडकोषामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीचं प्रत्येक महिन्याला वाढीला लागतात. प्रत्येक स्त्रीबीज हे फॉलिकल या कोषात वाढत असते. या फॉलिकलची निर्मिती व वाढ, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन व ल्युटिनाइझिंग हॉर्मोन या संप्रेरक अंतःस्रावांमुळे होते. हे अंतःस्राव मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीतून निर्माण होतात. एका फॉलिकलमध्ये एक अपरिपक्व बीजांड असते. या सर्व फॉलिकल्समधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले स्त्रीबीजांड, दर महिन्याला बीजांडाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच स्त्रीबीजोत्सर्ग (ओव्ह्युलेशन) असे म्हणतात. गर्भनलिकेमध्ये हे स्त्रीबीज पुरुषबीजाशी संयोजित झाल्यास ते गर्भाशयातील आंतःआवरणावर प्रस्थापित होते व यालाच आपण गर्भधारणा झाली असे म्हणतो. जर गर्भधारणा झाली नाही तर गर्भाशयाचे अस्तर योनीमार्गे बाहेर टाकले जाते. या रक्तस्रावाला आपण मासिक पाळी असे म्हणतो. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये नेहमीपेक्षा जास्त स्त्रीबीजांडाची वाढ होते व संप्रेरकाच्या प्रभावाने ती वाढू लागतात. परंतु ऍन्ड्रोजेन या पुरुष संप्रेरकाच्या प्रभावामुळे त्यांच्या वाढीस प्रतिबंध होतो व त्यातील एकही स्त्रीबीज परिपक्व होत नाही. स्त्रीबीजाची निर्मिती न झाल्यामुळे पाळी लांबते व अनियमित होते. तसेच परिपक्व स्त्रीबीज नसल्यामुळे गर्भधारणा न होता स्त्रीला वंध्यत्वाला सामोरे जावे लागते.

पॉलिसिस्टिक ओव्हरी या पूर्वकालापासून मानवामध्ये आढळत असतील पण त्याची शास्त्रीय माहिती गेल्या ७० वर्षांपासून पुढे आली. स्टेन आणि लेव्हिनथाल हे दोन अमेरिकन डॉक्‍टर याविषयीच्या संशोधनाचे जनक समजले जातात. बरेच वर्षे ही समस्या मासिक पाळी सुरू व्हायच्या वेळेस सुरू होऊन पाळी जाईपर्यंत राहते, असे समजले जायचे. परंतु या विषयातील नवीन संशोधनामुळे असे आढळून आले आहे, की पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमला कारणीभूत ठरणारी जनुकं त्या स्त्रीच्या गुणसूत्रांमध्ये आढळतात व त्यामुळे हा आजार जन्मजात शरीरात असतो. असे असले तरी त्याची लक्षणे दिसायला पौगंडावस्थेपर्यंत वाट पाहावी लागते.

काही शास्त्रज्ञांच्या मते, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम या आजाराचा त्रास "इन्शुलिन रेझिस्टन्स'मुळे होतो. इन्शुलिन हे संप्रेरक प्लीहेच्या विशिष्ट पेशींमध्ये तयार होते व रक्तामार्फत शरीरातील पेशींपर्यंत पोचविले जाते. इन्शुलिनमुळे रक्तातील शर्करेचा रेणू शरीरातील पेशींच्या आत जायला मदत होते व त्यामुळे इन्शुलिन हे रक्तातील शर्करेचे प्रमाण नियमित करण्यास कारणीभूत ठरते. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमच्या रुग्णांमध्ये इन्शुलिनची नियमित पातळी शर्करायुक्त कण पेशींना पोचविण्यास कमी पडते. शरीरातील यकृत, मेद व स्नायूंच्या पेशी इन्शुलिनचा वापर नेहमीच्या प्रमाणात करू शकत नाहीत व त्यामुळे इन्शुलिनची पातळी पाढून हायपर - इन्शुलेनिमिया होतो व त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रॉम समस्येची लक्षणं दिसायला सुरवात होते.

ज्या स्त्रियांचे वजन मेदवृद्धीमुळे जरुरीपेक्षा जास्त आहे, त्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स मासिक प्रमाणात आढळतो. त्यामुळेच पॉलिसिस्टिक ओव्हरीची समस्या असणाऱ्या स्त्रियांमध्ये त्याचे वजन वाढल्यास या लक्षणांची व त्रासाची तीव्रता त्यांना अधिकाधिक जाणवू लागते. अर्थातच त्यांनी त्यांचे वाढलेले वजन कमी केल्यास त्यांचा इन्शुलिन रेझिस्टन्ससुद्धा कमी होतो व पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमच्या सर्व लक्षणांची तीव्रता कमी होऊन ती सौम्य होण्यास मदत होते, असे अनेक शास्त्रीय पाहण्यांमध्ये आढळून आले आहे.

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम या समस्येला जनुकीय मूळ असल्यामुळे आपण तो टाळू शकत नाही. परंतु योग्य उपचार करून मार्ग काढता येतो. उपचारांची पहिली पायरी म्हणजे अशा स्त्रियांनी आरोग्यकारक जीवनसरणी आचरणे हे महत्त्वाचे. सकस, समतोल आहार योग्य प्रमाणात घेऊन त्याला नियमित व्यायामाची जोड दिल्यास या समस्येचा त्रास कमी होण्यास निश्‍चित मदत होते. ज्या स्त्रियांची वजनं वाढली असतील त्यांनी त्यांची वजनं कमी करून ती आटोक्‍यात ठेवण्याची नितांत आवश्‍यकता असते. उपचारांची दुसरी पायरी म्हणजे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे घेणे हे होय. पाळीच्या अनियमिततेसाठी संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन्सच्या गोळ्या दिल्या जातात. मुरुमे व अनावश्‍यक केसांसाठी अंतःस्रावाच्या व इन्शुलिन कार्यान्वित करण्याच्या गोळ्या दिल्या जातात. सौंदर्यशास्त्राचा वापर करून मुरुमे व अनावश्‍यक केस नाहीसे करता येतात व वंध्यत्व समस्येवर परिणामकारक उपचार करता येतात.

पॉलिसिस्टिक ओव्हरीजमुळे होणाऱ्या वंध्यत्व समस्येवरील उपचार पद्धती १९३५ पासून सुरू झाली. त्या काळी शस्त्रक्रिया हीच एकमेव उपचार पद्धती उपलब्ध होती. पोट कापून स्त्रीबीजांडकोषातील पॉलिसिस्टिक ओव्हरीचा काही भाग कापून काढून टाकण्यात येत असे. १९६० च्या दशकात औषधी गोळ्या व हार्मोन्सच्या इंजेक्‍शनची निर्मिती करण्यात येऊ लागली व आजसुद्धा या औषधी गोळ्या व हॉर्मोन्सच्या इंजेक्‍शनचा उपयोग पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमच्या विविध समस्यांवर तसेच वंध्यत्व निवारणासाठी करण्यात येत आहे. या औषधी गोळ्या अथवा इंजेक्‍शनच्या जोडीला जरूर वाटल्यास आता व्हिडिओ लॅपरोस्कोपीच्या साह्याने पॉलिसिस्टिक ओव्हरीजवर शस्त्रक्रियासुद्धा केली जाते. व्हिडिओ लॅपरोस्कोपी, म्हणजेच लेन्स लावलेली नळी. या नवीन पद्धतीमध्ये पोटावर एक सेंटिमीटर इतका छोटा छेद घेऊन स्त्रीबीजांडकोषापर्यंत पोचता येते व त्याद्वारे स्त्रीबीजांडकोषावर शस्त्रक्रिया करण्यात येते. ही शस्त्रक्रिया संपूर्ण भूल देऊन व छोटे छेद घेऊन केली जात असल्यामुळे त्रासदायक नसते. यासाठी रुग्णाला एक दिवस रुग्णालयात राहावे लागते. व्हिडिओ लॅपरोस्कोपीच्या साह्याने वंध्यत्वाच्या इतर कारणांचा शोध व उपचारसुद्धा त्याच वेळी करण्यात येतो. या शस्त्रक्रियेमुळे स्त्रीबीजांडकोषात परिपक्व स्त्रीबीजाची निर्मिती सुकर होऊन गर्भधारणा होण्यास मदत होते. अशा तऱ्हेच्या विविध उपचार पद्धती व उपायांनी एकूण ८० टक्के स्त्रियांना अपत्य प्राप्तीचा लाभ देता येणे आता शक्‍य झाले आहे.

अशा या आजाराची माहिती तरुण मुली व त्यांचे पालक, तरुण विवाहित स्रिया आणि अशा अनेक स्त्रिया ज्या या आजाराने पीडित आहेत यांना मिळायला हवी. त्यासाठी त्याचा प्रचार सामाजिक स्तरावर होणे ही काळाची गरज आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘fair dealing’ or ‘fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.