Print
Hits: 6542

लताला अगदी खात्रीच होती की तिचा नवरा तिला फसवतोय. ती त्याबद्दल रोज त्याला धारेवर धरत होती. नवरा बिचारा या प्रकाराने गांगरून गेला होता. तो तिला सांगण्याचा प्रयत्न करत होता, बाई गं, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. तुझ्याशिवाय आणि आपल्या मुलाशिवाय राहण्याचा विचार मी स्वप्नात देखील करू इच्छित नाही.

पण ती काही त्याला पटवून घ्यायला तयार नव्हती. त्यांच्या घराला तर अक्षरश: रणांगणाचे स्वरूप आले होते. तो म्हणतो, मी एक वरिष्ठ अधिकारी आहे. त्यामुळे माझ्या डोक्याला आधीच मोठा ताप आहे. अशा प्रकारच्या संशयामुळे मला जगणे मुश्किल होऊन बसले आहे हे ती समजूनच घेत नाही एखाद्या मिटींगसाठी मला ऑफिसमध्ये थोडा जास्त वेळ थांबावेलागले तर घरी गेल्यावर कोणते रण माजेल याची मला कल्पना असते. आपली भानगड लपवायला मिटींग हा एक चांगला बहाणा पुरूषांनी शोधून ठेवलाय, हे ती मला ऎकवतेच. मी सर्वगुण संपन्न पती नाही याची मला कल्पना आहे. पण मी तसा बनण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या अविश्वासाने मी डळमळू लागतो. मला खूप वाईट वाटते. ती अशी का वागत असेल?

सुमनही अशीच. आपला नवरा कुठे जातो, काय करतो याची तिला भारी चिंता, एकदा तो घराबाहेर पडला की ही आपली त्याच्या सगळ्या मित्रांना फोन करत सुटते आणि तिचे हे कुठे गेलेत, हे विचारत बसते. कधी कधी तर ही बाई सरळ त्याच्या मित्रांची घरे गाठते आणि प्रत्येकाला तो भरवशाचा कसा नाही हे सांगत बसते.

तुम्ही जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा हं हा तिच्या बोलण्याचा समारोप असतो. त्याच्या अपॉंईटमेंट डायरीत एखाद्या बाईचे किंवा मुलीचे नाव असेल तर सुमनबाई लगेच तिच्याकडे फोनच्या मदतीने धावणार मग ती आपल्या नवऱ्याला कशी ऒळखते, किती दिवसापासून ऒळखते, त्यांची नुसतीच ऒळख आहे की आणखी काही.... तिच्या चौकशी सुरू होतात. तुम्हाला कदाचित वाटेल की या नवरोबांचे खरोखरच काही तरी प्रकरण असेल. त्याशिवाय काय एखादी बाई उगाच संशय घेईल?

पण परिस्थिती वेगळीच आहे. अनेक विवाहित स्त्रियांना आपल्या नवऱ्याची बाहेर काही तरी ‘भानगड’ असल्याचा संशय येत असतो. या स्त्रिया अशा का वागतात? याची काही कारणे आहेत. एक तर तिला लोकांवर विश्‍वास ठेवण्याची सवय नसेल, त्यामुळे ती आपल्या पतीवरही विश्‍वास ठेवत नसेल तर तिव्या भुतकालीन अनुभवांमुळे किंवा ती ज्या वातावरणात वाढली. त्या वातावरणामुळे तिचा स्वभाव संशयी बनला असल्याची शक्यता असते. तिची संपूर्ण जडणघडण जर असुरक्षित वातावरणात झाली असेल. लहानपणी तिला तिच्या आई - वडिलांकडून प्रेम, सहानुभूती मिळली नसेल किंवा तेचे पालन पोषण एखाद्या विभक्त कुटुंबात झाले असेल तर असुरक्षिततेची भावना तिच्या मनात सतत येत रहाते.

कदाचित संशयी स्वभाव तिने आपल्या आईकडूनही घेतला असेल. तिची आई तर तिच्या वडिलावर सतत संशय घेत असेल तर आज ही स्वत:च्या नवऱ्याचा संशय घेऊन तिचे अनुकरण करू पाहत असेल. विवाहापूर्वी जर तिला अशा प्रकारचे अनुभव आले असतील तर तिचा स्वभाव संशयी बनतो. हे शक्य आहे.

कारण एखाद्या पुरूषाने तिला फसवून तिचा विश्र्‍वासघात केला असेल, त्यामुळे सगळे पुरूष सारखेच असे तिला वाटत असेल किंवा तिच्या पतीचे विवाहापूर्वीचे चारित्र्य चांगले नसल्यामुळे तिच्या मनात संशयाची पाल सारखी चुकचुकत राहते.