"Once an alcoholic always an alcoholic''
बाप रे! हे मी काय वाचत होते? म्हणजे माझा नवरा आता आयुष्यभर असाच राहणार का? मी आणि मुले आम्ही सर्वांनी आपापल्या इच्छा - आकांक्षा मारूनच जगायच का? १०/१२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. माझा नवरा सखाराम बापट दारूच्या व्यसनात पुर्णपणे गुरफटला होता.
रोज उठून मारझोड, शिव्यागाळी, आरडाओरडा, दारू पिऊन सर्व साधारणपणे सर्वजण जे करतात तेच आमच्याही घरी चालू होते. भरीत बर नोकरी पण गेली. त्यामुळे पैशाची पण टंचाईच. परिस्थितीत पिणं चालूच होतं. तोंडाने मात्र सतत म्हणत असत की “अग मला प्यायचं नाहिये. पण प्यावं लागतच” तेव्हाच कुठेतरी जाणवलं की यांना दारु सोडायची तर आहे पण सोडता येत नाहीये काहीतरी करायला हवं हे कळत होतं पण नेमकं काय करावं उमगत नव्हत आणि नेमकं त्याच वेळी तो रविवारचा सकाळ माझ्या वाचनात आला त्यात “मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची” माहिती आली होती काही व्यसनमुक्त रूग्णांचे अनुभव सुध्दा आले होते आणि माझ्या डोळ्यापुढे आशेचा किरण दिसू लागला. प्रयत्न करण्याची दिशा पक्की झाली आणि १२ वर्षापुर्वी सखाराम बापटांची पहिली ऍडमिशन झाली.
त्यावेळी पालकांच्या मिटींगच्या वेळी डॉ. अनिता अवचट मॅडमची आणि माझी पहीली भेट झाली. तेव्हा “माझ्या बायकोला ऐकायला कमी येते म्हणून मी दारू पितो” असं सखारामनी मॅडमला सांगितलं होतं घरच्या लोकांचही तेच मत त्यामुळे मलाही तसंच वाटायचं मॅडम म्हणाल्या, “तो काय म्हणतोय त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. तुझ्या कानाचा आणि त्याच्या पिण्याचा काहीही संबंध नाही. तु स्वतःला अजिबात अपराधी वाटून घेऊ नको त्यात तुझा काहीच दोष नाही. आमच्याकडे एवढे पेशंट आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बायकांना खूप छान ऐकायला येत तरी ते पितातच.” हे ऐकून मला खूपच धीर आला. मनात म्हटलं, चला, सुरूवात तर छान झाली आपण उगाचच स्वतःला कमी समजत होतो. इथे काहीतरी वेगळ्या पध्दतीने विचार केला जातोय. आपल्याला इथून नक्कीच मदत मिळेल.
१२ वर्षापुर्वी वाटलेला तो विश्वास आजही कायम आहे. उलटणार्या प्रत्येक दिवसाबरोबर तो आणखीनच दृढ होतो आहे या नंतरची सर्व वाटचाल मुक्तांगणच्या मदतीनेच झाली आहे. व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि उपचारांनी तो बरा होऊ शकतो हि शिकवण मुक्तांगणनेच दिली त्याचबरोबर हा आजार पुन्हा पुन्हा उलटू शकतो हे ही मुक्तांगणनेच सांगितले आणि हा अनुभव तर मी अजूनही घेतेच आहे अजूनही सखारामचे ऑन-ऑफ चालूच आहे परंतु मध्ये २/३ वर्षे व्यसनमुक्तीत गेली. स्वतःचा व्यवसाय सुरू झाला.
परत परत होणार्या ऍडमिशनमुळे त्याच्या विचारात फरक पडू लागला. आत्मविश्वास वाढला. आपण पण काहीतरी करू शकतो याचे समाधान मिळू लागले आर्थिक घडीही चांगलीच बसली आहे. मुक्तांगणच्या वारंवार संपर्कात राहिल्यामुळे त्यांचे नैराश्य कमी झाले आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आहे. कुटुंबात, समाजात मिसळायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आपोआपच विचारांची देवाणघेवाण होत आहे. नवीन मित्र मिळतात. जितकं समाजात, नातेवाईकांच्यात मिळून मिसळून वागावे तेवढे व्यसनापासून दूर रहाण्यास मदत होते. जो स्वतःला पुर्णपणे विसरून दारूच्या व्यसनात आकंठ बुडाला होता तो मुक्तांगणच्या मदतीने व्यसनमुक्त आनंदी आयुष्य जगायला लागला आहे आपण कोण आहोत, आणि नेमके कशासाठी जगतो आहोत हे त्याला कळायला लागले. बायको मुलांच्या बाबतीत कर्तव्याची जाणीव झाली.
मुक्तांगणची मदत ही काही पेशंटसाठीच नसते, ती त्याच्या नातेवाईकांसाठी सुध्दा असते. मुख्य पुरूष व्यसनात अडकल्यामुळे घराची पार रया गेलेली होती. आमचा सर्वांचाच आत्मविश्वास ढासळला होता. स्वतःला कमी लेखायची सवयच लागली होती. पण मुक्तांगणच्या सल्यामुळे आम्हीपण मनाने खंबीर, कणखर झालो कितीही वेळा आजार उलटला तरी निराश न होता परिस्थितीला तोंड द्यायला शिकणे. जी काही असेल ती परिस्थिती स्वीकारून पुढे जायला शिकलो. आमच्या सर्वांच्यात झालेला बदल हा मॅडमच्या शिकवणीचेच फळ आहे.
मोठ्या मॅडमच्या निधनानंतर छोट्या मॅडम (मुक्ता) पण त्याच विश्वासाने, निर्धाराने काम करीत आहेत. वयाने, अनुभवाने लहान असूनसुध्दा ती चांगल्या प्रकारे काम करत आहे. मुक्तांगणचे सर्वच सहकारी, सल्लागार, मित्र यांच्या सर्वांच्याच मदतीने सखारामचे व्यसनमुक्तीचे प्रयत्न चालू आहेत. कोणीतरी लिहिलेले वरील वाक्य सखारामने खोटे ठरवावे हिच माझी मनापासून इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ईश्वर त्याला तेवढे बळ देवो ही परमेश्वराजवळ प्रार्थना आहे.
सहचरी गटातील पत्नींचे अनुभव
- Details
- Hits: 5657
8