आपलं बाळ आरोग्यसंपन्न असाव असं सर्वांनाच वाटतं. अशा सदृढ बाळाच्या स्वास्थ्याची तयारी, बाळ जन्माला येण्या आधीपासूनच करावी लागते. आई-वडील होतांना, आपल्या दोघांच्या आयुष्यात ‘कोणीतरी तिसरं येणार’ ते सर्वस्वी आपलं असणारं’ ही कल्पना खूपच छान असते. त्यात नैसर्गिक निर्मितीचा आनंद असतोच. पण आपण कोणाची तरी जबाबदारी घेणार, ही कल्पनाही मनातल्या पालकाला सुखावत असते. येणाऱ्या बाळाची जबाबदारी आई-वडिल दोघांचीही आहे. यासाठी आई आणि वडील दोघांच्याही शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुस्थितीची गरज आहे ! किंबहुना मुलामुलींच्या लग्नाच्या आणि मूल होऊ देण्याच्या किमान मर्यादा वाढवण्यामागचा तोच हेतू आहे. चांगलं सदृढ मूल जन्माला येणं म्हणजे एक प्रकारे चांगलं पीक हाती येण्यासारखचं आहे. त्यासाठी आईची तब्येत, गर्भाशयाची स्थिती बाळ वाढवायला योग्य असावी लागते.
काही गोष्टींचे गर्भावर होणाऱ्या परिणामांबाबत. शास्त्रीय अंदाज निर्विवाद सिध्द झाले आहेत. त्यांच्या वाटेला न जाणचं हिताचं ठरतं. उदा. गरोदरपणी ‘क्ष’ किरण तपासण्या. वर म्हटल्याप्रमाणे कडक डोहाळ्यावर वापरली गेलेली उलटी थांबण्याची औषधं, मुद्दाम गर्भपात करण्यासाठी वापरलेली औषधं आणि आणखीही काही रसायनं, यांचा उपयोग न होता म्हणजे औषधांना न जुमानता गर्भ तसाच राहिला, आणि वाढला तर त्यावर काही अनिष्ट परिणाम झालेले दिसून येतात.
गर्भधारणेनंतर लगेचच काही दिवसांमध्ये बाळाच्या शरीराचे सर्व अवयव, संस्था यांची निर्मिती होत असते. ही क्रिया फार झपाटयानं होत असते, आणि फारच गुंतागुंतीची असते. विशेष म्हणजे हा काळ पाळी चूकल्यानंतरचा १-२ आठवडयातलाच असतो. म्हणजे पुष्कळदा तेव्हा स्त्रीला पाळी लांबली आहे की दिवस राहिले आहेत हेच ठाऊक नसतं. अगदी सुरक्षित असे गर्भनिरोधक वापरले तरी त्यात चुकून दिवस राहाण्याचा थोडातरी धोका असतोच. (संततिप्रतिबंधक गोळ्या घेतल्या तर सर्वात जास्त सुरक्षा असते पण त्या नियमीतपणे घेतल्या गेल्या असल्या तरच ! पुष्कळदा त्यात चुका झलेल्या असतात आणि मग दिवस रहाण्याची शक्यता रहातेच ! म्हणून पाळी लांबणं हे गर्भ राहिल्याचंच लक्षण समजून बाळ हवं असल्यास, त्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे)
इथं एक गोष्ट प्रकर्षानं नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, कोणतीही औषधं म्हणजे तीही शेवटी रसायनंच असतात, मग ती नैसर्गिक असोत किंवा प्रयोगशाळेत निर्मान केलेली असोत. याचा वाढत्या गर्भावर कसा परीणाम होईल हे सर्वच औषधात तपासलेलं नसतं आणि वर म्हटल्याप्रमाणं त्याचे परीणामही झाल्यावरच समजतात आणि मगच ते औषध किंवा रसायन ‘गरोदरपणी घेऊ नयेत’ अशा पदार्थाच्या यादीत येतं. अगदी होमिओपॅथी, आयुर्वेद, ऍलोपॅथी कोणताही पॅथीच औषध घ्यायची वेळच आली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
काही कुटुंबात काही अनुवंशिक आजार असतात. उदा. मतिमंदत्व, रक्त न गोठण्याचा आजार, झटके येण्याचा आजार, वाढत जाणार आणि आंधळेपण आणणारे दृष्टिदोष, त्वचेचे विकार यांसारखे अनेक. हे आजार आपल्या बाळात येऊ नयेत असं प्रत्येकालाच वाटतं. लग्नापूर्वी जर, असं लक्षात आलं असेल, तर ज्या कुटुंबात आपण लग्न जमवतोय त्यांच्यातही असा आजार असण हे खरं तर अगदी अयोग्य आहे, पण अजूनही सम व्यंग, सम व्याधी असलेल्या मंडळींची लग्नं लावून देण्याकडं समाजाचा कल दिसतो.
यामुळं ते एकमेकांना चांगलं समजून घेतील अशी कल्पना असते. थोडंफार ते खरंही आहे. पण अशामुळं समान दोष आईवडिलांमध्ये सुप्तावस्थेत असले तरी बाळाला या दोषाचा दुप्पट वाटा मिळाल्यानं त्याच्यात हाच दोष मोठं रूप धारण केलेला दिसून येतो हे लक्षात घ्यावं. यासाठीच दोष नसले तरी, नात्यात लग्न टाळावीत (आते, मामे, चुलत, मावस इ.) यासाठी लग्न जुळवतांना जो मोकळेपणा दोन्ही पक्षात असायला हवा तो अजूनही दिसत नाही. म्हणूनच लग्नाआधीच्या तपासण्यांना फारसं महत्व आलेलं नाही. जसजशी समाजात आणखी सुधारणा होईल तसतशी या तपासण्या व चर्चा आणखी फलदायी होतील.
रक्तगट:
काही सुशिक्षित मंडळी अलीकडे विवाह जमवताना वधूवरांच्या वैद्यकीय तपासण्यांची माहिती मिळवण्याकडं चिकित्सक दृष्टीनं प्रयत्न करताना दिसतात. या तपासण्यात रक्तगटाला अवाजवी महत्व दिलं गेलंय. मुलीचा रक्तगट कोणताही असो. (A, B, AB, O) Rh निगेटिव्ह असला तर तिच्यात काहीतरी कमी असल्यासारखं मानतात. हे अगदीच चुकीचं आहे. मुलीचा रक्तगट निगेटिव्ह आहे हे माहित असणं हेच खूप झालं. वैद्यकीय शास्त्रात निगेटिव्ह रक्त गट असला म्हणजे काय काळाज्या घ्यायच्या हे संपूर्ण माहिती झालंय. यामुळं आता या रक्तगटाला कोणतंच भीतीचं किंवा काळजीचं वलय (पूर्वीप्रमाणं) राहिलेलं नाही.
प्रसूतीपूर्व तपासण्या:
निदान गर्भ राहिल्यानंतर तरी बाळात जन्मजात काही शारीरिक मोठं व्यंग नाही ना इतकं तरी आता काही तपासण्यांनी शोधता येतं. उदा. अल्ट्रासाउंड तपासणी.
आईचं वय ३५ च्या पुढं किंवा वडिलांचं ४५ च्या पुढं असलं की गर्भात काही विकृती निर्माण होण्याचं प्रमाणं वाढतं. याचं कारण, आईच्या किंवा वडिलांच्या बिजाची (त्यावर इतर गोष्टींचा अनिष्ट परीणाम न होऊ देण्याची) शक्ती क्षीण होत जाते आणि सहजच त्याची अंतर्गत रचना अन् रूप बदलल्यानं त्याचे फार मोठे अनिष्ट परीणाम गर्भावर होण्याची शक्यता वाढते. म्हणून बाळ होऊ देण्याचं वय आईचं ३५ च्या आत व वडिलांचं ४५ च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
पुष्कळदा व्यंग असलेलं मूल जन्माला आलं आणि लगेचच दगावलं की त्याबद्दलची माहिती कोणालाच नसते आणि नंतर पुढच्या गरोदरपणात व सांगितलेली माहिती कशाच्या आधारावर मिळवायची, असा डॉक्टरांना प्रश्न पडतो. यासाठी व्यंग असलेल्या किंवा जन्मानंतर नजिकच्या काळात दगावलेल्या मुलाबद्दलची माहिती, आजाराच्या निदानासाठी डॉक्टरांची सविस्तर भेट घेऊन मिळवावी.
अशा प्रकारानंतर पुन्हा गर्भ राहिल्यावर त्याच्या तपासण्या करून, पूर्वीच्या गर्भाप्रमाणे हे बाळ नाही ना याची माहिती मिळवून, त्याप्रमाणे पुढची उपाययोजना ठरविता येते. तसचं काही अतिशय गंभीर आजार नाहीत ना यासाठीही काही तपासण्या नियमित केल्या जातात त्यांचाही फायदा घ्यावा. उदा. रक्तगट न जुळणं (बाळाचा व आईचा), ऍनीमिया, मूत्रमार्गाचे आजार, रक्तदाब, मधुमेह इ. असे आजार आईला असल्यास बाळावर त्याचे होणारे संभाव्य परिणाम ओळखून ते आटोक्यात ठेवणं जरूरीचं असतं. "आपल्याला काही त्रास होत नाही तर अशा तपासण्या आणि उपचारांची काय जरूर ? " असा विचार चुकीचा ठरतो. आधी सांगितल्याप्रमाणे आईवर त्याचा काही परिणाम न दिसता एकदम् बाळावरही दिसून येतो हे लक्षात घ्यावं.
पाठीच्या मणक्यांचे आवाळू सारखे काही भयंकर दोष आईच्या आहारातल्या जीवनसत्वांच्या (फोलिक ऍसिड) कमतरतेमुळं होतात असं दिसून आलं आहे. तेही अतिशय सोप्या उपचारांनी टाळता येतं. जन्माआधी ओळखताही येतं, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दिवस राहिल्यावर, बाळाच्या चांगल्या देखभालीसाठी डॉक्टरांना वेळोवेळी दाखविणं जरूरीचं आहे.
तज्ञ डॉक्टरांकडे नाव नोंदवून जरूर त्या तपासण्या, आणि उपचार योजना वेळोवेळी सांगतील त्याप्रमाणे आणि समजावून घेऊन कराव्यात.
एकदा बाळाचा गर्भ रूजला (गरोदरपणाचे पहिले ३ महिने झाले की बहुतेक) त्यात फार मोठे जीवावर बेतणारे दोष नसावेत असा अंदाज करायला हरकत नाही. कारण पुष्कळदा अशा विकृतिंचे गर्भपात होतात. पहिल्या तिन महिन्यांतल्या गर्भापातामधल्या गर्भात फार मोठया, जगू न शकणाऱ्या, विकृती फार दिसून येतात. याचाच अर्थ निसर्गालाच असा गर्भ वाढवता येत नाही आणि तो वेळीच टाकून दिला जातो. यानंतर या बाळाच्या वाढीसाठी आणि त्याच्या स्वास्थ्यासाठी जे जे आवश्यक ते ते त्याला पुरविण्याची आईची (वडिलांचीही) जबाबदारी ठरते. यासाठी आईनं मनानं आणि शरीरानं ही जबाबदारी उचलावी. मन शांत, संयमी ठेवायचा प्रयत्न करावा. आहार पोषक द्रव्यं आणि उष्मांकांनी (कॅलरीज्) आई आणि बाळ दोघांच्या गरजा भागतील इतका वाढवावा.
शारीरिक आणि मानसिक कष्ट घेऊ नयेत. म्हणजे वृत्ती अशा ठेवाव्यात की, जी दैनंदिन काम करतो त्यांचे कष्ट वाटून घेऊ नयेत. हळू हळू ही सर्व कामं आणि बाळाची आणि कुटुंबाची वाढलेली कामं या सर्वांशी सामाना करायचा आहे हे लक्षात घेऊन मनाच रबर हे ताण सहन करण्यासाठी हळूहळू ताणावं म्हणजे नंतर अंगावर पडलेल्या जबाबदारीचं ओझं न वाटता ते सहज पेलवतं आणि त्याचाही जो आनंद असतो तो अनुभवता येतो. नाही तर गरोदरपणीच बऱ्याच गोष्टींसाठी परावलंबित्व पत्करलेल्या आईला बाळाच्या जन्मानंतर या जबाबदाऱ्या स्वीकारायला न जमल्यानं, ताण असह्य होऊन, मानसिकरीत्या कोसळलेली आपण पहातो.
यासाठी पुढचा विचार करणं आणि त्यानुसार स्वतःच्या मनाची ‘तयारी’ करणं फार जरूरीचं आहे. आजूबाजूला डोळसपणे पाहिलं तर अनेक यशस्वी आपोआप आपल्या मनाची तयारी करता येते. मात्र यासाठी डोळस नजर हवी आणि तसे प्रयत्न दोघांकडून झाले पाहिजेत.
मूल जन्माला येताना, प्रत्यक्ष बाळंतपणातही याच मानसिक तयारीचा आणि वृत्तीचा आईला उपयोग होत असतो. अतिशय काळाजी करणं, ताणाखाली असणं, यामुळं बाळ जन्माला येतानाही आईचा त्रास वाढू शकतो. याउलट शांतपणे आहे ती परिस्थिती स्वीकारून होतील ते कष्ट सोसायची मानसिक तयारी ठेवणाऱ्या आईला कमी त्रास होतो. मनाचा ताण प्रयत्नपूर्वक कमी करता येतो. त्याचा फायदा अर्थातच् तिला आणि तिच्या बाळाला होतो, हे उघडच आहे. आपण आपल्या मुलाला, ते जसं असेल तसं, सर्व गुणदोषांसह अभिमानानं अन् प्रेमानं ‘आपलं’ मानलं पाहिजे. जसं आईवडिलांनी एकमेकांना मानलं आहे तसं!
बाळ जन्माला येण्याआधी
- Details
- Hits: 20460
9
मुलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
